|Sunday, January 19, 2020
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » धक्क्यावर धक्के

धक्क्यावर धक्के 

सध्या गल्लीपासून दिल्लीपर्यंत ‘धक्का’दायक राजकारण सुरू आहे. 10 महानगरपालिका व 25 जिल्हा परिषदांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात तर धक्क्यांवर धक्के बसत आहेत. त्यामुळे भविष्यात हे राजकारण आणखी कुठल्या वळणावर जाईल, हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरेल. मुंबई महापालिकेवरील वर्चस्वावरून शिवसेना व भाजपा यांच्या तोफा दिवसरात्र धडधडत आहेत. ही वर्चस्वाची लढाई इतकी टोकाला गेली आहे, की अगदी शिवसेना सरकारमधून बाहेर पडण्याच्या चर्चेलाही ऊत आलेला दिसतो. आता हार्दिक पटेलच्या माध्यमातूनही सेनेने आणखी एक धक्का दिला आहे. हा घाव भाजपाच्या नक्कीच वर्मी बसला असावा. गुजरातमध्ये बहुदा हार्दिकच सेनेचे प्रमुख अस्त्र असेल. मोदींविरोधात रान उठविणाऱया हार्दिकला सोबत घेऊन भाजपाला कशा पद्धतेत उपद्रव पोहोचविता येईल, यादृष्टीने सेना प्रयत्नशील राहील. प्रत्यक्षात या समीकरणाचा काय प्रभाव असेल, हे मात्र गुजरातमधील निवडणुकीतूनच कळू शकेल. दुसऱया बाजूला कल्याण-डोंबिवली महापालिकेत सेना व मनसे एकत्र येण्याविषयी चर्चा आहे. राजकारणात अशक्य काही नाही. त्यामुळे कल्याणच काय, पण गरज भासली तर आता टाळाटाळ करणारी सेना निवडणुकीनंतर मुंबईतही मनसेशी जवळिक साधू शकते. सिंहगडाच्या साक्षीने पुण्याच्या राजकारणातही घमासान सुरू आहे. खासदार संजय काकडे यांच्यामुळे भाजपा एकेक इमले रचत असला, तरी प्रत्यक्षात या इमारतीचा पाया किती आणि कसा मजबूत झाला आहे, याच्या मूल्यमापनासाठी थोडी वाट पहावी लागेल. तथापि, काकडे यांच्या एकापेक्षा एक धक्क्यांनी येथील राजकीय क्षेत्र हादरवून सोडले आहे, हे नक्की. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे कट्टर समर्थक असलेल्या आमदार अनिल भोसले यांच्या पत्नी रेश्मा यांना पक्षाचे तिकीट मिळवून देणे, हा त्यांचाच डाव. त्यांचे व्याही भोसलेदेखील आता भाजपावासीच झाल्यासारखे. 60-65 जणांना पावन करून घेण्यापासून ते सिंहगडावरील चढाईपर्यंत पुण्याच्या राजकारणाचे नेतृत्व करणारे काकडे हेच कदाचित उद्याच्या जहागिरीचे सुभेदार असतील. तीव्र विरोध असतानाही अजितदादांनी  भोसलेंसाठी विधान परिषद निवडणुकीत विलास लांडेंना डावलले. आता गद्दारांनाही याची लाज वाटत असणार, असे म्हणत पश्चात्ताप करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. पिंपरीत लक्ष्मण जगताप यांच्यानंतर महेश लांडगे, आझम पानसरे अशा दिग्गज नेत्यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर कमळ हाती घेतले असताना भोसलेंनीही तोच मार्ग अवलंबल्याने अजित पवारांना अधिक ताकदीने मैदानात उतरावे लागेल. स्वाभाविकच ही लढाई लक्षवेधक ठरेल. तशा नाशिकपासून नागपूरपर्यंत अवघ्या महाराष्ट्रभरातील निवडणुका रंगतदार ठरणार आहेत. तिकडे उपराजधानीत संघ दक्ष मंडळींनी भाजपा उमेदवारांविरोधातच बंडाचा झेंडा हाती घेतला आहे. साधनशुचिता व शिस्तीचे धडे देणाऱया संघातूनच अशी बंडाळी व्हावी, हे आश्चर्यच म्हटले पाहिजे. संघभूमीतील स्वयंसेवकांचे बंड टिकणार की फसणार, हे दिसेलच. परंतु, संघ राजकारणापासून अलिप्त असतो, असा घोष करणाऱयांनी यातून काय तो बोध घ्यायला हरकत नाही. लक्ष्मीदर्शन हा तसा काँग्रेस, राष्ट्रवादीपासून सगळय़ाच पक्षांच्या आवडीचा विषय. भाजपानेही या विषयात लक्षणीय प्रगती दाखवून दिली आहे. कशाला पक्षनिधीचा मुलामा कसा लावायचा, हे त्यांच्याकडून शिकावे. या निवडणुकीत उमेदवारी अर्जाच्या माध्यमातून झालेला गोंधळही ऐतिहासिक ठरावा. एबी फॉर्म, त्यातून निर्माण झालेले घोळ काही शोभादायक मानता येत नाहीत. त्यात एखाद्या उमेदवाराला आधी अपक्ष व नंतर पुन्हा एखाद्या पक्षाचा अधिकृत उमेदवार जाहीर करण्यात येत असेल, तर एकूणच या प्रक्रियेतील सुस्पष्टतेबाबतच शंका निर्माण होतात. या पातळीवर न्याय देताना आपपरभाव बाळगला जात असेल, तर ती बाब लोकशाहीसाठी मारक ठरते, याचे भान ठेवायला हवे. या निवडणुकीत अर्ज बाद संख्याही बऱयापैकी दिसून येते. स्वाभाविकच यातून उमेदवारांच्या प्रशिक्षणाचीच गरज अधोरेखित होते. अर्थातच भाजपा याला अपवाद असू शकेल. ऑनलाईनमध्ये विशेष गती असणाऱया या पक्षाकडून साऱयांनी जरूर धडे घ्यायला हवेत. तिकडे विधान परिषदेच्या पाचपैकी चार जागांचे निकालही धक्कादायीच ठरतात. कोकण विभागीय शिक्षक मतदारसंघ भाजपाशी जवळीक असलेल्या रामनाथ मोते यांच्याकडे होता. मात्र, त्यांना उमेदवारी देण्यात आली नाही. याचा फायदा उठवत काँग्रेस व राष्ट्रवादीच्या पाठिंब्याच्या बळावर शेकापच्या बाळाराम पाटील यांनी बाजी मारली. याशिवाय नाशिक व मराठवाडा मतदारसंघातही काँग्रेस, राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी यश मिळविले असून, अमरावती पदवीधरमध्ये भाजपाचे उमेदवार राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील हे विजयी झाले आहेत. हे पाहता विरोधकांनी सत्ताधाऱयांना धक्का दिला, असे नक्कीच म्हणता येऊ शकेल. देशातही सध्या निवडणुकीचा माहौल आहे. पंजाब, गोव्यात मतदानप्रक्रिया पार पडली आहे. तर यूपी, उत्तराखंड, मणीपूर या राज्यांतही वातावरण तापल्याचे पहायला मिळत आहे. राजधानी दिल्लीला तसे भूकंपाचे धक्के जाणवलेच आहेत. ‘मी बोललो, तर भूकंप होईल,’ असे म्हणणाऱया राहुल गांधी यांना त्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चिमटे काढत ‘भूकंप आलाच,’ अशी कोटी केली आहे. एकूणच इथून तिथून सगळीकडेच जो-तो परस्परांना धक्के देण्यात मश्गूल आहे. निवडणुका, प्रचार, रणनीती, भाषणबाजी जसजशी टीपेला पोहोचेल, तसतशी ही राजकीय दंगल अधिकाधिक तीव्र होत जाईल. या धकाधकीत कोण कुणाला धक्के देणार नि सरतेशेवटी कुणाची सरशी होणार, हे अर्थातच मतदारच ठरवतील. त्यामुळे पंजाब, गोवा, यूपीपासून महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कुणाचा ‘निकाल’ लागतो, याकडेच आता सर्वांचे लक्ष असेल.

 

Related posts: