|Tuesday, September 17, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » मल्ल्यांच्या प्रत्यार्पणासाठी युकेला विनंती

मल्ल्यांच्या प्रत्यार्पणासाठी युकेला विनंती 

 नवी दिल्ली/ वृत्तसंस्था :

बँकांचे थकबाकीदार आणि मार्च महिन्यापासून लंडनमध्ये राहत असलेल्या विजय मल्ल्या यांच्या प्रत्यार्पणासाठी भारताने युकेला विनंती केली आहे. नवी दिल्लीत स्थित युके दूतावासाला भारताकडून प्रत्यार्पण विनंती देण्यात आल्याचे विदेश मंत्रालयाने गुरुवारी सांगितले.

काही दिवसांपूर्वीच 1000 पानांपेक्षा अधिकच्या आरोपपत्रात सीबीआयने किंगफिशर एअरलाइन्सवर अनेक आरोप लावले आहेत. एअरलाइनने आयडीबीआय बँकेकडून मिळालेल्या 900 कोटी रुपयांच्या कर्जापैकी 254 कोटी रुपयांचा वापर वैयक्तिक कारणासाठी केल्याचा आरोप यात आहे. तसेच आयडीबीआय बँकेने कंपनीला रविवारी कर्ज दिले होते. हा प्रकार रिझर्व्ह बँकेच्या नियमांविरोधात आहे. या प्रकरणी बँकेचे माजी अध्यक्ष योगेश अग्रवाल समवेत 9 जणांना अलिकडेच अटक करण्यात आली होती.

कर्जवसुलीचा आदेश

कर्जवसुली लवादाने विजय मल्ल्या यांच्याकडून बँकांना 6203 कोटी रुपयांच्या कर्जाची वसुली करण्याची प्रक्रिया सुरू करण्यास मंजुरी दिली होती. 6203 कोटी रुपयांच्या कर्जावर 11.5 टक्के प्रतिवर्ष व्याजदराने वसुली केली जाणार आहे. जवळपास 3 वर्षांपर्यंत चाललेल्या कायदेशीर लढाईनंतर बँकांना कर्जवसुलीची मंजुरी मिळाली होती.