|Thursday, January 23, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » काँगेसच्या उमेदवाराला मारहाण केल्याने फातोडर्य़ात तणावग्रस्त स्थिती

काँगेसच्या उमेदवाराला मारहाण केल्याने फातोडर्य़ात तणावग्रस्त स्थिती 

प्रतिनिधी/ मडगांव

फातोर्डा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाचे उमेदवार जॉसेफ सिल्वा यांना गुरूवारी मारहाण करण्याचा प्रकार घडल्याने, सद्या फातोर्डा मतदारसंघात तणावग्रस्त वातावरण निर्माण झाले आहे. त्यात गुरूवारी रात्री काँग्रेसच्या कार्यकर्त्या एथल लोबो या वादग्रस्त सीडी व पुस्तिका वितरीत करताना सापडल्याने या वादात आणखीन भर पडली आहे.

काँग्रेसचे उमेदवार जोसेफ सिल्वा हे दवंडे-फातोर्डा येथे प्रचार करताना त्यांना जॉनी क्रास्टो यांनी आक्षेप घेतला, यावेळी दोघांमध्ये बाचाबाची झाली. यावेळी बराच गोंधळ झाला, त्यात उमेदवार जोसेफ सिल्वा यांना शिवीगाळ करून ठोसा हाणल्याने प्रकरण चिघळले. श्री. सिल्वा यांनी पोलीस तक्रार केली तरी काल उशिरा पर्यंत जॉनी क्रास्टो याला अटक झाली नव्हती.

संशयिताला पोलीस का अटक करत नाही

काल काँग्रेस पक्षाचे उमेदवार जोसेफ सिल्वा यांनी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला मारहाण करून सुद्धा पोलीस संशयिताला अटक करीत नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली. आम्ही पोलिसांकडे सातत्याने पाठपुरावा करीत असलो तरी पोलीस सहकार्य करीत नसल्याचा आरोप केला. संशयित जॉनी क्रास्टो हे भूमिगत झाल्याचे पोलीस सांगतात, यावरून पोलीस आमदार विजय सरदेसाईच्या दबावाखाली वावरत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

दरम्यान, आपण निडणुकीच्या रिंगणातून माघार घेतल्याचे भासविण्यासाठी शुक्रवारी एका इंग्रजी वृत्त पत्रात जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यातून आमदार विजय सरदेसाई हे वैफल्यग्रस्त झाल्याचे स्पष्ट होत आहे असा आरोप देखील श्री. सिल्वा यांनी केला. आपण निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतलेली नसून आमदार विजय सरदेसाईचा पराभव करून विजयी होणार असल्याचे श्री. सिल्वा यांनी यावेळी सांगितले.

एथल लोबोच्या कारमध्ये वादग्रस्त सीडी व पुस्तक पत्रिका

काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्या एथल लोबो यांची कार काल रात्री गोवा फॉरवर्डच्या कार्यकर्त्यानी अडविली असता, या कारमध्ये आमदार विजय सरदेसाई यांची बदनामी करणारी सीडी व पुस्तक पत्रिका आढळून आल्या. त्यामुळे बराच वेळ तणाव झाला. शेवटी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन कार व सीडी तसेच पुस्तक पत्रिका जप्त केल्या.

या संदर्भात काल पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण करताना, सांगण्यात आले की, एथल लोबोची कार तीन-चार युवकांनी अडविली. हे युवक दारूच्या नशेत होते व त्यांनी कारचा दरवाजा उघडून वादग्रस्त सीडी व पुस्तक पत्रिका कारमध्ये ठेवण्यात आल्या व नंतर जमाव करून धमकी सत्र सुरू करण्यात आले. पण वेळीच पोलीस पोचल्याने संभाव्य दुर्घटना टळली. त्या वादग्रस्त सीडी व पुस्तिका वितरण करण्यामागे एथल लोबो यांचा कोणताही सहभाग नव्हता असा दावा देखील करण्यात आला.

सद्या फातोर्डा मतदारसंघात गुंडागिरी सुरू झाली असून या गुंडागिरीचा बिमोड करण्यासाठीच आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरलो असून लोकांनी आपल्याला सहकार्य करावे असे श्री. सिल्वा म्हणाले.

या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे उमेदवार जोसेफ सिल्वा, एथल लोबो, अविनाश तावारीस तसेच इतर उपस्थित होते.

Related posts: