|Thursday, February 27, 2020
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » ‘ठाणे’ कुणाचे?

‘ठाणे’ कुणाचे? 

ठाणे महानगरपालिकेची स्थापना 1982 ला झाली. त्यावेळेपासून दोन अपवाद सोडले तर कायमच ठाणे हे शिवसेनेचे राहिले आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अनेकदा ठाणेकरांचे आणि आपले भावनिक नाते असल्याचे सांगितले. बाळासाहेबांनी जाहीर सभेत लोकांना वाकून नमस्कार करण्याचा प्रसंग राज्याच्या राजकारणात फक्त ठाणेकरांनीच अनुभवला. गेल्या 2 तपांची शिवसेनेची सत्ता प्रामुख्याने एकहाती राहिली आहे. पण, एक वेळचा अपवाद वगळता ठाण्यात कायमच शिवसेनेने भाजपा सोबत युती करून निवडणुका लढवल्या आहेत. ज्यावेळी भाजपाने स्वतंत्रपणे निवडणुका लढवल्या त्यावेळी सेनेला तर फायदा झालाच तसाच भाजपालाही झाला होता. पण यावेळचं चित्र फारच वेगळं आहे.

गेल्या 5 वर्षात ठाण्याच्या खाडीतून खूप पाणी वाहून गेलं आहे. 1990 मध्ये सुमारे 8 लाख असलेला लोकसंख्येचा आकडा आता 27 लाखांच्या घरात पोहोचला आहे. मुंबईच नाही तर बाहेरूनही मोठय़ा प्रमाणात विविध भाषिक लोक ठाणेकर झाले आहेत. सध्याच्या तरुणाईला ‘शिवसेनेचे ठाणे’ फक्त ऐकून माहीत आहे. कारण बदललेल्या राजकारणातले आनंद दिघे, यांच्यासारखे नेते आज नाहीत तर वसंत डावखरे यांच्यासारखे नेते सक्रीय राजकारणात नाहीत. या दोघांच्या नंतर सध्या ठाण्यात याच पक्षाच्या दोन नेत्यांचं सगळं काही चालतं. शिवसेनेचे नेते आणि सध्याचे मंत्री एकनाथ शिंदे तसेच राष्ट्रवादीचे आमदार आणि अल्पकाळ मंत्री राहिलेले डॉ. जितेंद्र आव्हाड.

प्रश्न, समस्या

ठाणेकरांचा इतिहास हा थेट 13 व्या शतकापर्यंत जातो. इ.स. 1290 मध्ये तर मॅक्रो पोलो नावाच्या एका प्रसिद्ध खलाशाने देखील भारताला भेट दिली आणि ठाणे हे जगातील सर्वोत्तम शहर असल्याची नोंद केली. ‘घोडबंदर’ नावाचे एक बंदर आहे. हे घोडय़ांच्या सौदेबाजीसाठी प्रसिद्ध होते. घोडा हा शब्द आणि पोर्ट म्हणजे बंदर यावरून ‘घोडबंदर’ हे नाव पडले. याच काळात ‘तानसी’ नावाच्या कापडाची निर्यात ठाण्यातून होत असे. इ.स. 1300 ते इ.स. 1700 मध्ये मुस्लीम, पोर्तुगीज, मराठा, आणि ब्रिटीश यांनी राजवट केली. इ.स. 810 पासून इ.स. 1260 पर्यंत शिलाहारांची राजवट ठाण्यावर होती. अर्थात इतिहासाच्या या सगळय़ा खुणा फक्त इतिहासाच्याच पुस्तकात आहेत. यातल्या कोणत्याही खुणा जपण्यात ठाणेकर यशस्वी झालेले नाहीत.

आधुनिक काळात ठाणे हे खरंतर मुंबईचं प्रवेशद्वार. पहिली रेल्वे इथेच धावली. नागरी, सागरी आणि डोंगरी अशा एकत्र संस्कृतीचं शहर. सागरी म्हणजे, खाडी किनाऱयालगतच्या भागांच्या गावठाण आणि वेगळय़ा समस्या आहेत. तर येऊर, पातलीपाडा, गायमुख, वाघबीळ इथली काही वस्ती अगदी पाडय़ांच्या सारखीच आहे. शहरात असूनही विविध कारणांमुळे विकासाचं वारं त्यांना लागलेलं नाही. पण बदलत्या काळानुसार ठाण्याच्या गरजा बदलल्या. छोटय़ा रस्त्यांचं, बैठय़ा टुमदार घरांचं, पांढरपेशा-नोकरदार लोकांचं ठाणं आता टोलेजंग इमारती, चकाचकपणा, हाय-फाय गाडय़ा, कमी झालेली झाडं, नष्ट होत चाललेली मैदानं आणि तलाव, गोंधळ-गर्दीचे रस्ते अशी सध्या स्थिती आहे. सांस्कृतिक उपराजधानीत आता दोन नाटय़गफह आहेत. पण, गडकरी रंगायतनला तारीख मिळत नाही. काशिनाथ घाणेकर नाटय़गफहात प्रतिसाद मिळत नाही अशी नाटकवेडय़ांची स्थिती. खंडू रांगणेकरांसारखे राष्ट्रीय खेळाडू देणाऱया ठाण्यात दादोजी कोंडदेव स्टेडियम व्यतिरिक्त विविध खेळांच्या सोयी कुठेच नाहीत. राष्ट्रवादीने मध्ये महतप्रयासाने एक क्रीडा संकुल बांधले पण ते वापराविना पडून आहे. ठाणे रेल्वे स्टेशन परिसरासह जवळपास सगळेच प्रमुख चौक हे वाहतूक कोंडीचे झाले आहेत. दिवसेंदिवस खड्डय़ात जात असलेली टीएमटी आणि त्यात रिक्षावाल्यांची दादागिरी, फेरीवाले आणि पार्पिंगमध्ये हरवलेले फुटपाथ अशी ठाण्याची अवस्था आहे. विरोधक नावाला आणि सत्ताधारी खावाला अशी टीका आणि टोमणे ठाणेकर काहीवेळा करत असतात. कचऱयाची विल्हेवाट, पिण्याचं पाणी, तोकडय़ा आणि कमकुवत आरोग्याच्या सुविधा यांच्या जोडीला काही भागातले रस्ते हे ठाण्यातले विषय अद्यापही तसेच आहेत. खरंतर अधिक गुंतागुंतीचे होत चालले आहेत. कळव्याला छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय आहे. पण, रुग्णांवर उपचार करायला डॉक्टर नाहीत. जे.एन.यु.आर.एम. मधून नव्या-आधुनिक बस येत आहेत. पण, त्या पंक्चर झाल्या तर बदलायला टायर नाहीत अशी स्थिती आहे. ही दोन उदाहरणं ठाणे महापालिकेची स्थिती सांगण्यासाठी कदाचित पुरेशी असावीत. सलग दोन दशकांपेक्षा जास्त सत्ता असूनही मुंबईप्रमाणे करून दाखवलं ही लाईन घेऊन शिवसेनेला ठाण्यात प्रचारात अजूनही उतरता आलेलं नाही. मुंबईत जसा मराठीचा मुद्दा वर्षोनवर्ष सुरू आहे, तसं ठाण्याचं सध्या राहिलेलं नाही. मराठी मतं मोठय़ा संख्येने आहेत. मात्र, त्याचबरोबर उत्तर भारतीय आणि अन्य भाषिक-प्रांतिक असं पक्क कॉस्मोपॉलिटन झालं आहे.

राजकारण….

ठाण्यात गेल्या वेळच्या निवडणुकीनंतर मोठी गंमतशीर स्थिती निर्माण झाली होती. शिवसेना सगळय़ात मोठा पक्ष ठरला मात्र जुना सहकारी भाजपला बरोबर घेऊनही बहुमत काही गाठता आलं नाही. मग तारेवरची कसरत करत आणि काही पळवापळवीचे प्रकार झाले. पण पक्क बहुमत होईना. पक्षांनी फाटाफूट टाळण्यासाठी आपापल्या नगरसेवकांना अज्ञातस्थळी पाठवलं. दरम्यानच्या काळात, भावाला भावाने साथ देण्याचं ठरलं आणि मनसेच्या 7 नगरसेवकांच्या अनुपस्थितीने शिवसेना-भाजप आणि सहकाऱयांची सत्ता ठाण्यात स्थापन झाली. पण, स्थिती इतकी काठावरची होती की अधून मधून डळमळ आणि रुसवे-फुगवे होत राहिले. मधेतर शिवसेना आणि भाजपमध्ये फारच फाटलं. माजी उपमहापौर आणि भाजपाचे नेते मिलिंद पाटणकर यांना मारहाण, त्यांचं सहा दिवस गायब होणं हे प्रकरण चांगलंच गाजलं. (अल्पावधीतच पाटणकर स्वत: आणि शिवसेनाही ते सोईस्करपणे विसरली आहे) त्यापूर्वी भाजपाच्या नगरसेविका सुहासिनी लोखंडे याही अशाच अचानक गायब झाल्या होत्या. या सगळ्या प्रकारानंतरही ना भाजपा पोलिसात गेला ना झालेल्या वैयक्तिक तक्रारीवर पुढे काही कारवाई झाली. याहीपेक्षा गंमतशीर स्थिती झाली आहे ती राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची. केवळ सातच नगरसेवक निवडून येऊनही मनसे ठाण्यात भाव खाऊन गेली होती. पण, शहरातल्या कार्यकर्त्यांमधले मनभेद आणि गटबाजी याचा फटका ठाण्यात मनसेला बसला. त्याही पेक्षा मनसेसाठी त्रासदायक ठरलं ते स्वत: राज ठाकरे यांचं ठाण्याकडे झालेलं दुर्लक्ष. ठाण्यातल्या कार्यकर्त्यांना वेळ द्यायचा नाही किंवा पक्ष वाढवायला बळ न मिळाल्याने या निवडणुकांच्या पूर्वसंध्येला ठाण्यात मनसेच्या सातपैकी एकही नगरसेवक मनसे सोबत नाही. सगळय़ांनी पक्ष सोडला तर काहींना गटबाजीमुळे बाजूला करण्यात आलं.

ठाणे महानगरपालिका सध्याची स्थिती

सदस्य संख्या 130

पूर्वी तीन नगरसेवकांचा एक प्रभाग होता आता या निवडणुकीत चार नगरसेवकांचा एक प्रभाग असणार आहे.

नव्या महापालिकेत 131 सदस्य असतील

 मावळत्या पालिकेतील स्थिती

शिवसेना 57, भाजपा 8, काँग्रेस 13, राष्ट्रवादी 30, मनसे 7, अपक्ष 15.

Related posts: