|Tuesday, November 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » झिरो नंबरचा चष्मा

झिरो नंबरचा चष्मा 

रडतराऊ आणि देवेंद्र फडणवीस

तुम्हाला कदाचित ठाऊक असेल की, आपण ऐतिहासिक घटनांचे गेले दोन वर्ष साक्षिदार आहोत. 2014 पासून सुरू झालेली ही मालिका अद्याप सुरू आहे. भाजपचे 283 खासदार निवडून येणे, ज्यांच्या सत्तेवरील सूर्य कधी मावळत नाही अशा काँग्रेस पक्षाच्या खासदारांना संसदेत असो की महाराष्ट्र विधिमंडळात पायऱयांवर आंदोलन करताना पाहणे आणि ज्यांच्या एका डरकाळीने घाम फुटावा अशा शिवसेनेचे म्यांव-म्यांव करत ओरडणे इत्यादी इत्यादी. तर या घटनांची मालिका सुरू असताना त्याचा एक अध्याय मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीतही पहायला मिळणार आहे. मुंबई कुणाची? या प्रश्नाचे फायनल उत्तर 2017च्या महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर मिळेल. खरंतर विधानसभेच्या निवडणुकीत मुंबईतून शिवसेनेपेक्षा एक आमदार जास्त निवडून आणून भाजपने उत्तर दिले असले तरी ते शिवसेनेला मान्य झालेले दिसत नाहीए. तेव्हापासूनच शिवसेना आणि भाजपचा सुप्त संघर्ष पेटलाय, जो आता अधिक उग्र झाल्याचे दिसत आहे. अशावेळी भाजप समोर आणि खरं सांगायचं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आव्हान आहे ते रडतराऊंचे.

रडतराऊ म्हणजे मोक्याच्यावेळी अवसान गाळणारा माणूस. मग तो मतदारातला असो की पक्षातला असो, घातकच, मुंबईच्या युद्धात असे रडतराऊ महागात पडतील. कारण, ऐन लढाईत हे शिलेदार अवसान गाळून हातातली शस्त्र खाली टाकतात. भाजपला अशा लोकांचा धसका घ्यायला हवा. कारण, हेच लोक हातातली लढाई घालवतात. बरं त्यात त्यांचे काहीच जाणार नसते. पण, त्यांच्या वागण्याने बिनीचे शिलेदार मात्र धारातीर्थी पडतात. देवेंद्र फडणवीस हा आताच्या लढाईतला भाजपाचा पहिल्या फळीतला बिनीचा शिलेदार आहे. मुंबईसह सर्व राज्यातल्या निवडणुकात ते काटेकोर लक्ष घालत आहेत. पण, त्यातली मुंबई मनपाही यंदाची निवडणूक त्यांच्या राजकीय कारकीर्दीचा टर्निंग पॉईंट असणार आहे किंवा ती तशी व्हावी यासाठी काहींनी देव नक्कीच पाण्यात घातले आहेत. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी तर या निवडणूक निकालावर राज्य सरकारचे भवितव्य अवलंबून असल्याचे संकेत दिले आहेत. निकाल मनासारखा लागला नाही तर सत्तेतून बाहेर पडायची भूमिका सेना घेऊ शकते असा त्याचा स्पष्ट अर्थ आहे.

मुंबईतला प्रचार सुरू करताना शिवसेनेने आक्रमक चढाई केली. युती तोडली आणि त्यांच्या तोफा भाजपवर बरसू लागल्या. देवेंद्र फडणवीस त्याला सामोरे गेले. मुख्यमंत्री म्हणून आणि प्रचारातला मोठा चेहरा म्हणून ही त्यांची जबाबदारी होती. त्यांच्या पहिल्याच भाषणात टिपेचा सूर लावला, औकात सारखा शब्द वापरला. बसलेल्या आवाजाला उभं करायला त्यांना पाणी प्यावे लागले आणि पाणी पाजायचा इशारा करावा लागला. या घटनांनी शिवसेनेला हुरूप आलाय. बोलण्या-वागण्यात शिवराळ असलेल्या या पक्षाला असे प्रत्युत्तर म्हणजे, ‘मौके पर चौका’ मारायची संधी. ती संधी साधत संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी प्रचारात- अग्रलेखात प्रचंड आक्रमक भाषा वापरायला सुरुवात केलीय.

शिवसेनेचा हा डाव तसा नवा नाही. सेनेला आपली दुखरी नस ठाऊक असेलच. पक्षाचे 40 नगरसेवक उमेदवार आरक्षण बदलल्याने पराभवाच्या काळय़ा छायेत आहेत. संघटनेत 20 वर्षं तीच ती लोकं पदाला चिकटून आहेत. गटप्रमुख हा सेनेचा सर्वात मोठा अशांत टापू आहे. जोडीला युवासेना आणि त्याच्या गल्लीगल्लीतल्या नेतफत्वाने मूळ संघटनेतल्या नेत्यांच्या डोक्याची तार सटकवली आहे. प्रस्थापित नेत्यांना आपापल्या मुलांना राजकारणात सेट करायचे असताना त्यांच्यासमोर युवासैनिकांचे आव्हान आहे. जोडीला नेतफत्वाची तब्येत आणि युवराजांच्या मर्यादा शिवसैनिक पुरते ओळखून आहेत. गोरेगावच्या सभेत उद्धव ठाकरे यांनी 1997 पासून युती गुण्यागोविंदाने नांदत असल्याची बाब समोर आणली. पण, या प्रत्येक निवडणुकीत युतीत असतानाही शिवसेनेच्या जागा कमी होत गेल्या आहेत हे त्यांना एकतर आठवायचे नाहीए (उद्धव ठाकरे यांच्या आवडत्या शब्दात सांगायचे तर) किंबहुना, त्यांना ते जाहीर होऊ द्यायचे नाहीए. अशी शिवसेना आताची निवडणूक अधिकाधिक भावनिक आणि मुंबईच्या विकासाच्या मुद्दय़ापासून लांब नेऊ पाहतेय. कारण, मुंबईत सांगण्यासारखे यंदा त्यांच्याकडे खूप कमी आहे. 2012चा वचनमाना पूर्ण झालेला नाही. त्यातच भाजपला रोज-रोज शिवीगाळ करून सत्तेतली साथ सोडवत नाही हे शिवसेनेचे सत्य जनतेसमोर आहे.

यावर कडी केलीय ती मुंबईच्या बदलत्या राजकीय सारीपाटाने. मुंबई मराठी माणसाचीच ही घोषणा राजकीय आहे. सामाजिक परिस्थिती तशी नाही. मुंबईत मराठी मतदार अंदाजित 25 ते 30 टक्के असला तरी तो इतर मतांच्या तुलनेत अल्पसंख्य आहे. शिवाय हा मतदार विभागलेला आहे. मराठी मतांची दावेदारी जशी सेनेची आहे तशी मनसेची आहे आणि त्यात काही प्रमाणात इतर सर्व पक्ष हिस्सा उचलत असतात. याच्या ऐवजी अमराठी मतदार शिवसेनेकडे तितका नाही जितका तो भाजपकडे आहे. या अमराठी मतदारावर दावा लावायला नेतफत्वाने तिकीट वाटपाच्या आधी शिवसेना बहुभाषिक असेल असे प्रयत्न केले. पण, बहुसंख्य तिकिटं मात्र मराठी उमेदवारांनाच दिली आहेत. तत्पर्य, आपल्या मूळ मतगठ्ठय़ाकडे त्यांना दुर्लक्ष करायचे नाहीए.

अशावेळी, शिवसेनेकडे एकमात्र मार्ग उरतो तो म्हणजे निवडणूक प्रचार संपूर्णपणे भावनिक मुद्दय़ावर घेऊन जाणे. भावनिक मुद्दय़ात त्यांची दोन अस्त्र ठरलेली आहेत. पहिलं अस्त्र आहे बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा आणि दुसरं म्हणजे शिवसेनेचं दंगलीतलं कर्तृत्व. या अस्त्रांना पारजत शिवसेना भाजपला मराठीविरोधी पेक्षा शिवसेनाविरोधी जास्त ठरवते आणि भाजपच्या नेत्यांना, तावडे, शेलार, फडणवीस अशी आडनावे असूनही सरसकट उपरे ठरवून गुप्ता, सिंह, दुबे, चौबे, पांडे यांच्या रांगेत नेऊन बसवते. भावनेचा हा खेळ करताना दंगलीतले कर्तृत्व (?) सांगत शिवसेना हिंदू मतांवर भावनिक मोहिनीअस्त्र सोडते. त्याच्या जोडीला शेवटच्या 5 दिवसात सेनेची कुजबुज ब्रिगेड ‘जाऊ दे नं भाई, काहीही झाले तरी मुंबई शिवसेनेकडे हवी’ हे वाक्य मुंबईच्या कानाकोपऱयात घुमवू लागते. त्यांच्या या डावपेचांना सगळय़ात आधी बळी पडतात ते रडतराऊ मतदार.  परिणाम असा की, ही भावनाच 4 ते 5 टक्के मतं फिरवून शिवसेनेच्या पदरात किमान 10 जागा घालते. निकराच्या लढाईत इतकी बेगमी सेनेला पुरेशी आहे.

यावेळच्या लढाईत अस्त्रांसोबत शस्त्रं बाहेर निघाली तर नवल वाटायला नको. शेवटच्या 5 दिवसात वाचिक संघर्ष शारीरिक पातळीवर न्यायची शिवसेनेची तयारी झालेली दिसत आहे. तसे नसते तर, ‘पोलीस बाजूला ठेवा आणि मग बघा…’ ही सेम टू सेम एमआयएम पक्षाच्या अकबरुद्दिन ओवैसी स्टाइल धमकी उद्धव ठाकरे दरेक सभेत देत सुटले नसते. याचा अर्थ सोपा आहे. शेवटच्या टप्प्यात भाजप उमेदवार, समर्थक आणि मतदार यांच्यावर हल्ले होऊ शकतात. भाजपचा मतदार बाहेर निघाला पाहिजे ही भाजपची रणनीती असेल. बेंगरुळू असो की चंडिगढ मनपा निवडणुका असो की आत्ताच्या नगर परिषद निवडणुका, वाढीव मतदान भाजपच्या पारडय़ात गेलं आहे. तेव्हा हा मतदार निघू न देण्याकडे शिवसेनेचा कल असेल आणि त्यातून संघर्ष अटळ दिसतोय. या स्थितीतही  कार्यकर्त्याला निवडणुकीत बाजी मारायला लावणे हे देवेंद्र फडणवीस यांच्यासमोरचे मोठे आव्हान आहे. कारण, निवडणुकीचा निकाल त्यांच्या सीवीमध्ये महत्त्वाचा शेरा देणार आहे. फडणवीस यांच्यासमोरच्या पुढल्या 10 वर्षाच्या राजकारणात तो शेरा निर्णायक असेल. तेव्हा ही लढाई लढताना कचखाऊ मतदारांच्या पलिकडे कचखाऊ कार्यकर्ते आणि प्रसंगी कचखाऊ भाजपचे काही नेते यांनाही फडणवीसांना सांभाळून घ्यायचे आहे. ते जमले तर ही निवडणूक त्यांना आणि पक्षाला सोपी जाईल.

Related posts: