|Sunday, November 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » ‘द बॉम्बे आर्ट सोसायटी’चा इतिहास उलगडणार

‘द बॉम्बे आर्ट सोसायटी’चा इतिहास उलगडणार 

इतिहास-वाटचाल प्रदर्शन, पुस्तकाचे प्रकाशन

मुंबई / प्रतिनिधी

स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांनी स्थापन केलेल्या या संस्थेने 124 प्रदर्शने केली. या वर्षी 125 व्या वर्षानिमित्त एका भव्य आणि आगळ्या प्रदर्शनाचे आयोजन संस्थेने केले आहे. हे प्रदर्शन म्हणजे कलेच्या इतिहासाच्या काही ठळक वैशिष्टय़ांचे प्रत्यक्ष दर्शन आहे. संस्थेच्या वार्षिक प्रदर्शनातील सुवर्णपदक आणि गव्हर्नर्स प्राईज विजेती चित्रे याद्वारे इतिहासाचा हा विस्तृत पट संक्षिप्त करुन नेटकेपणे प्रथमच व्यक्त होत आहे. 128 वर्षांचा इतिहास असलेल्या या कलासंस्थेतर्फे सिंहावलोकनी ‘द बॉम्बे आर्ट सोसायटी (1888-2016) : इतिहास आणि वाटचाल’ प्रदर्शन मुंबईच्या नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट येथे 10 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. हे प्रदर्शन 26 मार्चपर्यंत सुरू राहील.

प्रसिद्ध चित्रकार आणि कलाअभ्यासक सुहास बहुळकर यांनी हे प्रदर्शन अभिरक्षित (क्युरेट) केले आहे. प्रस्तुत प्रदर्शनात बॉम्बे आर्ट सोसायटीच्या गेल्या 124 प्रदर्शनांमधून प्रदर्शित झालेल्या आणि सुवर्णपदक आणि गव्हर्नर्स प्राईज मिळालेल्या कलाकृतींचा समावेश केला आहे. यामध्ये राजा रविवर्मा, जे. पी. गांगुली, ए. एक्स. त्रिंदाद, गणपतराव म्हात्रे, एस. एल. हळदणकर, व्ही. पी. करमरकर आणि आधुनिक शैलीतील चित्रकारांपैकी अमृता शेरगिल, के. के. हब्बर, के. एच. आरा, एच. एस. रझा, मोहन सामंत, व्ही. एस. गायतोंडे, शिल्पकार आदी दाविएरवाला यांच्या बरोबरच सध्याच्या पिढीतील तरुण कलावंतांच्या कलाकृतींचाही समावेश आहे. या प्रदर्शनासोबतच ‘द बॉम्बे आर्ट सोसायटी (1888-2016): इतिहास आणि वाटचाल’ या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. सदर पुस्तकात या जुन्या कलासंस्थेचा उज्ज्वल इतिहास कलानिर्मितीच्या विश्लेषणासह मांडण्यात आला आहे.

प्रसिद्ध शिल्पकार सदाशिव साठे, कलारसिक आणि अभ्यासक डॉ. फिरोजा गोदरेज, छत्रपती शिवाजीमहाराज वस्तुसंग्रहालयाचे संचालक सभ्यासाची मुखर्जी आणि कला इतिहासकार आणि अभ्यासक प्रा. दीपक कन्नल या मान्यवरांच्या उपस्थित उद्घाटन सोहळा होणार आहे.

हे प्रदर्शन आधुनिक भारतीय कलेच्या स्थित्यंतरातील एक महत्त्वाचा टप्पा असून आत्तापर्यंतच्या विकासाचा आलेख यातून स्पष्ट होतो.

चित्रकार वासुदेव कामत, बॉम्बे आर्ट सोसायटीचे अध्यक्ष

Related posts: