|Saturday, February 29, 2020
You are here: Home » क्रिडा » वेवरायडर्स अद्याप पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत

वेवरायडर्स अद्याप पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत 

हॉकी इंडिया लीग : आज विद्यमान विजेत्या जयपी पंजाब वॉरियर्सविरुद्ध पुढील साखळी सामना

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

हॉकी इंडिया लीग स्पर्धेत माजी विजेते दिल्ली वेवरायडर्स या हंगामात अद्याप पहिल्या विजयाच्या शोधात असून आज (दि. 7) विद्यमान विजेत्या जयपी पंजाब वॉरियर्सविरुद्ध त्यांची साखळी लढत होईल. या स्पर्धेत 2014 मध्ये विजेतेपद संपादन करणाऱया दिल्ली वेवरायडर्सला यंदा विजयश्रीने प्रत्येक वेळी हुलकावणी दिली आहे. आतापर्यंत खेळलेल्या 3 सामन्यांपैकी 1 अनिर्णीत राहिला तर 2 लढतीत त्यांना पराभव स्वीकारावा लागला.

वेवरायडर्सला यंदा कलिंगा लान्सर्सविरुद्ध 0-1 तर दबंग मुंबईविरुद्ध 2-3 अशा फरकाने पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर रांची रेजविरुद्धची लढत गोलशून्य बरोबरीत राहिली. शिवाजी स्टेडियमवर होणाऱया आजच्या लढतीत रुपिंदर पाल सिंगच्या नेतृत्वाखाली दिल्लीचा संघ घरच्या चाहत्यांचे पाठबळ पाठीशी असल्याने याचा लाभ घेऊ शकणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

दिल्लीला या हंगामात अद्याप एकही विजय संपादन करता आला नसला तरी संघप्रशिक्षक सेड्रिक डिसोझा यांनी मात्र या योगदानावर आपण समाधानी असल्याचे म्हटले आहे. आपल्या खेळाडूंना मिळालेल्या संधीचा लाभ घेता आला नाही, इतकी बाब चिंतेची असल्याचे ते यावेळी म्हणाले. ‘सांघिक स्तरावर आमचा संघ चांगला खेळला. मात्र, वर्चस्व गाजवल्यानंतर देखील गोल करता आले नाहीत, ही बाब फटका देणारी ठरली. आम्ही 3 सामन्यात केवळ 4 गोल स्वीकारले, हे देखील लक्षवेधी ठरावे’, याचा त्यांनी पुढे उल्लेख केला.

वेवरायडर्ससह पंजाब वॉरियर्स व उत्तर प्रदेश विझार्ड्स या संघांनीही आतापर्यंत प्रत्येकी 3 सामने खेळले आहेत. याचवेळी, गुणतालिकेत आघाडीवर असलेल्या दबंग मुंबई, कलिंगा लान्सर्स व रांची रेज या संघांनी प्रत्येकी 7 सामने खेळले आहेत. आजच्या लढतीसाठी वेवरायडर्सचा संघ तब्बल एका आठवडय़ाच्या कालावधीनंतर मैदानात उतरेल. यापूर्वी, दि. 30 जानेवारी रोजी त्यांचा शेवटचा सामना झाला होता.

दिल्लीचे प्रशिक्षक डिसोझा यांनी या स्पर्धेच्या वेळापत्रकाबाबत आपण फारसे बोलू इच्छित नाही, असे नमूद केले. मात्र, त्यावर आपले नियंत्रण असण्याचे काही कारण नाही, याचा उल्लेख केला. वेवरायडर्सची फॉरवर्ड लाईन आतापर्यंत आपला ठसा अजिबात उमटवू शकलेली नाही. त्या पार्श्वभूमीवर, सांघिक रणनीतीत काय बदल करावेत, यावर सध्या व्यवस्थापनात खल सुरु आहे. 

या स्पर्धेत साखळी फेरीअखेर पहिले 4 संघ उपांत्य फेरीत दाखल होणार असून त्यामुळे आपल्या संघाला अद्याप संधी आहे, असे डिसोझा यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. कनिष्ठ गटात विश्वचषक जेत्या संघातील मनदीप सिंग, हरजीत सिंग, सांता सिंग व परविंदर सिंग यांच्यावर दिल्ली संघाची आणखी एकदा भिस्त असू शकेल, हे जवळपास स्पष्ट आहे.

Related posts: