|Wednesday, January 22, 2020
You are here: Home » क्रिडा » डेव्हिस चषक स्पर्धेत भारत 2-0 फरकाने आघाडीवर

डेव्हिस चषक स्पर्धेत भारत 2-0 फरकाने आघाडीवर 

रामकुमार रामनाथन, युकी भांबरीचे सहज विजय, लियांडर पेसला दुहेरीत विश्वविक्रमाची संधी

प्रतिनिधी/ पुणे

रामकुमार रामनाथन व युकी भांबरी यांच्या सहज, एकतर्फी विजयासह भारताने डेव्हिस चषक स्पर्धेतील आशिया-ओशेनिया पहिल्या गटातील लढतीत पहिल्या दिवशी 2-0 अशी भक्कम आघाडी घेतली. युकीला सर्वोत्तम खेळ साकारता आला नसला तरी त्याने न्यूझीलंडच्या फिन टेरेनीचा 6-4, 6-4, 6-3 असा सरळ सेटमध्ये पराभव करीत भारताचे खाते उघडले तर रामकुमारने जोस स्टॅथमला 6-3, 6-4, 6-3 असे नमवले.

प्रारंभी, युकी भांबरीने  2 तास 10 मिनिटे चाललेल्या या सामन्यात अनेक चुका वेळीच सावरत विजय संपादन केला. तो पहिल्या सेटमध्ये 1-3 असा पिछाडीवर होता. परंतु, त्यानंतर त्याने सलग चार गेम्स आपल्या नावावर करीत पहिल्या सेटमध्ये 5-3 अशी आघाडी घेतली. 47 मिनिटे चाललेल्या या सेटमध्ये युकीने चांगल्या खेळाचे प्रदर्शन करीत पहिला सेट 6-4 असा आपल्या नावावर केला.

दुसऱया सेटमध्ये देखील युकी सुरूवातीला 0-2 असा पिछाडीवर होता. मात्र त्याने फिनला आपल्यावर वर्चस्व गाजू न देता कमबॅक करीत हा सेटदेखील 6-4 असा जिंकला. तिसऱया सेटमध्ये मात्र पूर्णपणे युकीचेच वर्चस्व दिसत होते. युकीने सुरूवातीलाच फिनची सर्व्हिस ब्रेक करत आपले इरादे स्पष्ट केले. पण नंतर सर्व्हिसवर त्याचा ताबा राहिला नाही. मात्र, वेळीच सावरत सर्व्हिसमध्ये त्याने सुधारणा केल्या आणि सामन्यात बाजी मारली.

रामनाथनचीही सहज बाजी

सामन्याच्या दुसऱया सत्रात फॉर्ममध्ये परतण्यासाठी झगडलेल्या रामनाथनने दुसऱया एकेरीत सहज विजय संपादन केला. दीर्घ रॅलीजवर भर देत त्याने प्रतिस्पर्ध्याची बरीच दमछाकही केली. पहिला सेट अवघ्या अर्ध्या तासात जिंकल्यानंतर हाच सिलसिला त्याने पुढेही सुरु ठेवला. क्रॉस कोर्टवर फोरहँडचे काही जबरदस्त फटके लगावत त्याने सामन्यावरील नियंत्रणही कायम राखले.

या लढतीत दुसऱया सेटमध्ये रामनाथनला काही वेळ झगडावे लागले. पण, तीन ब्रेक पॉईंट्स वाचवल्यानंतर त्याला सामन्यात परतता आले. तुलनेने नवख्या असलेल्या न्यूझीलंडच्या जोस स्टॅथमला या निर्णायक वेळी आपला खेळ उंचावता आला नाही. यानंतर रामनाथनने दुसरा सेट 40 मिनिटात जिंकला व तिसऱया सेटमध्येही सहज आगेकूच करत विजय संपादन केला.

या स्पर्धेच्या निमित्ताने भारताचा अनुभवी टेनिसपटू लियांडर पेस डेव्हिस चषक स्पर्धेच्या दुहेरीत 43 व्या विश्वविक्रमी विजयाच्या उंबरठय़ावर पोहोचला आहे. राष्ट्रीय हार्ड कोर्ट चॅम्पियन विष्णू वर्धनच्या साथीने उतरताना भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब करुन देणे, हे त्याचे मुख्य लक्ष्य असणार आहे. न्यूझीलंडचे टेरेनी व स्टॅथम हे एकेरीतील खेळाडू 400 पेक्षा अधिक मानांकन असणारे आहेत. त्या तुलनेत मायकल व्हीनस व ऍर्तेम सितक ही दुहेरीतील जोडी अधिक अनुभवी असल्याने लियांडर पेस व विष्णू वर्धन यांचा काही प्रमाणात कस लागल्यास ते आश्चर्याचे ठरणार नाही.

 

Related posts: