|Monday, September 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » चिन्मयची ‘रोबोटिक’ झेप

चिन्मयची ‘रोबोटिक’ झेप 

सिंधुदुर्ग : दहावीच्या परीक्षेत उत्तम गुण मिळवूनदेखील अपेक्षांच्या ओझ्याखाली बारावीत टक्केवारीची गाडी घसरलेल्या चिन्मयने अपयशाने खचून न जाता आत्मविश्वासाच्या बळावर मिळविलेल्या यशाला तोड नाही. मराठी माध्यमातून शिकलेला हा सिंधुदुर्गचा सुपुत्र आज फ्रान्समध्ये राहून तेथील विद्यापीठामध्ये ‘रोबोटिक सायन्स’ मध्ये महत्वपूर्ण संशोधनाचे काम करीत आहे. एका जगप्रसिद्ध बहुराष्ट्रीय कंपनीने वैद्यकीय क्षेत्रातील तंत्रज्ञानात महत्वपूर्ण संशोधनाची जबाबदारी त्याच्यावर व तो शिकत असलेल्या विद्यापीठावर संयुक्तपणे सोपवली आहे. भारताचा हा युवा संशोधक रोबोटिक क्षेत्रात देदीप्यमान यश मिळवेल, हे नक्की आहे.

चिन्मय हा कुडाळ येथील डॉ. नंदन सामंत यांचा मुलगा. कुडाळ हायस्कूलमध्ये तो दहावीपर्यंत शिकला. दहावीत त्याला 87 टक्के गुण मिळाले. घरात वैद्यकीय क्षेत्राची परंपरा असली, तरी चिन्मयने तोच पेशा स्वीकारावा, अशी त्याच्या पालकांची मुळीच इच्छा नव्हती. चिन्मयने आय. टी. क्षेत्र निवडावे, असे त्यांनी निश्चित केले. पुण्यात एस. पी. महाविद्यालयात त्याने प्रवेश घेतला खरा, परंतु चिन्मयला हे क्षेत्र आवडत नव्हते. त्यामुळे त्याचा करियरचा मार्ग चुकतो की काय,  अशी स्थिती निर्माण झाली. दोन महिने उशिरा मिळालेले ऍडमिशन, अपेक्षांचे ओझे यामध्ये चिन्मयचा टक्केवारीचा आलेख कमालीचा घसरला. 12 वीत त्याला जेमतेम 52 टक्के मार्कस् मिळाले. पालकांचाही अपेक्षाभंग झाला. चिन्मयला त्यांनी स्वतःच निर्णय घेण्याची परवानगी दिली आणि तेथूनच त्याच्या यशाचा मार्ग सुरू झाला.

अपयश ही यशाची पहिली पायरी!

चिन्मय म्हणतो, अपयश ही यशाची पहिली पायरी असते, याची प्रचिती आपल्याला तिथे आली. करियरसाठी आवडते क्षेत्र निवडण्याची संधी मिळाली आणि आपण ‘रोबोटिक्स सायन्स’ निवडले. लहानपणापासून रोबोटिक तंत्रज्ञानात आपल्याला प्रचंड रुची होती. याच क्षेत्रात करियर करायचा निर्णय आपण घेतला. पुढील तीन वर्षे पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमधून बेसिक सायन्समधून विशेष गुणवत्ता मिळवत डिग्री मिळवली. नंतर रोबोटिक क्षेत्र निवडत एम. एस्सी देखील पूर्ण केले. पोस्ट ग्रॅज्युएशननंतर रोबोटिक्समध्ये आपण संशोधनाच्या संधी शोधायला सुरुवात केली. इंटरनेटवरून शोध घेता घेता, फ्रान्समध्ये संशोधनाच्या उत्तम संधी असल्याचे  आढळून आले. फ्रान्सच्या ‘स्ट्रान्सफोर्ट’ विद्यापीठात प्रवेश मिळवला. हा प्रवेश काही सोपा नव्हता. त्यासाठी जागतिक प्रवेश प्रक्रियेला सामोरे जावे लागले. आई-वडिलांचे मार्गदर्शन व आत्मविश्वासाच्या बळावर आपण यशस्वी झालो. तेथील विद्यापीठात रोबोटिक्सला लागणारे सिग्नल प्रोसेसिंग, इमेज प्रोसेसिंग व रोबोटिक्समागचे मॅथेमॅटिक्स शिकलो. ‘मशीन लर्निंग’ म्हणजे काय? मशीनमागचे ‘इंटेलिजन्स मॅकेनिक्स’ कसे असते, हे आपणास समजले. हे ज्ञान घेतल्यानंतर फ्रान्स मध्येच राहून रोबोटिक्सच्या माध्यमातून मोठे संशोधन करण्याचा निर्णय घेतला. रोबोटिक्सचा वापर वैद्यकीय क्षेत्रात सर्वात जास्त होतो, हे आपल्याला सिनिअर्सकडून समजलं. ‘सिमेन्स’ सारख्या मल्टीनॅशनल कंपनीकडून मिळालेली वैद्यकीय संशोधनाची ऑफर मी स्वीकारली. हे संशोधन करीतच फ्रान्समधील या विद्यापीठातून आपण पीएचडीला प्रारंभ केला आहे.

देशाचे नाव जगात उंचावणार!

चिन्मय आता फ्रान्समध्ये आहे. अल्ट्रासाऊंड लॅप्रोस्कोपी उपकरणात महत्वपूर्ण संशोधनात तो सध्या व्यस्त आहे. हे संशोधन यशस्वी झाले, तर अल्ट्रासाऊंड लॅप्रोस्कोपी करताना ‘अल्ट्रा साऊंड प्रो’ पोटात नेमका कुठल्या अवयवाकडे पोहोचलाय, हे डॉक्टरना अचूक व त्वरित समजणार आहे. त्यामुळे लॅप्रोस्कोपी अचूक करणे डॉक्टरना शक्य होणार आहे. या संशोधनानंतर चिन्मय ‘मशीन लर्निंग’ तंत्रज्ञान संशोधनावर जास्त भर देणार आहे. जगात जी काही टेक्नॉलॉजी आहे, ती सर्व गणितावर अवलंबून आहे आणि नेमक्या या गणितावरच अधिक संशोधन करण्याचा त्याचा मानस आहे. रोबोटिक तंत्रज्ञान हे अतिशय क्लिष्ट तंत्रज्ञान म्हणून ओळखले जाते. या तंत्रज्ञानात मास्टरी मिळवून आपल्या जिल्हय़ाचे व पर्यायाने देशाचे नाव जागतिक संशोधनात त्याला उंचवायचे आहे.

अपेक्षांच्या ओझ्याखाली दबलेल्या मुलांसाठी चिन्मय आदर्श

सिंधुदुर्गाचा सुपत्र असलेल्या चिन्मय सामंत याची संशोधनातील झेप व वाटचाल या लेखाच्या माध्यमातून वाचकांपर्यंत आणण्याचा उद्देश हाच आहे की, अपेक्षांच्या ओझ्याखाली दबून भरकटणारी अनेक मुलं आपण पाहात आसतो. अशा विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना चिन्मयच्या या वाटचालीतून बरच काही शिकता येईल. मुलांना त्यातून प्रेरणा मिळेल. अपयशाकडे संधी म्हणून कसे पाहायचे, ते समजेल. पालकांनाही मुलांसाठी करियर निवडताना, मुलांची आवड, अंगभूत कौशल्ये याकडे किती गांभिर्याने पाहवे, हेदेखील समजेल, अशी अपेक्षा आहे.