|Sunday, January 19, 2020
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » आमच्या शाळेत

आमच्या शाळेत 

आम्ही पहिली ते चौथीत असताना आमच्या शाळेत जी मौज होती ती आता आहे की नाही, ठाऊक नाही. आमचं दप्तर छोटं होतं. त्यात पाटी, पेन्सिल, कापडाचा ओला बोळा असलेली डबी आणि एक पाठय़पुस्तक असे. वर्गातल्या श्रीमंतांच्या मुलांकडे बिजागरी असलेल्या डबल पाटय़ा असत. काही मुलांच्या पाटय़ांना अर्ध्या भागात तारा ठोकून त्यात रंगीत मणी गुंफलेले असत. 1 ते 10 आकडे किंवा 2 ते 20 पर्यंतचे पाढे याच्यावरच शिकवले जात. दर शनिवारी सकाळी निघताना दप्तरात आठवणीने पुस्तीलेखनाची वही, कोवळय़ा बांबूचा टोक तासलेला बोरू आणि शाईची दौत ठेवावी लागे. दौतीतली शाई जाता येताना हमखास थोडी सांडून दप्तराला आणि इतर वस्तूंना निळे डाग लागत.

एक धडा शिकवून झाला की केळकर बाई पाटी पुसायला सांगत. डबीतल्या ओल्या बोळय़ाने पाटी पुसून सगळी मुलं पाटय़ा हवेत हलवून ‘देवा देवा, माझी पाटी वाळू दे’ अशी प्रार्थना करीत. देवाला याहून सोपं पसायदान कधी कोणी मागितलं नसेल. एखादा चुकार आळशी मुलगा पाटीवर मजकूर लिहिताना चूक झाली की थुंकी लावून पाटी पुसायचा आणि मग बाईंचा मार खायचा. पाटीवर लिहिण्याची पांढरी पेन्सिल पैशाला चार किंवा सहा या दराने मिळायची, नक्की आठवत नाही. सोमवारी दिलेली अख्खी पेन्सिल शनिवारपर्यंत संपून जाई. शाळेत जास्त अभ्यास असल्यामुळे नव्हे, तर अधूनमधून तिचे लचके तोडून खायची आम्हाला सवय होती, म्हणून! काही वांड मुलं शेजारच्या मुलाची नजर चुकवून त्याची पेन्सिल (छोटी असेल तर) पटकन तोंडात टाकायची.  पाटी पुसण्यासाठी आम्ही घरातल्या जुन्या कापडाचा बोळा नेत असू. काही मुलं स्पंज आणीत. स्पंज म्हणजे विकतचा नव्हे, तर बसमधून प्रवास करताना फाटक्मया सीटमधून ओरबाडून काढलेला तुकडा. आमच्या त्या पिढीने सार्वजनिक मालमत्तेचा बालवयात केलेला विध्वंस म्हणून त्याची नोंद व्हायला हरकत नाही! इयत्ता चौथी तुकडी ड मध्ये असताना मी जिथे बसायचो तिथून मैदानाच्या कडेला असलेली शाळेची घंटा दिसायची. शेवटच्या तासाला सारखं तिच्याकडे लक्ष जाई. गोविंदा शिपाई हातात लाकडी टोल घेऊन आला की पोटात गुदगुल्या होत. त्याने टोल आपटला की शाळा सुटायची.  

गेले ते दिवस… आणि आठवणीदेखील पुसट होत चालल्या. माझी नातवंडे म्हातारी होतील तेव्हा कदाचित स्मार्टफोनच्या नोस्ताल्जिक आठवणींनी अशीच माझ्यासारखी व्याकूळ होतील.

Related posts: