|Thursday, January 23, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » ‘भारतीय सिनेमा आणि नारी’वरील परिषदेला प्रारंभ

‘भारतीय सिनेमा आणि नारी’वरील परिषदेला प्रारंभ 

प्रतिनिधी/ काणकोण

काणकोणचे श्री मल्लिकार्जुन महाविद्यालय आणि कल्याण – महाराष्ट्र येथील सद्गुरू शिक्षण कल्याण असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने देळे – काणकोण येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘भारतीय सिनेमा आणि नारी’ या दोन दिवशीय आंतरराष्ट्रीय परिषदेला शुक्रवारी प्रारंभ झाला असून ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे आणि उद्योजक नारायण बांदेकर यांच्या उपस्थितीत समई प्रज्वलित करून या परिषदेचे उद्घाटन करण्यात आले.

या उद्घाटन सोहळय़ाच्या व्यासपीठावर ऑस्ट्रेलियाचे चार्ल्स थॉमस, ज्ञानप्रबोधिनी मंडळाचे सचिव के. बी. गावकर, सेवा या संस्थेचे अध्यक्ष ओमप्रकाश, प्राचार्य एफ. एम. नदाफ, निमंत्रक डॉ. पूर्णानंद च्यारी व डॉ. रूपा च्यारी यांची उपस्थिती होती. भारतीय महिलेचे चित्रपटातील स्थान आणि विविध पैलू या विषयावर चालणाऱया या परिषदेत विविध विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे. यात ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, जपान, फ्रान्स त्याचप्रमाणे देशाच्या विविध भागांतून आलेले आणि गोव्यातील चित्रपट निर्माते तसेच अभिनेते सहभागी झाले आहेत. यात गोव्याची संस्कृती आणि चित्रपटनिर्मिती या विषयावर देखील चर्चा होणार आहे.

भारतीय स्त्रीविषयी पूर्ण अभिमान : आगाशे

भारतीय स्त्रीविषयी आपल्याला पूर्ण अभिमान असून चित्रपटात दाखविण्यात येणारे वास्तव दर्शन ज्यावेळी प्रत्यक्षात पाहावे लागते त्यावेळी मन व्यथित होते. चित्रपटातील वास्तव दर्शन आणि मानवी जीवन यात साम्य असून भारतीय चित्रपटसृष्टीने नारीच्या पारंपरिक जीवनाचे दर्शन प्रत्येक वेळी घडविले आहे, असे मोहन आगाशे म्हणाले. यावेळी बोलताना मृत्युदंड, औरत, कुंकू, माणूस या चित्रपटांची उदाहरणे देताना त्यांनी मानवाच्या जीवनावर त्यांचा कसा परिणाम झाला ते आपल्या बीजभाषणातून सांगितले.

आदिवासी समाजाच्या व्यथा, नवऱयाने सोडलेल्या महिलेची कथा आणि झोपडपट्टीतील महिलांचे प्रभावी व यथार्थ चित्रण टेलिफिल्मच्या माध्यमातून दाखवितानाच मानवाची संवेदनशीलता जपण्याचा प्रयत्न झाला आहे. बालकांचे जीवन हे पारदर्शक असते. मात्र तरुणपणी त्याला जसा तडा जातो त्याचप्रमाणे विकसित भागांतील महिलांच्या मानाने अविकसित भागांतील महिलांचे जीवन अधिक खडतर असते. त्यावर उजेड घालणारे सिनेमा हे प्रभावी माध्यम आहे, असे मत आगाशे यांनी मांडले.

प्रमुख आश्रयदाते नारायण बांदेकर यांनी आपल्या भाषणात या उपक्रमाचे कौतुक केले. काणकोणसारख्या भागात अशा परिषदेचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्दल श्री मल्लिकार्जुन महाविद्यालयाचे त्यांनी अभिनंदन केले. दोन दिवसांच्या परिषदेच्या निमित्ताने तयार केलेली स्मरणिका, कार्यप्रभा, नित्यानंद नाईक, गौरेश फळदेसाई, प्रतिमा गावकर, नाईक यांचे ‘आदिवासी एक अभ्यास’ आणि बी. के शर्मा यांचे ‘प्रतिमान और विमर्श’ या पुस्तकांचे प्रकाशन मोहन आगाशे आणि नारायण बांदेकर यांच्या हस्ते करण्यात आले. ओमप्रकाश, चार्ल्स थॉमस, के. बी गावकर यांचीही यावेळी भाषणे झली. प्राचार्य एफ. एम. नदाफ यांनी स्वागत केले, तर डॉ. रूपा च्यारी यांनी प्रास्ताविक केले. डॉ. पूर्णानंद च्यारी यांनी आभार मानले.

Related posts: