|Saturday, February 22, 2020
You are here: Home » आवृत्ती » सातारा » तिच्या हृदयासाठी पुन्हा थिरकणार त्यांची पावले

तिच्या हृदयासाठी पुन्हा थिरकणार त्यांची पावले 

सुभाष देशमुखे/ कराड

हृदयरोगाने पीडित सना मुल्ला हिला आर्थिक मदत… कॅन्सग्रस्त अभिलाषा नायकुडेच्या कुटुंबीयांसाठी चॅरिटी शोच्या माध्यमातून कराडकरांनी दाखवलेली माणुसकी… अन् आता साक्षी धनाजी हेरगुडे या गरीब कुटुंबातील मुलीच्या उपचारासाठी पुन्हा मदतीची हाक… कराडकरांचा नेहमीप्रमाणे प्रतिसाद मिळेल या भावनेतूनच… साक्षी हेरगुडे ही हृदयरोगाने पीडित असून तिच्या उपचारासाठी आर्थिक मदतीची गरज आहे. यासाठी कराडातील वेगवेगळ्या डान्स गुपनी एकत्र येत 26 फेब्रुवारी रोजी मेगा चॅरिटी डान्स शोचे आयोजन केले आहे.

कराड शहराच्या संस्कारक्षम वाटचालीत भर घालणारे अनेक उपक्रम इथे होत असतात. या उपक्रमांच्या यादीत आता गरीब कुटुंबातील मुलींसाठी मेगा चॅरिटी डान्स शो आयोजित करण्याचा उपक्रमही ठळकपणे नोंदला जात आहे.

सना, अभिलाषानंतर साक्षीसाठी पुढाकार

शहरातीलच सना मुल्ला या मुलीच्या उपचारासाठी आर्थिक मदत करण्याच्या हेतूने शहरातील वेगवेगळय़ा डान्स ऍकॅडमी व ग्रुपनी एकत्र येत मेगा चॅरिटी डान्स शो आयोजित केला. तिकीटविक्रीसह डान्स शोवेळी जेवढी आर्थिक मदत जमेल तेवढी सर्वांसमक्ष एका वरिष्ठ शासकीय अधिकाऱयाच्या साक्षीने त्या पीडित मुलीच्या उपचारासाठी सुपूर्द केली. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर गत वर्षीच अभिलाषा नायकुडे या कॅन्सरग्रस्त मुलीच्या उपचारासाठी दोन लाखांपेक्षा जास्त मदत मिळवून देण्यात या डान्स ग्रुपना यश आले. नृत्यकलेत पारंगत असलेल्या व या क्षेत्रातच करिअर करू इच्छिणाऱया मुलांनी राबवलेला हा उपक्रम निश्चितच कराडच्या संस्कारक्षम वाटचालीत भर घालणारा आहे. आपला पेशा जपतानाच सामाजिक भावनेतून त्यांनी सुरू केलेल्या उपक्रमांना कराडकरांचाही मोठा प्रतिसाद मिळतो. अभिजित पाटील, वसीम शेख, तेजस शहा, रोहित शहा, अजिम कागदी, निखील पवार या नृत्यकलाकारांनी पुन्हा एकदा भावनिक संवेदनशीलता जपणारा डान्स शो आयोजित केला आहे.

साक्षी धनाजी हेरगुडे ही कराडच्या विद्यानगर भागातील बनवडी कॉलनीत राहते. 12 वर्षीय साक्षी जिल्हा परिषद शाळेत पाचवीत शिक्षण घेते. तिच्या वडिलांचे निधन झाले असून मोलमजुरी करणारी आईच आता तिच्यासाठी सर्वकाही आहे.

मुलीच्या हृदयासाठी आईची धडपड

साक्षीला हृदयरोगाच्या आजाराचे निदान झाल्यावर तिच्या आईच्या पायाखालची जमीन सरकली. मुलीच्या उपचारासाठी दारोदार पायपीट करणाऱया त्या आईने प्रसंगी कर्ज काढून उपचारासाठी पैसे घातले. मात्र आजार गंभीर असल्याने उपचाराच्या खर्चाचा आकडा आवाक्याबाहेर गेला. उपचार करता करता डोक्यावर कर्जाचा बोजाही झाला. यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू असतानाच अभिजित पाटील, वसीम शेख, तेजस शहा, रोहित शहा, अजिम कागदी, निखिल पवार या नृत्यकलाकारांशी त्यांची ओळख झाली. या ओळखीतूनच त्या कुटुंबाला या जीवघेण्या स्थितीतून बाहेर काढण्यासाठी नृत्यकलाकारांनी धडपड सुरू केली आहे. त्या मुलीच्या उपचारासाठी आर्थिक मदत मिळवून देतानाच तिच्या भविष्यातील शिक्षणाचा खर्चही उचलण्याची तयारी नृत्यकलाकारांची आहे. यासाठीच 26 फेब्रुवारी रोजी कराड येथे मेगा चॅरिटी डान्स शोचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमास पुन्हा एकदा कराडकर साथ देतील, अशी अपेक्षा नृत्यकलाकारांनी व्यक्त केली आहे.

कराडसह मुंबई, पुण्यातून गुप येणार

साक्षी हेरगुडेच्या मदतीसाठी आयोजित मेगा चॅरिटी डान्स शो यशस्वी करण्यासाठी नृत्यकलाकारांची टीम वेगाने कामाला लागली आहे. कराड, सातारा, कोल्हापूर, उस्मानाबाद, सोलापूर, मुंबई, पुण्यातूनही डान्स ग्रुप आपले सादरीकरण करण्यासाठी कराडात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. हा मेगा चॅरिटी डान्स शो निश्चितपणे कराडकरांना एक सामाजिक प्रेरणा देऊन जाईल अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. नृत्यकलाकरांच्या या उपक्रमास कराडकरही मोलाची साथ देतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. 

Related posts: