|Sunday, January 19, 2020
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » कोमसाप रौप्य महोत्सवासाठी मुख्यमंत्री मालगुंडमध्ये

कोमसाप रौप्य महोत्सवासाठी मुख्यमंत्री मालगुंडमध्ये 

रत्नागिरी / प्रतिनिधी

कोकण मराठी साहित्य परिषदेच्या रौप्य महोत्सवी सांगता समारंभानिमित्त मालगुंड येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमांतर्गत 25 फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कोमसापच्या ‘तुतारी’ शिल्पाचे अनावरण तसेच मधुमंगेश कर्णिक साहित्य दालनाचे उद्घाटन होणार असल्याची माहिती कोमसापचे अध्यक्ष डॉ. महेश केळुसकर यांनी दिली.

कोमसापच्या रौप्य महोत्सव सांगता समारंभानिमित्त मालगुंड येथे आयोजित कार्यक्रमांची माहिती देण्यासाठी कोमसापची पत्रकारपरिषद झाली. यावेळी संस्थापक अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक, संस्थेच्या कार्याध्यक्षा नमिता कीर, अरूण नेरुरकर, गजानन पाटील आदी उपस्थित होते.

डॉ. केळुसकर यांनी सांगितले मालगुंड येथे कवी केशवसुत स्मारक संकुलात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱया या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, खासदार विनायक राऊत, पालकमंत्री रवींद्र वायकर, मुंबई भाजपा अध्यक्ष ऍड, आशिष शेलार, आमदार उदय सामंत, आमदार संजय केळकर आदी उपस्थित राहणार आहेत. या प्रसंगी ‘बुकगंगा डॉट कॉम’चे प्रवर्तक मंदार जोगळेकर हे केशवसुत स्मारक ग्रंथालयाला 1 लाख रुपये किमतीची पुस्तके भेट देणार आहेत. 24 फेब्रुवारीला सायंकाळी 4.30 वाजता ग्रामपंचायत मालगुंड ते कवी केशवसुत स्मारकापर्यंत ग्रंथ दिंडी काढण्यात येणार आहे. शशिकांत तिरोडकर यांच्या अध्यक्षतेखाली कविता महासंमेलन होईल. आघाडीचे कवी किरण येले आणि मेघना साने हे त्याचे सूत्रसंचालन करतील.

25 फेब्रुवारी रोजी दुपारी 2.30 वा. अखिल भारतीय साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलींद जोशी यांचा सत्कार करण्यात येणार आहे. ‘मराठी साहित्य- संस्थात्मक व्यवहार’ या विषयावर नमिता कीर या दोघांशी संवाद साधणार आहेत. सायं. 5 निमंत्रित कवींचे कवी संमेलन अशोक नायगावकर यांच्या अध्यक्षतेखाली होईल. महेश केळुसकर, सौमित्र, अरुण म्हात्रे, पुष्पा ग्रज, मधुसुदन नानिवडेकर, नितीन केळकर, प्रदिप पाटील हे आपल्या कविता सादर करतील. सायं. 7.30 वा. ‘मदर्स डे’ ही एकांकिका व पर्यावरणीय मंगळागौर साजरी करण्यात येईल. रात्री 9 वाजता कवी केशवसुत यांच्या कवितांवर आधिरित नृत्याविष्कारांचा कार्यक्रम होणार आहे.

रविवारी 26 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता मराठी भाषा व सांस्कृतीक मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते ‘कोकण साहित्य भूषण’ व अन्य पुरस्कारांचे वितरण होणार आहे. त्यानंतर तावडे यांचे भाषण होईल. केशवसुतांची कविता तुतारी अजरामर आहे. तिचे शिल्प मुंबईतील विशेष शिल्पकार विठोबा पांचाळ यांनी साकारले आहे. त्याचे अनावरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याचे डॉ. केळुसकर यांनी सांगितले.

Related posts: