|Thursday, February 27, 2020
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » दिग्गज उमेदवारांना फटका

दिग्गज उमेदवारांना फटका 

ऑनलाईनचा दणका  मुंबईचे माजी उपमहापौर, उल्हासनगर महापौर , ओमी कलानींचे अर्ज बाद

प्रतिनिधी/ मुंबई

मुंबई महापालिकेसह राज्यातील  10 महापालिकांच्या निवडणुकीसाठी सेना-भाजप युती तुटली, काँगेस आघाडीतही बिनसले. मनसेही स्वबळावरच निवडणूक लढवित आहे. त्यामुळे युती-आघाडीमध्ये आरोप-प्रत्यारोप झाले. काही पक्षांमध्ये आयारामांना उमेदवारी दिल्याने स्वकीय नाराज झाले. जवळजवळ सर्वच राजकीय पक्षांत लहान-मोठय़ा प्रमाणात बंडखोरी झाली. काही ठिकाणी बंडोबांना थंडोबा करण्यात आले. एवढे सर्व होऊनही पक्षाच्या अधिकृत बंडखोरांनी अर्ज भरले. मात्र, आता विविध कारणास्तव काही जणांचे अर्जच बाद झाल्याने त्यांना मोठा धक्काच बसला.

यामध्ये उल्हासनगरच्या महापौर अपेक्षा पाटील यांचा अर्ज तांत्रिक कारणामुळे बाद झाल्याचे समजते. हा मोठा धक्का केवळ महापौरांनाच नव्हे तर शिवसेनेला बसला आहे. महापौर अपेक्षा पाटील यांनी पॅनल क्र. 19 मधून उमेदवारी अर्ज भरला होता. मात्र, अर्जावर पॅनल क्र. 20 मधील सूचक, अनुबोधक यांच्या सहय़ा घेतल्या होत्या. वास्तविक ज्या पॅनलमधून त्यांनी अर्ज भरला तेथीलच सूचक, अनुबोधक असणे नियमाने आवश्यक होते. परंतु, त्यांनी त्यात तांत्रिक चूक केल्याने अर्ज छाननीत त्यांचा अर्ज बाद ठरविण्यात आला. त्यामुळे महापौरांना मोठा राजकीय धक्का बसला आहे.

मुंबईचे माजी, उपमहापौर व बेस्ट समितीचे माजी अध्यक्ष, भाजपचे नगरसेवक दिलीप पटेल यांनी आपला उमेदवारी अर्ज वॉर्ड क्र. 58 मधून भरला होता. परंतु, सन 2012 च्या निवडणुकीत दिलीप पटेल यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने काही महिन्यांपूर्वी न्यायालयाने त्यांना अपात्र ठरविल होते. त्यावर दिलीप पटेल यांनी अपील केल्याने त्यावर स्थगिती आली. प्रकरण कोर्टात होते. दरम्यान, कालच दिलीप पटेल यांनी आपला उमेदवारी अर्ज शेवटच्या क्षणी दाखल केला होता. त्यासाठी वॉर्ड क्र. 58 मध्ये काँग्रेसमधून भाजपात आलेले गुरुदास कामत यांचे भाचे व माजी नगरसेवक समीर देसाई यांना भाजपने उमेदवारी दिलेली असतानाही शेवटच्या क्षणी उमेदवारी अर्ज मागे घेण्यास भाग पाडले गेले होते. परंतु, समीर देसाई यांच्या पत्नी राजुल देसाई यांना वॉर्ड क्र. 56 मधून भाजपने उमेदवारी दिली होती. त्यामुळे समीर यांना दिलासा मिळाला तर दिलीप पटेल यांचा अर्ज अगोदरच्या अवैध जातप्रमाणपत्राच्या प्रकरणामुळे पालिका आयुक्तांच्या आदेशाने बाद ठरविण्यात आला. मात्र, दिलीप पटेल यांच्या मुलाला डमी अर्ज भरायला सांगितला होता. त्यामुळे दिलीप पटेल यांचा अर्ज बाद झाला असला तरी त्यांच्या मुलाने अर्ज भरलेला असल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे.

संजय घाडीगावकरांचा अर्ज बाद

ठाणे महापालिकेत भाजपचे संजय घाडीगांवकर यांनी भरलेला उमेदवारी अर्ज जात प्रमाणपत्र अवैध ठरले असल्याने बाद झाला आहे. त्याबाबत शिवसेनेचे प्रकाश शिंदे यांनी तक्रार केली होती. संजय घाडीगांवकर यांचा अर्ज बाद झाल्याने घाडीगावकर व भाजपला धक्का बसला आहे.

उल्हासनगरात भाजप-ओमी कलानी आघाडीचे उमेदवार ओमी कलानी यांना तीन अपत्ये असल्याने नियमाने त्यांचा अर्ज बाद ठरविला आहे. त्यामुळे ओमी कलानी व भाजपला फटका बसला आहे.

मुंबईतील घाटकोपर (प.) वॉर्ड क्र 126 मधून विद्यमान नगरसेविका प्रतीक्षा घुगे यांनी काँगेसतर्फे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. परंतु, ऑनलाईन प्रक्रियेत त्यांना तांत्रिक अडचणीमुळे प्रिंट उपलब्ध होण्यात अडचण झाल्यामुळे त्यांचा अर्ज बाद झाला.

 

Related posts: