|Sunday, January 19, 2020
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » दापोलीचे ‘अंगण’ नेमके कोणाचे?

दापोलीचे ‘अंगण’ नेमके कोणाचे? 

दापोली / प्रतिनिधी

दापोली तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती शिवसेना संपर्कप्रमुख विजय कदम यांनी जाहीर केलेल्या उमेदवार यादीवरून निर्माण झालेला गोंधळ थांबाण्याऐवजी वाढतच चालला आहे. या यादीत दळवी समर्थकांना डावल्यामुळे दापोली व मंडणगड कार्यकारीणीने राजीनामास्त्र उगारल्याने ही यादी बदलून त्यात समर्थकांना स्थान दिल्याचा दावा सूर्यकांत दळवी यांनी पत्रकार परिषदेत केला. मात्र, याबाबत संपर्कप्रमुख विजय कदम यांच्याशी संपर्क साधला असता दळवी यांनी सादर केलेली सुधारीत यादी शुक्रवारीच मागे घेतली असून पहिलीच यादी अधिकृत असल्याचे स्पष्ट केले आहे. दळवी व कदम यांच्या या दाव्या-प्रतिदाव्यांमुळे दापोलीचे ‘अंगण’ नेमके कोणाचे असा प्रश्न निर्माण झाला असून शिवसैनिकांमध्ये प्रचंड संभ्रम निर्माण झाला आहे.

जिल्हा संपर्क प्रमुख विजय कदम यांनी चार दिवसांपुर्वी जाहीर केलेल्या यादीला सूर्यकांत दळवी गटाने आक्षेप घेतला होता. आपल्याला डावलण्यात आल्याने दळवी यांच्यासह सर्व पदाधिकाऱयांनी आपले राजीनामे मातोश्रीकडे पाठवले होते. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या दापोली मतदारसंघातील हस्तक्षेपावर तीव्र नाराजी व्यक्त करत ‘मेरे अंगने मे तुम्हारा क्या काम है’ असा संतप्त सवाल दळवी यांनी केला होता.

 यानंतर दळवीसमर्थकांना मातोश्रीवर पाचारण करण्यात आले व नंतर शिवसेना भवन येथे संपर्क प्रमुखांच्या समोर त्यांनी भुमिका मांडल्याचा दावा दळवी गटाने केला होता. या बैठकीचा अहवाल मागवून पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी स्थानिक कोअर कमिटीने निवडलेल्या उमेदवारांची सुधारीत यादी 3 फेब्रुवारी रोजी जाहीर केल्याची माहिती शनिवारी दुपारी सूर्यकांत दळवी यांनी स्वत: पत्रकारांना दिली. तसेच आपली मागणी मान्य झाल्यामुळे राजीनामास्त्रही मागे घेत असल्याच दळवी यांनी स्पष्ट केले. या सुधारीत यादीवरही संपर्क प्रमुख विजय कदम यांची स्वाक्षरी असल्याने दापोली शिवसेनेतील वाद निवळल्याचे दिसत होते. मात्र ही सुधारीत यादी प्रसिध्द केली त्याच दिवशी मागे घेतली असल्याचे व पहिलीच यादी बरोबर असल्याचे संपर्कप्रमुख विजय कदम यांनी दूरध्वनीवरून स्पष्ट केले आहे.  यामुळे शिवसैनिकांमध्ये प्रचंड अस्वस्थता व संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. सूर्यकांत दळवी यांनी पत्रकारांना दिलेल्या सुधारित यादीत पहिल्या यादीतील चार जणांना नारळ देण्यात आला आहे.

माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनी संपर्क प्रमुख विजय कदम यांच्या सहीने  जाहीर केलेल्या सुधारीत यादी नुसार दापोली जिल्हा परिषदेची सुधारित यादी पुढील प्रमाणे. केळशी-रेश्मा झगडे, पालगड-श्रावणी गोलांबडे, हर्णै-विवेक भावे, जालगाव-चारूता कामतेकर, असोंड-अनंत करबेले, बुरोंडी-स्मिता जावकर. तर पंचायत समितीच्या उमेदवारांची सुधारीत यादी पुढील प्रमाणे. केळशी-अनन्या रेवाळे, अडखळ-ऐश्वर्या धाडवे, खेर्डी-स्नेहा गोरिवले, हर्णै-महेश पवार, गिम्हवणे-रूपाली बांद्रे, जालगाव-मनोज भांबिड, टेटवली-भावना धामणे, उन्हवरे-मनिषा खेडेकर, बुरोंडी-अंबरिश हेदुकर, दाभोळ-संतोष आंबेकर, पालगड-सुनिल जाधव व असोंड-वृषाली सुर्वे आदी उमेदवारांची सुधारीत यादी संपर्क प्रमुख विजय कदम यांनी आपल्या लेटरहेडवर सही करून प्रसिध्दीस दिली आहे. मात्र ही यादी देखील आपण मागे घेतली असल्याचे त्यांनी शनिवारी संध्याकाळी तरूण भारतशी दूरध्वनीवरून बोलताना स्पष्ट केले. यामुळे संभ्रमात वाढ झाली आहे.

Related posts: