|Thursday, February 20, 2020
You are here: Home » आवृत्ती » सांगली » ‘रईस’ की ‘काबिल’…!

‘रईस’ की ‘काबिल’…! 

विनायक जाधव/ सांगली

जिल्हापरिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत सर्वच पक्षांच्या पक्षक्षेष्ठींसमोर उमेदवारी कोणाला द्यायचा हा पेच पडला आहे. बंडखोरी कशी थोपावायची, आयाराम-गयारामांना कशी संधी द्यायची अशा अनेक खडतर परिस्थितीतून जिल्हय़ातील सर्वच पक्षांची नेतेमंडळी आता जात आहे. सध्या त्यांच्या डोळय़ासमोर फक्त आणि फक्त  ‘सत्ता’ हस्तगत करणे, हे एकमेव ‘उद्दिष्ट’ आहे. त्यामुळे अनेक खेळय़ा करण्यात पटाईत असणारी ही मंडळी आता शेवटच्या क्षणी पक्षांची अधिकृत उमेदवारीची घोषणा करताना ते ‘रईस’ कि ‘काबील’ उमेदवारांना स्थान देणार ते आज दुपारी तीन वाजता समजणार आहे.

सध्या शाहरूख खान याचा ‘रईस’ आणि हतिक रोशन याचा ‘काबील’ हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर एकमेकांना चांगलीच टक्कर देत आहेत. त्यातून अनेक विनोद ही आता सोशल मिडियातून फिरत आहेत. आता त्याच धर्तीवर जिल्हापरिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत ही विनोद फिरत आहेत. लोक आपल्या मतदारसंघात पक्षक्षेष्ठी ‘रईस’ उमेदवारांना संधी देणार की ‘काबील’ उमेदवाराची इच्छा पुर्ण करणार अशा आशयाची त्या पोस्ट फिरताना दिसत आहेत. त्यामुळे आता पक्षक्षेष्ठी यातील खरोखरच कोणाला संधी देणार हा मात्र ‘यक्षप्रश्न’ आहे आणि तो ते सोमवारी दुपारी तीनच्या आतमध्ये पक्षांचा एबी फॉर्म देवून निश्चितपणे सोडवणार आहेत.

  ‘रईस’च का ?

जिल्हापरिषदेच्या निवडणुकीत उमेदवार हा नेहमी तगडा असण्याची गरज आहे. त्याचा दहा ते बारा गावांवर वरचष्मा असणारा तो पाहिजे. ज्याचा दहा ते बारा गावांवर वरचष्मा आहे असा उमेदवार हा पैशाने ही ‘स्टाँग’ असला पाहिजे म्हणजे तो ‘रईस’ असेल तर मग पक्षांचे काम ही अगदी सोपे होते. त्याला काहीही मदत न करता तो त्याच्या स्वतःच्या हिंमतीवर निवडून येतो. आणि पक्षाला सत्तेच्या स्थानापर्यंत पोहचविण्यासाठी तो प्रयत्न करू शकतो. त्यामुळे सहसा सर्वच पक्षांनी ‘रईस’ उमेदवारांचा शोध सुरू केला आहे. आणि असा शोध आता त्यांचा पूर्णही झाला आहे. अनेक ‘रईसांना’ आता उमेदवारीही अंतीम करण्यात आली आहे. त्यामुळे ज्या पक्षांच्याकडे सर्वाधिक ‘रईस’ उमेदवार आहेत. त्यांची काळजी मिटली आहे. फक्त त्यांना सपोर्ट करणे इतकेच बाकी उरले आहे. त्यामुळे या रईस उमेदवारांच्या पाठीशी सर्वच पक्षांची मंडळी आता उभे आहेत.

 ‘काबील’ का नको ?

पक्षाचे निष्ठावानपणे सातत्याने काम करणाऱया  कार्यकर्त्यांना नेमके उमेदवारी देताना डावलले जाते.  हे फक्त एकाच पक्षात होत आहे असे नाही तर ते सर्वच पक्षांत चालले आहे. याला कारण म्हणजे त्यांना फक्त निष्ठावान आणि त्याठिकाणी ‘काबील’ असणारा उमेदवार नको असतो तर  समोरच्या उमेदवारांपेक्षा जास्त पैसे खर्च करणारा उमेदवार गरजेचा असतो. त्यामुळे फाटक्या ‘काबील’ पेक्षा ‘रईस’ उमेदवार नेहमी तिकिट वाटपाच्यावेळी पक्षक्षेष्ठींचा आवडता असतो. त्यापेक्षा दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हा ‘काबील’ कार्यकर्ता निवडून आला तर त्याला पद मिळते आणि अशी पदे मिळालेली कार्यकर्ते लगेच बदलतात किंवा त्यांची उंची वाढते त्यामुळे त्यांना उंचीची पदे मिळू नयेत म्हणून अशा ‘काबील’ कार्यकर्त्यांचे तिकिट डावलले जाते. आणि असा हा फाटका कार्यकर्ता ही पक्षांच्या विरोधात सहसा उघडपणे ‘बंडखोरी’ करत नाही. त्यामुळे या ‘काबील’ कार्यकर्त्यांना न्याय देण्यात येत नाही. त्यामुळे कोणत्याही पक्षांत काबिल असणऱया कार्यकर्त्यांना अतिशय कमी प्रमाणात संधी मिळते आणि तेच यावेळीही होत आहे.

 बंडोबांना थंडोबा करण्याचे प्रयत्न सुरू

या निवडणुकीत प्रत्येक पक्षांची ताकत क्षीण झाली आहे. त्यामुळे त्यांनी अनेक ठिकाणी आघडी, युती असे प्रयोग सुरू केले आहेत. त्यामुळे या आघाडीला तसेच युतीला काही जागा सोडाव्या लागत आहेत. त्यामुळे अशा ठिकाणी कोणत्याही परिस्थितीत बंडखोरी होवू नये याची दक्षता घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण अनेकांनी गेल्या काही वर्षापासुन या परिसरात निवडणुक लढविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यांची तयारीही पूर्ण झाली आहे ते फक्त पक्षांच्या आदेशानुसार थांबण्याची कोणतीही चिन्हे नाहीत. त्यामुळे अशा बंडखोरांना कसा लगाम घालायचा यासाठी प्रयत्न सुरू झाला आहे. या कार्यकर्त्य़ांनीही पक्ष जर तिकिट देत नसेल तर सरळ पक्षाला सोडचिठ्ठी देवून समोरच्या पक्षांत प्रवेश करण्याचे धोरण स्विकारले आहे. जिल्ह्य़ात अनेक असे मतदारसंघ आहेत की त्या मतदारसंघात फक्त पक्षांकडून तिकिट मिळत नाही म्हणून विरोधी पक्षांत सहजपणे प्रवेश करणारे अनेक इच्छुक आहेत. आणि हा इच्छुक दुसऱया पक्षांत गेल्यामुळे त्या पक्षांतील इच्छुकांच्यासमोर अडचणी उभ्या झाल्याने तोही बंडखोरीच्या तयारीत आहे अशा सर्व बंडखोरांचा कसा मुकाबला करायचा यासाठी पक्षक्षेष्ठींचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.

 निष्ठावान कार्यकर्त्यांच्यावर अन्यायच

या निवडणुकीत पक्षांचा झेंडा अनेक वर्ष घेवुन सातत्याने कार्य करणाऱया निष्ठावान कार्यकर्त्य़ांना मात्र सर्वच पक्षांनी जवळपास डावललेले आहे. त्यांनी आयारामांना संधी देण्याचे धोरण स्विकारले आहे. तसेच ऐनवेळी नातेगोत्यांचे राजकारण सुरू केले आहे. याशिवाय पैशांने सर्वकाही विकत घेण्याची भाषा करणाऱया उमेदवारांना संधी देण्याचा निर्णय घेतला गेल्याने या निवडणुकीत निष्ठावान कार्यकर्त्य़ांच्यावर अन्याय झाला आहे हे निश्चित.

Related posts: