|Wednesday, November 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » झिरो नंबरचा चष्मा

झिरो नंबरचा चष्मा 

ब्रेक (अप) के बाद !

दिनेश दुखंडे

सध्या सिक्वेलचा जमाना आहे… एखादा फॉर्म्युला हिट ठरला की तशाच पद्धतीच्या चित्रपटांची जणू रांगच लागते… तसंच काहीसं शिवसेना-भाजप युतीचं आहे… विधानसभा आणि त्यापाठोपाठ कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीचा चित्रपट हिट ठरल्यानंतर युती पुन्हा एकदा सज्ज झालीय… एका मोठय़ा ब्रेक नंतर… नव्या गल्लाभरू चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी… युतीचंच हे होम प्रोडक्शन आहे… मुंबई महापालिका निवडणुकीसाठी स्क्रिप्ट आणि डायलॉग्स तयार झाले आहेत… नेहमीचेच यशस्वी कलाकारही सज्ज आहेत… गेल्या सहा महिन्यांपासून चित्रपटाचे अपकमिंग टिझर्स आणि ट्रेलर्स प्रत्येक न्यूज चॅनेलवर धुमाकूळ घालताहेत… त्यामुळे प्रेक्षकाच्या भूमिकेत असलेल्या मतदाराचीही उत्सुकता आता शिगेला पोचलीय…

गेल्या विधानसभेच्या प्रचारात अफझलखान-औरंगजेबाच्या फौजा, निजामाचं सरकार अशी टीका झाली होती… कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या प्रचारात  वाघाच्या जबडय़ात घालुनी हात, मोजतो दात असं प्रत्त्युत्तर देण्यात आलं होतं… त्यामुळे युतीच्या या नव्या चित्रपटातही डॉयलॉगबाजीची तडतडीत फोडणी दिली असणार याबाबत तिळमात्र शंका नाही… चित्रपटाच्या ट्रेलरमधला ‘मुंबई महापालिकेतला माफिया राज संपवा’ हा संवाद गेले सहा महिने तुफान गाजतोय… त्यामुळे संपूर्ण चित्रपटाची भिस्त या डायलॉगवरच आहे. आक्रमक डायलॉग्जमुळे चित्रपटात जबरदस्त ऍक्शन असणार हे नक्की आहे… आणि निवडणुकीच्या तोंडावर युतीतल्या दोन्ही पक्षांनी गुंडांना प्रवेश देऊन प्रेक्षकांना जणू काही त्याची खात्रीच पटवून दिलीय… मधे मनसेनं शिवसेनेकडे युतीचा प्रस्ताव पाठवून चित्रपटामधे सस्पेंस निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता… त्यावेळी ‘भाई तुम साईन करोगे या नही’ हा दीवार चित्रपटातला प्लॉट जरा वेगळय़ा पद्धतीनं चित्रित करण्याचा विचार झाला होता… पण चित्रपटाच्या कथानकाला सध्यातरी या प्लॉटची गरज नसल्याने तो कापण्यात आलाय, पण कायमचा डिलिट केलेला नाहीये… कारण कोण जाणो गरज भासल्यास ऐनवेळी क्लायमॅक्समधे तो टाकलाही जाऊ शकतो असं दिग्दर्शकाचं म्हणणं आहे…

बिग बजेट चित्रपट असल्याने त्याची स्टारकास्टही तितकीच तगडी आहे… मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे प्रमुख भूमिकेत आहेत… मुंबई महापालिकेच्या सत्तेभोवती या चित्रपटाचं कथानक फिरतंय… तर आशीष शेलार, किरीट सोमय्या, अनिल देसाई, अनिल परब ही मंडळी सहाय्यक अभिनेत्यांच्या भूमिकेत आहेत… मतदारांना कुठेही कंटाळा येऊ नये याची दिग्दर्शकानं विशेष काळजी घेतलीये… त्यामुळे चित्रपटात मधेमधे वेगवेगळी पात्रं येऊन छोटय़ाशा भूमिकांमधून आपली छाप पाडून जाताहेत… रामदास आठवले यांनी आपल्या चारोळय़ांमधून कॉमेडीची बाजू सांभाळलीय… तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष हे गेस्ट आर्टिस्ट असले तरी त्यांच्यावरच चित्रपटाचा तोल सांभाळण्याची भिस्त आहे… ऍक्शन्डपॅक चित्रपट असल्यानं गाणी नकोच असं ठरलंय. मात्र, इम्पॅक्टसाठी बॅकग्राऊंड म्युजिक जास्त जोर देण्यात आलाय…

चित्रपट सध्या प्री प्रोडक्शनमधे आहे, बराचसा भाग शूट होणं बाकी आहे… मुंबईतल्या विविध नाक्यांवर त्याचं शूटींग होईल… शूटींगसाठी अभिनेत्यांच्या तारखाही निश्चित झाल्याहेत… तरी काही अभिनेत्यांच्या तारखांचा अजूनही गोंधळ आहे… व्हॅनेटी वॅन्स बुक झाल्याहेत… अभिनेत्यांकडे त्यांचे डायलॉग्ज आणि क्रिप्टही पाठवण्यात आलंय… कौरव-पांडवांच्या धर्मयुद्धासारखा एखादा सीन असावा असा प्रमुख अभिनेत्यांचा आग्रह आहे… त्यामुळे भारतीय चित्रपटसफष्टीतल्या क्लासिक सॅक्रेस्टिक कॉमेडी म्हणून गाजलेल्या कुंदन शहा निर्मित ‘जाने भी दो यारों’च्या क्लायमॅक्सच्या चौर्यकर्माची (इन्स्पिरेशन) तयारी दिग्दर्शकाने सुरू केलीय…

एव्हाना अभिनेत्यांनी घरातल्या आरशासमोर उभं राहून डायलॉग डिलिव्हरी, ऍक्टींगचा सराव सुरू केलाय… प्रत्येकाला मतदारांपुढे आपल्या अभिनयातून छाप पाडायचीये… प्रत्येकाला बेस्ट ऍक्टींगचा अवॉर्ड हवाय किंवा किमान आपली भूमिका तरी लक्षात राहिली पाहिजे यावर प्रत्येकाचा भर आहे… प्रेक्षकांच्या भूमिकेत असलेल्या मतदारांना या चित्रटातले काही प्रसंग अन्य काही घटनांशी मिळते जुळतेही वाटतील… किंवा विधानसभा, कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीतीलही काही प्रसंग त्यात दिसतील… पण ते प्रसंग घुसवण्यात आलेले नाहीत, तर ती कथानकाची गरज असल्यानं टाकण्यात आले आहेत असं दिग्दर्शकाचं म्हणणं आहे… 21 फेब्रुवारी ते 23 फेब्रुवारी मधे व्होटिंग व्हिंडोवर या चित्रपटाचं भवितव्य ठरणार आहे… युतीच्या विधानसभा आणि कल्याण-डोंबिवली महापालिका चित्रपटांना मतदारांनी भरभरून प्रतिसाद दिला… हे दोन्ही चित्रपट व्होटिंग व्हिंडोवर हिट ठरले होते… त्यामुळे यंदाही दिग्दर्शकाकडून अपेक्षा उंचावल्याहेत… पण प्रत्येकवेळी सिक्वेलचा फॉर्म्युला हिट ठरतोच असे नाही… याही सिक्वेलचं भवितव्य सूज्ञ मतदारांच्या हातात आहे… तोपर्यंत इतकंच म्हणता येईल… लाईट-साऊंड, पॅमेरा…. ऍण्ड ऍक्शन !!!!!

Related posts: