|Wednesday, January 22, 2020
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » तिलारी काँक्रिटचे पाट दोन वर्षातच निकृष्ट

तिलारी काँक्रिटचे पाट दोन वर्षातच निकृष्ट 

साटेली-भेडशीतिलारी पाटबंधारे प्रकल्पांतर्गत डाव्या कालव्याखालील शेतकऱयांच्या शेतीपर्यंत पाणी नेण्यासाठी तीन गावात बांधण्यात आलेले कॉंक्रिटचे पाट दोन वर्षातच निकृष्ट बनले आहेत. शिवाय येथील पाटात माती, कचरा भरल्याने पाटातील पाणी शेतीपर्यंत पोहचत नाही. याकडे कालवा विभागाचा दुर्लक्ष आहे. यासंदर्भात शेतकऱयांनी संताप व्यक्त करत तिलारी कालवा विभाग कार्यालयाला भेट देत पाटासंदर्भातील समस्या चार दिवसात सोडवाव्यात अन्यथा पाचव्या दिवशी शेतकरी आंदोलन छेडतील, असा इशारा शेतकरी समूह गटाचे अध्यक्ष सतीश परब, गुरुनाथ दळवी, प्रदीप दळवी यांनी दिला.

तिलारी डाव्या कालव्याखाली तीन गावांचे शेकडो एकर जमीन सिंचनक्षेत्राखाली येते. दोन वर्षापूर्वी तिलारी, कोनाळ, वायंगणतड, घोटगे गावात कॉंक्रिटचे पाट बंधाऱयात आले आहे. वायंगणतड, घोटगे हद्दीत बांधलेले कॉंक्रिटचे पाट दोन वर्षातच निकृष्ट बनले आहेत.

         चिखल, माती कचऱयाने पाण्याला अडथळा

तिलारीपासून कोनाळपर्यंत सुमारे एक मीटर रुंदीचे कॉंक्रिट पाटाचे बांधकाम झालेले आहे. पाटामध्ये फार मोठय़ा प्रमाणात झाडी वाढलेली आहे. शिवाय माती, कचरा यांच्या साम्राज्यामुळे पाटातील पाण्याचा प्रवाह मंदावला आहे. पाटातून येणारे पाणी कमी झाल्यामुळे शेवटच्या शेतकऱयांच्या शेतीपर्यंत पाणी पोहचत नाही. मधल्या काही किरकोळ शेतकऱयांनी पाणी वापरले तर खालच्या शेतकऱयापर्यंत पाण्याचा तुटवडा भासतो. त्याच्या शेतीपर्यंत पाणीच पोहचत नाही. वरच्या शेतकऱयांनी पाणी बंद केल्यानंतर खालच्या शेतकऱयाला पाणी मिळते. हे पाणी मिळेपर्यंत रात्रीचे आठ वाजतात. शेतकऱयांना नाईलाजास्तव रात्रीचे पाणी आपल्या बागायती शेतीला लावावे लागते.

             पाटाला गेटऑलची आवश्यकता

पाटाचे पाणी शेकडो शेतकरी शेतीसाठी पाणी वापरतात. शेतकऱयांचा योग्य विचार न करता काही ठराविक बागातच गेटऑल बसविण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱयांनी आपल्या शेतीत पाणी नेण्यासाठी पाटालाच होल मारले आहेत. अशा कित्येक शेतकऱयांनी पाटाला होल मारल्यामुळे पाटातील पाणी सदैव त्याच्या जमिनीत झिरपत राहते. शेतकऱयाच्या मागणीनुसार पाटाला लहान-लहान गेटऑल बसविले असता ही परिस्थिती उद्भवली नसती. यासाठी शेतकऱयांच्या मागणीनुसार ऑल बसविणे आवश्यक आहे. पाटाचे पाणी वायंगणतडमधून घोटगे येथे जाते. वायंगणतड येथे गेटऑल बसविला नसल्याने वायंगणतड शेतकऱयांना पाणी नको असतानाही त्याच्या शेतीत पाणी जाते. अती सिंचनामुळे पिकांचे नुकसान होत आहे.

         पाट शेतकऱयांसाठी की ठेकेदारासाठी?

शेतातून पाट काढण्यात आले आहे. या पाटाची खोली जमिनीपासून एक हातापेक्षा जास्त खाली आहे. प्रत्येक शेतकऱयांला आपल्या शेतीत पाणी नेण्यासाठी पाटात बांध घालून शेतीत न्यावे लागते. ठेकेदारांनी आपल्या फायद्यासाठी चुकीच्या पद्धतीने बांधकामे केली आहेत. त्याचा त्रास शेतकऱयांना भोगावा लागतो. यामुळे शेतकऱयांनी आपल्या शेतीत पाणी नेण्यासाठी पाटालाच हाल मारले आहेत. बांध घालून पाणी अडविल्यामुळे खालच्या शेतकऱयांना पाणी मिळत नाही.

        महालक्ष्मी विद्युत कंपनीकडे कालव्याला भगदाड

महालक्ष्मी विद्युत प्रा. लि. कंपनीकडे कालव्याला मोठे भगदाड पडलेले आहे. मोठय़ा पाण्याचा प्रवाह तेथून वाहत आहे. प्रकल्पाने या प्रवाहाला मार्ग काढून ते पाणी पाटात सोडलेले आहे. परंतु तेथील भगदाड बंद करण्यासाठी कोणत्याही उपाययोजना आखण्यात आल्या नाहीत. भविष्यात कालवा फुटण्याची शक्यता आहे.

              मेन गेट ऑल नादुरुस्त

डाव्या कालव्यावर मेन गेटऑल बसविण्यात आला आहे. हा गेटऑलच गेल्या कित्येक दिवस नादुरुस्त आहे. या गेटऑल जवळ कालवा विभागाचा कायमच दुर्लक्ष आहे. कोणीही कधीही अज्ञात व्यक्ती तेथे जावून गेटऑल सुरू करतात व बंद करतात. कालवा विभागाचे कर्मचारी तेथे कधी फिरकत नाहीत.

 

Related posts: