|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » गोव्यात टक्का वाढला, पंजाबमध्ये घटला

गोव्यात टक्का वाढला, पंजाबमध्ये घटला 

गोव्यात 83 तर पंजाबमध्ये 70 टक्के मतदानाची नोंद :

चंदीगढ / वृत्तसंस्था

नोटाबंदीच्या निर्णयानंतर देशात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात पंजाब आणि गोव्यात शनिवारी चुरशीने मतदान झाले. गोव्याच्या तुलनेत पंजाबमध्ये टक्केवारीचे प्रमाण थोडेफार कमी झाले असले तरी दोन्ही राज्यांमध्ये मतदारांचा उत्साह दिसून आला. सायंकाळी मतदानाची वेळ संपल्यानंतर पंजाबमधील 117 जागांसाठी 70 टक्के तर गोव्यातील 40 जागांसाठी 83 टक्के मतदानाची नोंद झाल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले. मतदानानंतर आता जय-पराजयाची भाकिते मांडण्यास सुरुवात झाली असून सर्वच पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून विजयाचा दावा केला जात आहे.

पंजाब आणि गोवा या दोन्ही राज्यांमध्ये शांततेत मतदान पार पडले. काही किरकोळ घटना वगळता मतदान प्रक्रिया सुरळितपणे पार पडली. काही ठिकाणी मतदान यंत्रांमध्ये बिघाड, मतदान केंद्रांमध्ये वीज नसणे, कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची अशा घटना घडल्या. दोन्ही राज्यांमध्ये भाजप आणि काँग्रेस या पारंपरिक पक्षांमध्येच लढत झाली. पंजाबमध्ये यंदा आम आदमी पक्षाची भर पडली असून त्यांच्याकडूनही विजयाचा दावा केला जात आहे.

मागील 2012 विधानसभा निवडणुकीत पंजाबमध्ये 79 टक्के मतदानाची नोंद झाली होती. त्या तुलनेत यंदा थोडीफार घट झाली असून केवळ 70 टक्के मतदान झाल्याचे सांगण्यात आले. गोव्यात मात्र मतदानाची टक्केवारी मागच्या तुलनेत वाढली आहे. मतदानाच्या टक्केवारीचा अचूक आकडा उद्या निवडणूक आयोगाकडून जाहीर केला जाऊt शकतो.

‘नोटाबंदी’चा मुद्दा प्रचारात ऐरणीवर

केंद्रातील मोदी सरकारच्या दृष्टीने या विधानसभा निवडणुका अतिशय प्रतिष्ठेच्या आहेत. नोटाबंदीच्या निर्णयानंतर होणारा हा विधानसभा निवडणुकीचा पहिलाच धडाका असल्याने त्याला विशेष महत्त्व आहे. नोटाबंदीच्या मुद्याला प्रचाराचा मुद्दा बनवत विरोधकांनी भाजपवर शरसंधान साधण्याचा प्रयत्न वेळोवेळी केला. तर भाजपनेही नोटाबंदीच्या निर्णयामुळे होणारे भविष्यात फायदे पटवून देत विरोधकांना तोडीस तोड उत्तर दिले आहे. अखेर या जुगलबंदीचा मतदारराजावर कितपत परिणाम होतो हे निकालाअंतीच स्पष्ट होईल.

11 मार्चला निकाल

2019 च्या लोकसभा निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून या पाच राज्यांच्या निवडणुकीकडे पाहिली जाते. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसून प्रचार केला होता. पंजाबमध्ये अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाच्या सहभागाने निवडणुकीची रंगत वाढली आहे. अकाली दल-भाजप युतीकडे असलेली सत्ता मिळविण्यासाठी आपसह काँग्रेसनेही जोरदार प्रयत्न केल्याचे दिसून आले. तरीही पंजाबमध्ये प्रभावी असलेल्या डेरा सच्चा सौदाने अकाली दल-भाजपला उघड पाठिंबा दिल्याने युतीचे बळ वाढले आहे. पंजाबात दलितांची तब्बल 34 टक्के मते आहेत. ही मते खेचण्याचा प्रयत्न सर्वच पक्षांनी केला आहे. मात्र, या सर्व प्रयत्न-पराकाष्टांची पोचपावती 11 मार्चला निकाल जाहीर झाल्यानंतरच मिळणार आहे. त्यामुळे उमेदवारांना जवळपास सव्वा महिना निकालासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.