|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » सावंतवाडीतील अपघातात दुचाकीस्वारासह युवती गंभीर

सावंतवाडीतील अपघातात दुचाकीस्वारासह युवती गंभीर 

सावंतवाडीट्रक आणि दुचाकीस्वार यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीस्वारासह कॉलेज युवती गंभीर जखमी झाली. सगुण संतोष मुळगावकर (25) व कविता अरुण गावडे (20, रा. दोन्ही दोडामार्ग) अशी जखमींची नावे आहेत. उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी गोवा-बांबोळी येथील रुग्णालयात हलविण्यात आले. हा अपघात शनिवारी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास येथील तीनमुशीजवळ झाला.

येथील गवाणकर कॉलेजची विद्यार्थिनी कॉलेज सुटल्यानंतर दोडामार्ग-कसई येथील सगुण मुळगावकर याच्या दुचाकीवरून घरी जात होती. तिनमुशीजवळ सर्कल येथे दुचाकी हायवेने बांद्याच्या दिशेने जात असताना समोरुन येणाऱया ट्रक व दुचाकीत समोरासमोर अपघात झाला. ट्रक चालकाने प्रसंगावधान राखत ब्रेक केल्याने मोठा अपघात टळला. या अपघातात दुचाकीस्वार सगुण व कविता ही रस्त्यावर फेकल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले. गवाणकर कॉलेजचे प्राचार्य यशोधन गवस यांच्यासह निशू तोरसकर, संजय पेडणेकर, ट्रक चालक-मालक संघटनेचे जॉनी फर्नांडिस यांच्यासह नागरिकांनी मदत कार्यात सहभाग घेतला. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विनायक नाईक, पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद काळसेकर यांनी अपघाताचा पंचनामा केला. अपघातग्रस्त ट्रकसह चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. ट्रक माल उतरून आजरा येथे जात होता. अपघाताबाबत पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत तक्रार दाखल झाली नव्हती.

                    स्पीड ब्रेकरची आवश्यकता

गेल्या महिनाभरात या महामार्गावर अनेक अपघात झाले. महामार्गावर मोठय़ा संख्येने वाहतूक असल्याने बांधकाम व नगरपालिका प्रशासनाने अपघात टाळण्यासाठी तीनमुशी, रुग्णालय रोड, चिटणीस नाका आदी ठिकाणी स्पीड ब्रेकरची व्यवस्था करण्याची मागणी होत आहे.