|Thursday, February 20, 2020
You are here: Home » आवृत्ती » सांगली » मनपा कर्मचाऱयांना किमान वेतन लागू करण्याचा निर्णय

मनपा कर्मचाऱयांना किमान वेतन लागू करण्याचा निर्णय 

प्रतिनिधी /  सांगली

महापालिकेच्या बदली व मानधनावरील कर्मचाऱयांना किमान वेतन लागू करण्याचा निर्णय शनिवारी झालेल्या महासभेत घेण्यात आला. गेल्या तीन महिन्यात नियमित कामावर असलेल्यांनाच याचा लाभ देण्याचाही निर्णय झाला. या निर्णयामुळे कर्मचाऱयांनी महापालिकेसमोर गुलालाची उधळण करीत आणि फटाक्याची आतषबाजी करीत आनंदोत्सवच साजरा केला. या निर्णयाचे श्रेय घेण्यासाठी नगरसेवकांनी पळापळ केली.  दरम्यान, या निर्णयामुळे या कर्मचाऱयांना 14 ते 16 हजारापर्यंत किमान वेतनानुसार पगार मिळणार आहे.

महापालिकेच्या वसंतदादा पाटील सभागृहामध्ये महापौर हारूण शिकलगार यांच्या अध्यक्षतेखाली विशेष महासभा झाली. उपमहापौर विजय घाडगे, आयुक्त रवींद्र खेबुडकर, नगरसेवक उपस्थित होते. मनपा कर्मचाऱयांना  कामगार कायद्यानुसार किमान वेतन आयोग लागू करून त्यानुसार वेतन देण्याचा प्रस्ताव प्रशासनाने सभेत आणला. या विषयावर सभागृहात वादळी चर्चा झाली.  चर्चेनंतर कर्मचाऱयांना किमान वेतन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र गेल्या तीन महिन्यातील कर्मचाऱयाचे हजेरी पत्रक बघूनच त्याला याचा लाभ देण्यात येणार आहे. या निर्णयामुळे सुमारे तीन ते साडेतीनशे कर्मचाऱयांना याचा लाभ होणार आहे. तर मनपावर महिन्याला एक कोटीच्या आपसपास बोजा पडणार आहे. मात्र गेल्या अनेक वर्षापासुन कमी पगारावर काम करावे लागणाऱया कर्मचाऱयांनी हा निर्णय होताच मनपासामोर आंनदोत्सव साजरा केला.

 या विषयाबाबत कामगार अधिकारी हाळींगळे यांनी सभागृहात माहिती देताना मानधनावरील 751 कर्मचारी असून यातील 325 कर्मचारी गैरहजर असावेत, नियमानुसार या कर्मचाऱयांना 13 हजारापासून 16 हजार 240 रू पर्यंत वेतन द्यावे लागणार आहे. सध्या या कर्मचाऱयांवर महिन्याला 65 लाख खर्च होता, या कायद्याची अंमलबजावणी केल्यास महिन्याला 90 लाख रूपयाचा जादा बोजा पडणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रशासनाच्या या स्पष्टीकरणा नंतर उपस्थित सदस्यांनी मते मांडली. प्रशांत पाटील म्हणाले, कायम कर्मचाऱयांना वेतन वाढ देताना महासभेला कधीच विचारले जात नाही. सध्या बदली व मानधनावरील कर्मचाऱयांना तुटपुंजा पगार दिला जाते, त्यामुळे त्यांना वेतन वाढ द्यावी. हा निर्णय घेऊन कामगारांना न्याय देण्याची मागणी युवराज गायकवाड यांनी केली. गैरहजर असणाऱया कर्मचाऱयांना नोटिसा देऊन ते कामावर येणार की नाहीत याची माहिती घ्यावी, अशी मागणी संगीता खोत यांनी केली. प्रदीप पाटील म्हणाले, काम असूनही मुकादम त्यांना पगार देत नाही. कामावर येणारे कर्मचारी किती, याचा आकडा निश्चित करावा. अनारकली कुरणे म्हणाल्या, कर्मचारी संख्या निश्चित करा, आकडा फुगवून बोगस कर्मचाऱयांना वेतन वाढ देणे चुकीचे ठरेल. शासन नियमानुसार वेतनवाढ द्यावी असे मत जगन्नाथ ठोकळे यांनी मांडले. कर्मचाऱयांना मानधन वाढविण्याची गरज आहे. मात्र काम सोडून गेलेल्यांचा आकडा फुगवला आहे. शिफारसीने पुन्हा कर्मचारी कामावर येत आहेत. तसे होऊ नये, पदाधिकारी, अधिकाऱयांच्या घरात काम करणारे पुन्हा सक्रिय होत असल्याचा मुद्दा विष्णू माने यांनी मांडला. युनियनशी वाटाघाटी करून याबाबतची केस काढून घ्यावी, मगच निर्णय घ्यावा, वेतन वाढ दिलाच पाहिजे, अशी भूमिका विवेक कांबळे यांनी मांडली. बालकवाडी सेविकांना वेतन वाढ करण्याची मागणी रोहिणी पाटील यांनी केली.

श्रेय घेण्याच्या चढाओढ

सभागृहात कर्मचारी वेतन वाढीच्या विषयावर अनेक सदस्यांनी आपले मत मांडून कर्मचाऱयांना किमान वेतन लागू करण्याची मागणी केली. महापौरांनीही तसा निर्णय जाहीर केला. यानंतर शेखर माने बोलण्यास उभे राहिले. मात्र त्यांना राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या बहुतांशी नगरसेवकांनी विरोध केला. एकदा महापौरांनी निर्णय दिल्यानंतर पुन्हा बोलू नये अशी मागणी केली. मात्र माने तसेच बोलू लागल्याने राष्ट्रवादीच्या सदस्यांनी महापौरांच्या डायससमोर जावून माने यांना बोलू देऊ नयेत अशी मागणी केली. यावेळी काँग्रेस सदस्यानीही जागेवरून उठून राष्ट्रवादीच्या सदस्यांना पाठिंबा दिला. यामुळे काहीवेळ सभागृहात वादंग झाले. श्रेय घेण्यासाठीच सदस्यांचा हा अटापिटा होत असल्याचा आरोप माने यांनी केला. वेतनवाढ देण्यास विरोध नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. यानंतर सभागृह शांत झाले मात्र राष्ट्रवादीचे काही सदस्य मनपासमोर आंदोलन करीत असलेल्या कर्मचाऱयांसमोर गेले त्यांनी सभेत वेतनवाढीचा निर्णय घेतल्याचे सांगून श्रेय घेण्याचा प्रयत्न केला, असा आरोप शेखर माने यांनी केला.

Related posts: