|Sunday, January 19, 2020
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » खार -एक आक्रमक प्राणी

खार -एक आक्रमक प्राणी 

खार हा कृदंत म्हणजे कुरतडून खाणारा प्राणी आहे. त्यामुळं त्यांचे पुढचे दात मोठे असतात. शेंग किंवा कठीण कवचधारी फळांचं कवच फोडून त्यातले दाणे पटापटा तोंडात कोंबायचे. नंतर कोठारात नेऊन ते पिल्लांना भरवायचे. त्या उद्योगामुळं त्यांचे गाल गोबरे दिसतात. शीत कटिबंधातल्या खारी हिवाळय़ाची तर इतरत्र खारी अशी फळे (इंग्रजीमध्ये नट्स) पावसाळय़ाची बेगमी म्हणून साठवतात.

एकटय़ा भारतातच खारींचे अनेक प्रकार आढळतात. त्यातली भीमाशंकर अभयारण्यातील ‘फ्लाइंग स्क्विरल ऊर्फ शेकरू’ प्रसिद्ध आहे. रणजीत देसाईंची ‘शेकरा’ नावाची कादंबरी अशा प्रकारच्या हवेत तरंगत एका झाडावरून दुसऱया झाडावर झेप घेणाऱया खारीवर बेतलेली आहे. वरती आपण जी पट्टेवाली खार बघितली तिच्यासाठी अनेक उपजाती आहेत. पाच पट्टेवाली, तीन पट्टेवाली आणि थोडीशी काळपट पट्टेवाली तसंच हिमालयातही अशा पट्टेवाल्या उपजाती आढळतात. माझ्या मित्रानं एकदा एक झाड पडलेलं बघितलं. तो त्यात घुसला. तेव्हा पुण्यात झोपडपट्टय़ा नव्हत्या. पण बैठय़ा चाळी आणि वाडय़ात एकेका खोलीत मोलमजुरी करणारी माणसं दाटीवाटीनं राहात. मध्यमवर्गीयांच्या आणि चाकरमान्यांच्या घरी धुणीभांडी करणाऱया बाया बापडय़ा कामावर न जाता त्या पडलेल्या झाडाच्या फांद्यांच्या मोळय़ा बांधून घरी नेत होत्या. बाब्याला त्याचं काही वाटलं नव्हतं. ‘बामणा तू इथंच थांब. मी आलोच.’ असं म्हणून तो त्या झाडाच्या फांद्या बाजूला करू लागला. त्यानं झाडाच्या खोडातलं खारीचं घरटं शोधून काढलं. त्यात खार कुटुंबापैकी कुणी नव्हतं.

खारीचं कुटुंब तसं मर्यादित असतं. मादीशी संबंध आला की नंतर नर गायब होतो. कुटुंबाचं पालनपोषण करायची जबाबदारी मादीचीच असते. झाडावरच्या पशुपक्ष्यांना धोक्याची कल्पना लवकर येते. झाड पडणार, असं लक्षात येताच ते दुसरा आश्रय शोधतात. पक्ष्यांची अंडी आणि पिल्लं मात्र अशा झाडपडीत नष्ट होतात.

बाब्यानं त्या ढोलीतून खारीचं घरटं बाहेर काढलं. त्यात कसलीही अंतर्गत सजावट नव्हती. झाडांची पानं, रूईचा कापूस, वृत्तपत्राचे तुकडे यांची गादी असावी बस. 2005-2006 च्या सुमारास किंवा त्याच्या आगेमागे पुणे विद्यापीठाकडे जाणाऱया रस्त्यावर वृक्षतोड झाली. त्यावेळी माझ्या ओळखीचे काही पर्यावरणप्रेमी त्या वृक्षतोडीमुळं किती जीवांचा आसरा गेला, याची पाहणी करत होते. मला ते खारीचं घरटं आठवलं, त्यामुळं मी त्यातल्या एकाला खारीच्या घरटय़ात काय काय मिळालं ते विचारलं. त्याच्या उत्तरानं खारीही आधुनिक बनू लागल्याचं लक्षात आलं. पेपर डिशेस, इलेक्ट्रॉनिक साधनांभोवती गुंडाळतात तो हवा भरलेल्या सुटकुळय़ांचा प्लास्किटचा ताव, सॅनिटरी पॅडचे अवशेष अशा बऱयाच गोष्टींची यादी त्यानं सांगितली. बबल टॅपर हा त्यांच्या गृहसजावटीचा आता भाग बनलाय. एकदा आम्ही खारींची मारामारी बघितली. ज्यांना आपण गरीब प्राणी समजतो, त्यात  खारींचा समावेश करू नये, असं ती जीवघेणी मारामारी पाहून माझं मत बनलं. चिमणे आणि पारवे ही मादी मिळविण्यासाठी असंच जीवघेणं द्वंद्व खेळतात. ती दोन नर खारींची मारामारी होती. खारीच्या नराला आपल्या भाषेत काय शब्द असेल. आपण खारोबा म्हणू शकतो. पण तो अधिकृत शब्द मात्र नाही. इथं भाषा निर्माण करण्याच्यावेळी जे विद्वान होते किंवा ज्यांनी कुणी मराठी भाषा निर्मितीत या शब्दाची जबाबदारी उचलली, त्यांना खारींना प्रजननासाठी नराची आवश्यकता भासणारच, ही कल्पना नव्हती का? किंवा अशा गोंडस प्राण्यात सगळय़ा बापडय़ा माद्याच असणार, असं त्यांना वाटत होतं, हे कळायला काही मार्ग नाही.

या मारामाऱया सर्वसाधारणपणे आपला हिवाळा संपण्याच्यावेळी सुरू होतात. ‘त्यांचा पण शिमगा आहे…’ बाब्या म्हणाला. नंतर यासंबंधी पुस्तकी माहिती मिळाली. त्यावरून मादीशी संबंध आला की नराचं काम संपलं. घरटं सजवायचं, पिल्लं वाढवायचं काम ही मादीची जबाबदारी असते म्हणे. मांजरी जशी तिची पिल्लं घेऊन घरे बदलते. तोच उद्योग खार करतानाही मी बघितलं होतं. मांजरं आमच्या घराचाच एक भाग होती. त्यांना नऊ हा आकडा कसा काय चिकटला असेल? नऊवेळा घर बदलते, नऊ जीव असतात. वगैरे वगैरे. मला पिल्लू घेऊन निघालेली खार बाळय़ानंच दाखवली. मात्र खार किती वेळा घर बदलते. या प्रश्नाचं उत्तर त्याच्याकडे नव्हतं.

मध्यंतरी नॅशनल जिऑग्रॉफीक वाहिनीवर एक मालिका बघितली. त्यात एक कार्यक्रम होता. त्याचं नाव होतं सुपर स्क्विरल. त्यात त्या प्रयोगकर्त्यानं एका डब्यामध्ये भुईमुगाच्या शेंगा ठेवल्या होत्या. त्याला एक झडप होती. ती उघडायला एक पायटं होतं. या भुईमुगाच्या शेंगा आणि ती खार यांच्या दरम्यान बरेच अडथळे होते. आधी एक दोरी मग काही अंतर सोडून छोटेखानी सी सॉ, मग एक पवनचक्कीसारखं चक्र वगैरे. ही खार बिचारी प्रामाणिकपणे अडथळे ओलांडत  तिच्या ध्येयाकडे निघाली होती. तेवढय़ात दुसरी एक खार कुठून तरी आली. शेंगा ज्या खांबावर ठेवल्या होत्या त्या खांबावर तुरूतुरू चढली. ते पायटं दाबलं, डब्यातून बाहेर आलेली शेंग तपासून नंतर तिनं ती ताब्यात घेतली आणि ती विजयी मुद्रेनं ही शेंग घेऊन कसं आणि कुठं जावं, याचा अंदाज घेऊ लागली. तिला आपल्या ज्ञाती बांधवांच्या बुद्धिमत्तेची परीक्षा चालली आहे, याच्याशी काहीच देणंघेणं नव्हतं. एक शेंग दिसतेय, ती आपण मिळवायला काय हरकत आहे, हा साधा सोपा विचार तिनं केला होता.

नॅशनल जिऑग्राफीचा कार्यक्रम बघून खारीबद्दलच्या मनातल्या अनेक शंका दूर झाल्या होत्या. खार पिलांच्या जागा बदलते हे 55-60 वर्षापूर्वी बघितलं होतं. त्यावेळी  मनावर मांजरांचा पगडा होता. त्या काळात दुर्बिण नावाची चीज ऐकूनही माहीत नव्हती. त्यामुळे खारही मांजरासारखीच पिल्लांना धरत असणार हे गृहीत धरलं होतं. प्रत्यक्षात खार पिल्लांना पोटाशी पकडते आणि पिल्लू खारीच्या मानेभोवती वेढा घालते. मग हा प्रवास सुरू होतो. हे सत्य मंदगती चित्रफितीमुळं लक्षात आलं. तसंच म्हाताऱया खारीचं आयुष्य किती करुण असतं, तेही या चित्रफितीतून दिसलं. अशी खार घुबडं, मांजर, घार किंवा वळवळय़ांची शिकार बनते आणि तिची जीवनयात्रा संपते. नेहमी खार म्हटलं की एक गोंडस, गोजिरवाणा प्राणी आपल्या डोळय़ासमोर उभा राहतो. पण तो जगतो कसा हे बघितलं आणि जीवन संघर्ष म्हणजे काय ते लक्षात आलं. आता सकाळी जेव्हा खारीचं ओरडणं ऐकतो तेव्हा ‘हे माझं राज्य आहे’ असं ती जाहीर करीत असल्याचं स्पष्टपणे कळतं. जेव्हा तिचा किलकिलाट वाढतो. तेव्हा तिच्या चतुःसीमेत कुणी तरी परकी खार प्रवेश करू पहात आहे, हे लक्षात येतं. मग तिचा किलकिलाट पूर्ववत होतो. तेव्हा तिनं ‘खबरदार, कान चावून शिक्षा करीन’ असा तिचा दम यशस्वी झाला हे जाणवतं. मग खार तिच्या आणि मी माझ्या उद्योगास पुन्हा सुरुवात करतो.

Related posts: