|Thursday, February 27, 2020
You are here: Home » आवृत्ती » सांगली » मिरजेत भरदिवसा 30 लाख रुपयांची लूट

मिरजेत भरदिवसा 30 लाख रुपयांची लूट 

प्रतिनिधी/ मिरज

शहरातील स्टेट बँकेच्या एटीएममध्ये भरण्यासाठी आणलेली 30 लाख रुपयांची रोकड दोन अज्ञात तरुणांनी दिवसाढवळ्या, भरवस्तीत, अनेकांच्या साक्षीने लुटली. रोकड घेऊन आलेल्या बुलेरो गाडीच्या काचा फोडून आतील बॅग घेऊन चोरटय़ांनी काही क्षणात मोटारसायकलीवरुन पलायन केले. बुधवारी दुपारी सराफ रोडवर कापसे हाईटस् मधील एटीएमसमोर हा प्रकार घडला. चोरटे लगतच्या सीसीटीव्ही पॅमेऱयात कैदही झाले. घडल्या प्रकारामुळे शहरात खळबळ उडाली असून, पोलिस अधिक्षक दत्तात्रय शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन चौकशीबाबत अधिकाऱयांना सुचना दिल्या आहेत.

शहरातील एटीएममध्ये रोख रक्कम भरण्याची एजन्सी एसआयएस प्रोसिजर या चेन्नईतील कंपनीला देण्यात आली आहे. या कंपनीचे प्रशांत काटकर व दिगंबर महादेव धुमाळ हे कर्मचारी एमएच-10-बीए-558 या बुलेरो गाडीतून 60 लाख रुपये घेऊन शहरातील एटीएममध्ये भरण्यासाठी आले होते. या बुलेरो गाडीवर बाबासा मारुती कांबळे हे चालक म्हणून कार्यरत होते. या कर्मचाऱयांनी 60 लाख रुपयांपैकी प्रत्येकी दहा लाख रुपये प्रमाणे शहरातील कर्मवीर भाऊराव पाटील चौकालगत असलेल्या दोन एटीएममध्ये 20 लाख रुपयांचा भरणा केला होता. त्यानंतर ते शहरातील शनिवार पेठेत, सराफ रोडवर असलेल्या कापसे हाईटस् मधील स्टेट बँकेच्या एटीएममध्ये दहा लाख रुपये भरण्यासाठी दाखल झाले होते.

प्रशांत काटकर आणि दिगंबर धुमाळ यांनी आपल्या जवळील शिल्लक 40 लाखांपैकी दहा लाख रुपये घेऊन एटीएममध्ये भरण्यासाठी गेले. बुलेरो गाडी एटीएम समोरच रस्त्याकडेला उभी करण्यात आली होती. चालक बाबासाहेब कांबळे यांनीही उन्हाचा त्रास होऊ लागल्याने गाडी बंद करुन सावलीचा आसरा घेतला. हीच संधी साधून दोन अज्ञात तरुणांनी एकाने गाडीच्या उजव्या बाजूने येऊन चालकाच्या मागील बाजूस असलेली काच फोडून आतील बॅग ताब्यात घेतली. तर दुसऱया तरुणाने लगतच मोटारसायकल सुरू ठेवली होती. क्षणाचाही अवधी न लावता या दोघांनी 30 लाख रुपये असलेली बॅग घेऊन मोटारसायकलीवरुन पलायन केले. दुपारी साडेबाराच्या सुमारास मध्यवर्ती सराफ रोडवर अनेकांच्या साक्षीने हा प्रकार घडल्याने सर्वत्र खळबळ उडाली.

दोघेही चोरटे एटीएम समोरच असलेल्या इंडियन म्युझिकल शॉपच्या सीसीटीव्ही पॅमेऱयात कैद झाले आहेत. यापैकी काच फोडून गाडीतील पॅशबॅग घेऊन पलायन करणाऱया तरुणाने चॉकलेटी टिशर्ट व पिवळ्या रंगाची पॅन्ट घातली होती. तर गाडी सुरू करुन उभ्या असलेल्या तरुणाने काळी पॅन्ट आणि निळ्या रंगाचा चौकडा शर्ट परिधान केला होता. पॅमेऱयात ते पॅशबॅग घेऊन पळून जाताना स्पष्टपणे दिसून येतात, पण त्यांचे चेहरे मात्र स्पष्टपणे दिसून आले नाहीत. घडल्या प्रकाराची माहिती मिळताच शहर पोलिस निरीक्षक सदाशिव शेलार तात्काळ घटनास्थळी दाखल झाले होते. त्यानंतर पोलिस अधिक्षक दत्तात्रय शिंदे, अप्पर पोलिस अधिक्षक कृष्णकांत उपाध्याय, उपाधिक्षक धीरज पाटील, सांगली स्थानिक गुन्हा अन्वेषणचे निरीक्षक बाजीराव पाटील यांच्यासह अनेक पोलिस अधिकाऱयांनी घटनास्थळी भेट दिली.

याबाबत एजन्सी कंपनीचा कर्मचारी दिगंबर महादेव धुमाळ याने शहर पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यांनी दोनचाकी मोटारसायकलीवरुन आलेल्या तरुणांनी 500 रुपये नोटांचे सहा बंडल असलेली 30 लाख रुपयांची रोकड लंपास केली असल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी पोलिसांनी रेकॉर्डवरील गुन्हेगार तपासायला सुरूवात केली आहे. पण रात्री उशिरापर्यंत तपासाची दिशा स्पष्ट झालेली नव्हते. सदरचे गुन्हेगार सराईत असावेत आणि त्यांनी प्रारंभीपासून सदर गाडीवर पाळत ठेवून संधी मिळताच पैसे लंपास केले असल्याचा पोलिसांचा संशय आहे. याबाबत तात्काळ नाकाबंदी करुन चौकशीला प्रारंभ झाला होता. घडल्या प्रकारामुळे सराफ रोडवरची वाहतूक बराचकाळ खोळंबली होती. नागरिक मोठय़ा संख्येने घटनास्थळी दाखल झाले होते. भरदिवसा हा प्रकार घडल्याने सर्वत्र भीतीचे सावट दिसून आले.

तिघा कर्मचाऱयांची स्वतंत्र चौकशी

60 लाख रुपयांची रोकड घेऊन आलेल्या गाडीसोबत दिगंबर धुमाळ, प्रशांत काटकर आणि चालक बाबासाहेब कांबळे हे एजन्सीचे तीन कर्मचारी होते. पोलिस अधिक्षक दत्तात्रय शिंदे यांनी या तिघांनाही ताब्यात घेऊन त्यांची स्वतंत्रपणे चौकशी केली. त्यामधून काय निष्पन्न झाले, हे मात्र समजू शकले नाही. दरम्यान, 60 लाख रुपयांची रोकड वाहतूक करताना वापरण्यात आलेल्या बुलेरो गाडीला कोठेही लोखंडी जाळी दिसून आली नाही. याशिवाय गाडीत 30 लाख रुपयांची रोकड असताना आणि भरवस्तीत रस्त्याकडेला गाडी उभी असताना यामध्ये एकही कर्मचारी न थांबता तिघेही बाहेर थांबल्याने याबाबत शहरात तर्कवितर्क लढविले जात होते.

Related posts: