|Saturday, January 25, 2020
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » न जमलेली मैफिल

न जमलेली मैफिल 

डोंबिवलीचे साहित्य संमेलन भरवण्यासाठी आयोजकांनी बराच मोठा खर्च व कष्ट केले. पण अंतिमतः मैफिल काही जमली नाही. संमेलनातील कोणतेही एक भाषण किंवा एक चर्चा लक्षात राहील अशी काही झाली नाही. प्रेक्षक वा श्रोते फारच कमी संख्येने हजर राहिले. त्यामुळे बिनगर्दीचे आणि बिनचेहऱयाचे संमेलन असेच त्याचे वर्णन करावे लागेल. गेल्या काही काळात ग्रामीण भागात झालेल्या काही साहित्य संमेलनांना खरे तर विक्रमी प्रतिसाद मिळाला होता. संमेलन हा वाचक जनांचा उरुस वा जत्रा आहे हे आता सर्वांनी मान्य केले आहे. जत्रेत हवशे, गवशे आणि नवशे येतात तसे ते येथेही येतात. त्यांची गर्दी खेचण्यासाठी मग वेगवेगळ्या युक्त्याही लढवल्या जातात. उदाहरणार्थ अमिताभ बच्चन यांनाच संमेलनाच्या उद्घाटनाला बोलावणे. या आणि अशाच प्रकारातून संमेलन हादेखील एक मोठा मनोरंजक व दिलखेचक इव्हेंट ठरू लागला होता. डोंबिवलीत मात्र ना असा इव्हेंट घडला ना कोणत्या गंभीर साहित्यिक चर्चा झाल्या. गेल्या काही वर्षांपासून त्या त्या गावातील बलिष्ठ राजकारण्यांनी संमेलनाचे स्वागताध्यक्षपद घ्यायचे हा आता रूढ झालेला संकेत आहे. त्यामुळे सरकारी परवानग्यापासून पैसे जमवण्यापर्यंत आणि मंत्र्यांना बोलावण्यापासून ते गर्दी जमवण्यापर्यंत अनेक गोष्टी सुकर होतात. यंदाही डोंबिवलीतील आगरी नेते गुलाब वझे यांनी ही जबाबदारी घेतली होती. त्यांचे आयोजन नेटके होते. साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांनीही अनेक प्रकारचे नियोजन केले. पण प्रत्यक्षात त्यातून मोठा इव्हेंट उभा राहू शकला नाही. मध्यमवर्गीय नोकरदार मराठी माणसाचे उपनगर अशी पूर्वापार डोंबिवलीची ओळख आहे. या वर्गाला पुस्तक, नाटक, सांस्कृतिक कार्यक्रम यांची चांगलीच आवड आहे. परंतु या वर्गापैकी बहुसंख्य लोक संमलनाकडे फिरकलेही नाहीत. खरे तर संमेलनात प्रचंड संख्येने परिसंवाद, मुलाखती आणि चर्चा होत्या. पण त्यांची इतकी कोंबाकोंबी केलेली होती की कोणत्याच विषयाला व वक्त्यांना न्याय मिळाला नाही. तीन तीन मांडवांमध्ये एकाच वेळी चर्चा, परिसंवाद वा मुलाखतींचे घाणे घातल्यामुळे श्रोत्यांनाही कोणत्याच एका ठिकाणी धडपणे जाता आले नाही. सध्या रिमोट कंट्रोल हातात असल्याने लोकांना सतत टीव्ही चॅनेल्स बदलण्याचा चाळा लागलेला आहे. त्याच धर्तीवर येथेही लोकांनी सतत या मांडवातून त्या मांडवात जावे अशी आयोजकांची कल्पना होती की काय नकळे. तीन दिवसात असे जवळपास अठरा कार्यक्रम झाले. यातही ग्रामीण स्त्राr-वास्तवातील व साहित्यातील, बालकुमार साहित्याचे काय झाले किंवा मराठी समीक्षेची समीक्षा असे नेहमीचे यशस्वी विषय होतेच. दुसरीकडे आयआरबीचे जयंत म्हैसकर यांच्यापासून ते मेधा पाटकर वा कमलाकर सोनटक्के यांच्यापर्यंत वाटेल त्या लोकांच्या मुलाखतीही यात होत्या. या सर्वांना प्रसिद्धीमूल्य असले तरी साहित्यव्यवहाराशी यांचा संबंध काय हा प्रश्न बाकी उरतो. मराठी समीक्षेची समीक्षा हा खरे तर गंभीर विषय आहे. हरिश्चंद्र थोरात, आनंद पाटील ते नितीन रिंढे यांच्यापर्यंतचे सर्व सहभागी वक्तेही अत्यंत मान्यवर व या विषयात महत्त्वाचे योगदान करू शकणारे होते. पण जत्रेच्या फडात लावणी आणि तमाशा बाजी मारून जातो, भीमसेन जोशी किंवा कुमार गंधर्वांचे गायन तेथे कोणी ठेवत नाही वा ऐकायला येत नाही. तसे यासारखे परिसंवाद येथे अस्थानी ठरतात. संमेलनाच्या अध्यक्षांचे भाषण हा अनेकदा या तीन दिवसांच्या कार्यक्रमांचा महत्त्वाचा केंद्रबिंदू ठरतो. मात्र त्या आघाडीवरही या संमेलनात पार निराशा झाली. 1950 ते 1980 सालापर्यंतचे मराठी साहित्यविश्व हे बरेचसे एकात्म होते. याचाच दुसरा अर्थ ते अत्यंत संकुचित होते असे काहीजण म्हणतात. पण ते काहीही असले तरी पूर्वी नागपूरपासून नाशिकपर्यंत आणि मुंबईपासून नांदेडपर्यंतच्या सर्व ठिकाणी प्रभाव उमटवण्याची ताकद असलेले कवी, लेखक वा समीक्षक होते. कुसुमाग्रज, नारायण सुर्वे, पु. ल. देशपांडे हे सर्व मराठी साहित्यविश्वातील मान्यवर असे लेखक होते. 1990 नंतर असे सर्वमान्य लेखक वा कवी झपाटय़ाने कमी होत चालले आहेत. आता साहित्यविश्व नागरी, ग्रामीण, बहुजन, दलित, ब्राह्मणी, वैदर्भी, मराठवाडी, मुस्लीम अशा विविध भितींनी खंडित झाले आहे. त्यामुळे सर्वांना मान्य होईल असा हिरो उदयाला येणे कठीण बनले आहे. पूर्वी असा हिरो अध्यक्ष झाला की ते ते संमेलन त्या त्या अध्यक्षाभोवती फिरे. अंबाजोगाईचे व्यंकटेश माडगूळकरांचे भाषण किंवा परभणीचे नारायण सुर्वे यांचे भाषण हे कित्येक वर्षे लोटून गेली तरी लोकांच्या लक्षात असते. दुर्दैवाने अलीकडे अशा तोलामोलाचे साहित्यिकही उरलेले नाहीत व त्या दर्जाची भाषणेही घडत नाहीत. डोंबिवली संमेलनाचे अध्यक्ष अक्षयकुमार काळे हे गंभीर समीक्षक आहेत. त्यामुळे भाषा व साहित्य व्यवहारासंदर्भात ते काही मूलगामी चिंतन मांडतील अशी अपेक्षा होती. अलीकडच्या प्रथेप्रमाणे मराठी निप्रभ होत असल्याचे व्याकुळ गाणे त्यांनी गायिले. पण हा प्रभाव वाढवण्यासाठी काय करता येईल हे ते सांगू शकलेले नाहीत. रसिकांनी कोणत्याही पूर्वग्रहाशिवाय साहित्यकृतीचा आस्वाद घ्यावा असेही प्रतिपादन त्यांनी केले आहे. पण त्यासाठी त्यांनी अनाठायी अनेक पाने व इतके दुर्बोध शब्द खर्ची घातले. मुळात त्यांची निवड झाली तेव्हा कोण हे काळे असा प्रश्न निर्माण झाला होता. त्याला उत्तर देण्याची व रसिकांच्या हृदयाशी संवाद साधण्याची चांगली संधी त्यांना होती. पण स्वतः कवी असूनही त्यांनी ती गमावली. गेली काही वर्षे संमेलने कोणत्या ना कोणत्या राजकीय वा सामाजिक वादाने गाजत असतात. यंदा तसे काही झाले नाही. यंदा कल्याण पालिकेतील 27 गावांची वेगळी पालिका करावी या मागणीवरून बरेच रामायण झाले. त्याचा साहित्यव्यवहाराशी नव्हे तर आयोजकांच्या राजकारणाशी अधिक संबंध होता. एकूण एकाच वेळी अनेकांचे लागलेले वेगवेगळे सूर आणि गाणारा मात्र कोणीही चांगला नाही अशी ही सर्व मैफिल झाली. असेच जर होणार असेल तर संमेलने भरवायला हवीतच का याचा गंभीरपणे विचार करायला हवा.

Related posts: