|Sunday, January 19, 2020
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » साधूचा मृत्यू संकल्प

साधूचा मृत्यू संकल्प 

वै. प्राचार्य सोनोपंत (मामा) दांडेकर यांचे बरोबरच वै. बंकटस्वामी, वै. लक्ष्मणबुवा इगतपुरीकर, वै. मारुतीबुवा गुरव, वै. पांडुरंग शर्मा, वै. लक्ष्मणबुवा कुंडकर असे अनेक कर्तृत्ववान शिष्य जोग महाराजांनी तयार केले. त्यांनी वारकरी सांप्रदायाचा मोठा प्रसार केला. तसेच प्रसिद्ध राष्ट्रीय कीर्तनकार वै. डॉ. दत्तोपंत पटवर्धन हे देखील जोग महाराजांचेच शिष्य होत. जोग महाराजांच्या जीवनातील काही प्रसंग पहा –

हरिकीर्तन करून कुणी पैसे घेऊ लागला की ते त्याच्यावर संतापत. ‘तर मग पोट भरण्यासाठी मी काय करू?’ या प्रश्नावर ते लगेच उत्तर करीत, ‘-वाटेल ते कर! हमाली केलीस तरी चालेल. पण हरिनाम असे विक्रीस काढू नकोस.’ इंग्रजांची (सरकारी) नोकरी करणे या गोष्टीचा ते अतिशय तिटकारा करीत. तुकाराम महाराजांच्या म्हणण्याप्रमाणे –

आम्हा हे कौतुक जगा द्यावी नीत ।

करावे फजीत चुकती ते ।

असे त्यांचे वर्तन होते. कुणी चुकीच्या मार्गाने जाऊ लागला, की त्यांनी त्याला धरून चमकावलाच. जाऊ दे, आपल्याला काय करायचे आहे, अशी चालढकल त्यांच्याजवळ अजिबात नव्हती, ढोंग दिसले की आपली काठी घेऊन ते त्याच्यावर तुटून पडलेच!

विदर्भातील एक तथाकथित साधू पुण्यास आले. त्यांनी आंतरदृष्टीने एका भल्या माणसाची विधवा ही गेल्या जन्मी आपलीच पत्नी होती, असे ओळखले होते म्हणे! पुण्यातील एका सत्प्रवृत्त देशभक्तांनीच त्यांचे प्रस्थ वाढविण्यास प्रारंभ केला. बुवा उठले आणि दण्डा घेऊन त्या साधूच्या मुक्कामी जाऊन उभे राहिले. त्यांनी त्या साधूला असे खडसावले, की लगेच गाशा गुंडाळून तो जो पळाला, तो बुवा असे पर्यंत पुन: पुण्यास आला नाही. आपली सर्व संपत्ती बुवांनी वारकरी शिक्षण संस्थेला दिली. बुवा स्वत: पत्र लिहीत नसत. कधी लिहिण्याचा प्रसंग आला तर दुसऱयाला सांगत. एकदा मामांवर पत्र लिहिण्याचा प्रसंग आला. ते लिहीत असताना नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे पत्राच्या शेवटी ’आपला’ असे मामांनी लिहिले आणि बुवांपुढे सहीकरता कागद केला. बुवा

म्हणाले हे ’आपला’ खोड. आम्ही फक्त ज्ञानदेवाचे आणि देवाचे! पुन: कधी मामांनी ’आपला’ असे बुवांच्या पत्रात लिहिले नाही. आपला देह आळंदी येथेच ठेवायचा हा बुवांचा निर्धार संकल्प होता. त्याप्रमाणे ते आदल्या दिवशी निघून मामा दांडेकर व लक्ष्मणबुवा इगतपुरीकर यांचेबरोबर पुण्याहून घोडागाडीने आळंदीस आले. घांसवालेंच्या धर्मशाळेत ते उतरले. मामांना इंद्रायणींचे व ज्ञानोबा माउलींचे तीर्थ आणावयास सांगितले. ते तीर्थ आणल्यावर जोग महाराजांनी ते प्राशन केले. जोग महाराज उत्तरेकडे तोंड करून मांडी घालून बसले. मामांना हाक मारली व डोळे मिटून मी जातो असे म्हटले. माउलींच्या चिंतनात ते अनंतात विलीन झाले. ज्ञानेश्वरीत वर्णन केल्याप्रमाणे त्यांनी देह ठेवला.

का झांकलीये घटीचा दिवा । नेणिजे काय जाहला केव्हा । या रिती तो पांडवा । देह ठेवी ।

– ऍड. देवदत्त परुळेकर

Related posts: