|Wednesday, January 22, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » गोव्यात आज मतदान

गोव्यात आज मतदान 

प्रतिनिधी/ पणजी

राज्य विधानसभेवर नव्याने 40 सदस्य निवडण्यासाठी आज अत्यंत कडक पोलीस बंदोबस्तात मतदान होणार आहे. एकूण 11 लाख 10 हजार 884 मतदार 251 जणांचे भवितव्य ठरवणार आहेत. राज्यभरात 1642 मतदान केंद्रे सज्ज झाली असून आम आदमी पक्ष सर्वाधिक 39 जागा लढवत आहे. काँग्रेस पक्षाने 37 तर सत्ताधारी भाजपने 36 आणि मगो पक्षाने 25 उमेदवार उभे केलेले आहेत. सुमारे 10 हजार सरकारी कर्मचारी व अधिकारी वर्ग निवडणुकीच्या कामात गर्क आहे. सत्ताधारी भाजप, विरोधी काँग्रेस, मगो, आप इत्यादी सर्वच पक्षांनी बहुमताचा दावा केला आहे.

2012 च्या निवडणुकीत 81.04 टक्के मतदान झाले होते. यावेळी 88 टक्के मतदानाचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. मतदान आज सकाळी 7 ते सायंकाळी 5 या दरम्यान होईल. मतमोजणी 11 मार्च रोजी होईल.

सर्वत्र कडक पोलीस बंदोबस्त

नव्या विधानसभेसाठी गोव्यात आज सर्वत्र मतदान होत असून निवडणूक पूर्वसंध्येला राज्यात अनेक घडामोडी घडल्या आहेत. त्यात एकमेकांविरुद्ध आरोप प्रत्यारोपांचा समावेश असून निवडणूक आयोगाकडे शिवाय पोलीस स्थानकांमध्ये देखील तक्रारी नोंदविण्यात आल्या आहेत. राज्यात सर्वत्र राखीव दलाच्या सुरक्षा कर्मचाऱयांना तैनात करण्यात आलेले आहे.

सर्व मतदान केंद्र सज्ज

गोव्यात आज होणाऱया राज्य विधानसभेच्या निवडणुकीसाठी सारी यंत्रणा सज्ज झाली आहे. शुक्रवारी सकाळी तालुका मुख्यालयातून मतपेटय़ा व इतर मतदान केंद्राची यंत्रणा घेऊन संबंधित स्थळी सरकारी अधिकारी व कर्मचारी पोहोचले आणि मतदान केंद्रे सज्ज करण्यात आली. उत्तर गोव्यात 794 तर दक्षिण गोव्यात 848 मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत.

उत्तर गोव्यात मांद्रे, पेडणे (राखीव), डिचोली, थिवी, म्हापसा, शिवोली, साळगाव, कळंगूट, पर्वरी, हळदोणे, पणजी, ताळगाव, सांताक्रूज, सांतआंद्रे, कुंभारजुवे, मये, सांखळी, पर्ये व वाळपई हे मतदारसंघ येतात. दक्षिण गोव्यात प्रियोळ, फोंडा, शिरोडा, मडकई, मुरगाव, वास्को, दाबोळी, कुठ्ठाळी, नुवे, कुडतरी, फातोर्डा, मडगाव, बाणावली, नावेली, कुंकळ्ळी, वेळ्ळी, केपे, कुडचडे, सावर्डे, सांगे व काणकोण या मतदारसंघांचा समावेश आहे.

चाळीस मतदान केंद्रे संवेदनशील

उत्तर गोव्यातील 19 मतदारसंघात 113 पुरूष आणि 6 महिला मिळून 119 उमेदवार आहेत. सर्वाधिक 10 उमेदवार सांत आंद्रेत तर सर्वात कमी 3 उमेदवार कळंगूटमध्ये आहेत. दक्षिण गोव्यातील 21 मतदारसंघामध्ये 119 पुरुष व 13 महिला मिळून 132 उमेदवार आहेत. राज्यातील एकूण 40 मतदान केंद्रे गुलाबी मतदान केंद्रे म्हणजेच संवेदनशील केंद्रे म्हणून जाहीर करण्यात आली असून उत्तर गोव्यातील पर्वरी या मतदारसंघात सर्वाधिक तक्रारी व मारमारीच्या तक्रारी वाढल्यानंतर हा संपूर्ण मतदारसंघ संवेदनशील घोषित करण्यात आला आहे. तेथे सर्वाधिक पोलीस फौजफाटा पाठविण्यात आला आहे.

महिला मतदारांची संख्या वाढली

या निवडणुकीत पुरुषांपेक्षा महिला मतदारांची संख्या जास्त आहे. गोव्याची एकूण मतदारसंख्या ही 11 लाख 10 हजार 884 एवढी आहे. त्यातील उत्तर गोव्यात 5 लाख 11 हजार 33 तर दक्षिण गोव्यात 5 लाख 99 हजार 851 मतदार आहेत. राज्यात 5 लाख 46 हजार 742 पुरुष तर 5 लाख 64 हजार 142 महिला मतदार आहेत. म्हणजेच पुरुषांपेक्षा 18 हजार महिला मतदार जास्त आहेत.

32 हजार 354 नवमतदार

या निवडणुकीत 32 हजार 354 नवमतदार असून उत्तर गोव्यात 14 हजार 182 तर दक्षिण गोव्यात 18 हजार 172 युवा मतदार आहेत. हे नवमतदार 18 ते 19 वर्षे वयोगटातील आहेत. ते चाळीसही मतदारसंघात विखुरलेले आहेत. हे नवमतदार देखील निर्णायक ठरू शकतात. यातील जास्तीत जास्त म्हणजे किमान 90 ते 95 टक्के मतदार हे मतदान करण्यास प्रचंड इच्छूक आहेत. 20 ते 29 वयोगटातील युवा मतदारांची संख्याही 1 लाख 92 हजार 366 एवढी आहे. 30 ते 39 वयोगटातील मतदारांची संख्या सर्वाधिक म्हणजे 2 लाख 49 हजार 984 आहे. 40 ते 49 वयोगटात 2 लाख 47 हजार 317 तर 50 ते 59 वयोगटात 1 लाख 78 हजार 791 आणि 60 व त्यापेक्षा अधिक वयोगटात 2 लाख 10 हजार 772 मतदार आहेत.

सर्वाधिक वास्को, सर्वात कमी सांत आंद्रे

उत्तर गोव्यात पेडणे तालुक्यात मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या मांद्रे मतदारसंघात सर्वाधिक 31 हजार 326 मतदार आहेत. संपूर्ण राज्यात सर्वाधिक 35 हजार 601 मतदार हे वास्कोत आहेत. सर्वात कमी म्हणजेच 20 हजार 941 मतदार उत्तर गोव्यातील सांत आंद्रेत आहेत. उत्तर गोव्यात सरासरी प्रत्येक मतदारसंघात 13 हजार 669 मतदार येतात, तर दक्षिण गोव्यात 14 हजार 104 मतदार येतात. सर्वसाधारणपणे उत्तर गोव्यात एकेका मतदानकेंद्रावर सरासरी 643 तर दक्षिण गोव्यात सरासरी 707 मतदार येतात.

भाजपसह सर्वांचाच बहुमताचा दावा

भाजपचे नेते संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी विधानसभा निवडणुकीत भाजप पुन्हा सत्तेवर येईल. किमान 26 जागा मिळतील, असा दावा केला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व पक्षाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार लुईझिन फालेरो यांनी पक्षाला या निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळेल, असा दावा केला आहे. मगो पक्षाचे नेते व मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार सुदिन ढवळीकर यांनी मगो, गोवा सुरक्षा मंच व शिवसेना या महायुतीला स्पष्ट बहुमत मिळेल, असे म्हटले आहे. कहर म्हणजे आम आदमी पक्षाने गोव्यात किमान 32 जागांवर यश प्राप्त करून सरकार स्थापन करू असे म्हटले आहे.

या निवडणुकीत मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे, लुईझिन फालेरो, दिगंबर कामत, चर्चिल आलेमाव व रवी नाईक यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. सर्वत्रच अटीतटीच्या निवडणुका होत आहेत. 2012 च्या निवडणुकीत 81.05 टक्के मतदान झाले होते. यंदा 88 टक्के मतदान होईल असा अंदाज निवडणूक अधिकाऱयांनी व्यक्त केला आहे. या निवडणुकीत विद्यमान मुख्यमंत्री, पाच माजी मुख्यमंत्री यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे.

Related posts: