|Sunday, November 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » संकटात खंबीरपणे उभा राहणारा मित्र गमावला

संकटात खंबीरपणे उभा राहणारा मित्र गमावला 

शिवसेना पक्षप्रमुख ठाकरेंची भाजपवर टीका

प्रतिनिधी/ मुंबई

संकटाच्या काळात पाठिशी खंबीरपणे उभा राहणारा मित्र पक्ष तुम्ही गमावला आहे. त्यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी साथ दिली नसती तर गोध्राकांडानंतर मोदींचे काय झाले असते? असा सवाल करीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. महापालिका निवडणूक ही पेंडली मॅच नाही. आम्हाला मित्राबरोबर जुगार खेळायचा नाही. जुगार खेळायला आम्ही जुगारी नाही, असेही ठाकरे यांनी भाजपला ठणकावले.

भाजपच्या नसानसात शिवसेना द्वेष भरला आहे. यातूनच मुख्यमंत्र्यांनी सेनेला औकात दाखवून देण्याची भाषा केली. गेल्यावेळी काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनी महापालिका निवडणुकीत शिवसेना दिसणार नाही असे विधान केले होते. आज शिवसेना इकडेच आहे पण बोलणारे कुठेच दिसत नाहीत, याची आठवण करून देत ठाकरे यांनी जो शिवसेनेला आव्हान देतो तो राजकारणात दिसत नाही हा इतिहास असल्याचे देवेंद्र फडणवीस यांच्या लक्षात आणून दिले.

 उद्धव ठाकरे यांच्या गिरगाव येथील सभेने शनिवारी शिवसेनेने महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ केला. यावेळी बोलताना ठाकरे यांनी भाजपवर हल्ला केला.

 मुंबई महापालिकेवर भगवा फडकवायचा ही शपथ घेऊन मी मैदानात उतरलो आहे. त्यामुळे शिवसैनिकांनी 21 तारखेला हा निश्चय सत्यात उतरवावा, असे आवाहन ठाकरे यांनी केले.  या सभेत ठाकरे यांनी मुंबई महापालिकेत पारदर्शी कारभाराचा हट्ट धरणाऱया भाजपवर केंद्राच्या आर्थिक पाहणी अहवालाचा दाखला देत शरसंधान सोडले. या अहवालामुळे आधीच बोबडे असणाऱयांची बोबडी वळाली आहे. स्वत:च्या हाताने स्वत:चे दात पाडून घेतल्याने आता तुम्ही कसले आरोप करणार? असा उपरोधिक सवाल ठाकरे यांनी केला.

 मुंबई महापालिका निवडणुकीत जी काही कामे झाली त्याचे श्रेय मी मुख्यमंत्र्यांना दिले. त्यांनी चांगल्या कल्पना सूचवल्या नाहीत हे सोडा पण निदान कामात अडथळा आणला नाही हे केवढे मोठे काम केले, असा टोला लगावत ठाकरे यांनी मुंबईतील विकासकामे शिवसेनेने केली आहेत. या कामाशी भाजपचा संबंध नसल्याचे स्पष्ट केले. भाजपचे अध्यक्ष मतभेद आहेत मनभेद नाहीत, असे सांगतात. त्यांची ही भाषा मला समजत नाही. आम्ही हिंदुत्व, राष्ट्रीयत्व सोडत नाही. पाकिस्तानला विरोध करतो. तुम्ही नवाझ शरिफांच्या गळय़ात गळा घालणार असला तर जरूर मतभेद आणि मनभेद आहेत, असे ठाकरे यांनी बजावले.

Related posts: