|Friday, January 24, 2020
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » पाप गेल्याची काय खुण?

पाप गेल्याची काय खुण? 

तीर्थामध्ये स्नान केल्याने आपली पापे नष्ट होतात अशी एक समजूत आहे. ही समजूत जरा तपासून पहायला हवी. केवळ तीर्थस्नानाने पाप नाश होईल काय? तुकाराम महाराज प्रश्न विचारतात-

काय काशी करिता गंगा । भीतरी चांगा नाही तो ।।

आणखी एका अभंगात म्हणतात-

जाऊनिया तीर्था तुवा काय केले ।

चर्म प्रक्षाळिले वरी वरी ।।

सिंहस्थ पर्वणीतील तीर्थस्नानाबद्दल तुकाराम महाराजांचा अभंग सुप्रसिद्ध आहे, तो असा-

आली सिंहस्थ पर्वणी । न्हाव्यां भटां झाली धणी ।।

अंतरीं पापाच्या कोडी । वरी वरी बोडी डोइ दाढी ।।

बोडिलें तें निघालें । काय पालटलें सांग वहिलें ।।

पाप गेल्याची काय खुण । नाहीं पालटले अवगुण ।।

भक्ति भावें विण । तुका म्हणे अवघा शीण ।।

वर वर मुंडण करून तीर्थात सिंहस्थावर स्नान केल्याने मनातली पापे नष्ट होतील काय? पापे नष्ट झाली तर तुमचे वर्तन बदलायला हवे. तुमचे अवगुण नाहीसे व्हायला हवेत. ते तसेच राहिले तर पाप गेले याची खूण काय, असा रोकडा सवाल महाराज करतात.

पण नामदेवराय म्हणतात- चंद्रभागे करिता एक स्नान। तुझी पापे पळती रानोरान ।। चंद्रभागेत स्नान केल्याने पापनाश होतो असे सर्वच संतांनी अनेक अभंगातून सांगितले आहे. याची संगती कशी लावायची? आपण असंख्य पापे करावीत. मग आषाढी एकादशीला पंढरपूरला जाऊन चंद्रभागेत एक स्नान करावे की गेली सर्व पापे! आता पुन्हा वर्षभर पापे करायला झाला मोकळा. पुन्हा चंद्रभागा स्नान की पापे नष्ट. असे काहीतरी विचित्र संतांना सांगावयाचे आहे काय? म्हणून तीर्थस्नान करताना आपल्या मनाची भावना काय आहे, मनाचा संकल्प काय आहे हे महत्त्वाचे आहे. आपल्याला मनोमन वाटत असेल की मी पापे केली आहेत, मी पापी आहे, मला त्याबद्दल पश्चात्ताप वाटत असेल तर मी संपूर्ण शरणागती पत्करून पाप नाशाकरिता तीर्थस्नान केले तर पापमुक्त होईन. हे घडेल ते तुमचे मन पश्चात्तापाने, अनुतापाने न्हाऊन निघेल तरच! तुकाराम महाराज म्हणतात –

हेचि प्रायश्चित्त । अनुतापीं न्हाय चित्त ।।

पण आपल्याला खरोखरीच पश्चात्ताप झाला आहे याची कसोटी काय? तुकाराम महाराज म्हणतात-तुका म्हणे पाप । शिवो नये अनुतापा ।।

खरोखरीच ज्याला पश्चात्ताप झाला आहे त्याच्या मनातही पुन्हा कधी पाप येत नाही. त्याला पुन्हा कधीही पाप शिवत नाही. या कसोटीवर आपण चंद्रभागेत केलेले स्नान तपासून पहावे. तीर्थस्नान हा अनुताप गंगेतील स्नानाचा केवळ विधी आहे. मर्म न जाणता केवळ विधी किंवा कर्मकांड कोणतेच फळ देत नाही. भावशून्य विधी काय कामाचा? आपण भजन, पूजन, उपासना काहीही करा, पण ती आपण का करतो आहोत हे कायम लक्षात ठेवून करा. पूर्ण भावाने, मन:पूर्वक करा असे संत बजावतात.

Related posts: