|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » आयसीजीएस शौनक’ गस्ती जहाजाचे तटरक्षक दलाकडे हस्तांतरण

आयसीजीएस शौनक’ गस्ती जहाजाचे तटरक्षक दलाकडे हस्तांतरण 

प्रतिनिधी/ वास्को

गोवा शिपयार्डतर्फे भारतीय तटरक्षक दलासाठी बांधण्यात आलेल्या ‘आयसीजीएस शौनक’ या अत्याधुनिक गस्ती जहाजाचे रविवारी गोवा शिपयार्डमध्ये झालेल्या कार्यक्रमात तटरक्षक दलाकडे हस्तांतरण करण्यात आले. गोवा शिपयार्डतर्फे तटरक्षक दलासाठी बांधण्यात येणाऱया सहा गस्ती जहाजांपैकी हे चौथे जहाज आहे. आयसीजीएस शौनक लवकरच तटरक्षक दलाच्या सेवेत दाखल होणार आहे.

या जहाजाच्या हस्तांतरणच्याप्रसंगी गोवा शिपयार्डचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक निवृत्त रिअर ऍडमिरल शेखर मित्तल, भारतीय तटरक्षक दलाचे उपमहासंचालक टी. सशीकुमार, उपमहासंचालक अरूण श्रीवास्तव, उपमहासंचालक अतुल पार्लीकर, गोवा शिपयार्डचे अधिकारी एस.पी. रायकर, सुधाकर टीएन, कमांडर बी.बी. नागपाल, तसेच तटरक्षक दल व गोवा शिपयार्डचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

‘आयसीजीएस शौनक’ या जहाजाचे जलावतरण 27 नोव्हेंबर 2015 रोजी  गोवा शिपयार्डमध्ये करण्यात आले होते. सोळा महिन्यातच गोवा शिपयार्डने या जहाजाचे काम पूर्ण करून हे जहाज नियोजित वेळेआधीच तटरक्षक दलाकडे अधिकृतरित्या सुपुर्द केले आहे. गोवा शिपयार्ड अशा वर्गातील सहा अत्याधुनिक गस्ती जहाजे तटरक्षक दलासाठी बांधीत असून यापूर्वी तीन जहाजे तटरक्षक दलाकडे बांधून सुपुर्द करण्यात आलेली आहेत. गोवा शिपयार्डचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर मित्तल यांनी यावेळी बोलताना तटरक्षक दलासाठी बांधलेली जहाजे नियोजित वेळेत पूर्ण करून गोवा शिपयार्डने आपली जहाज बांधणीतील गुणवत्ता आणि क्षमता सिध्द केल्याचे सांगितले. आयसीजीएस शौनक गस्ती जहाज भारतीय तटरक्षक दलाच्या वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी साहाय्यक ठरणार आहे.

समुद्र गस्ती बरोबरच समुदातील गैर व्यवहारांना आळा घालणे, चाचेगीरी रोखणे, समुद्र प्रदुषण रोखणे, समुद्रातील नैसर्गीक संपत्तीचे रक्षण करणे, शोध आणि बचाव कार्य करणे इत्यादी कर्तव्ये बजावण्यासाठी आयसीजीएस शौनकचा उपयोग होणार आहे.

Related posts: