|Sunday, September 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » मालवण पालिकेच्या जागेत ठेकेदाराचे अतिक्रमण

मालवण पालिकेच्या जागेत ठेकेदाराचे अतिक्रमण 

मालवणमालवण शहरात सध्या एका खासगी कंपनीच्या केबल टाकण्यावरून राजकीय वाद निर्माण झाले आहेत. माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर आणि माजी नगरसेवक महेंद्र म्हाडगूत यांनी या केबल टाकण्याला आक्षेप घेतल्यानंतर आता भाजप नगरसेविका पूजा करलकर यांनीही ठेकेदाराला पालिकेच्या जागेत टाकलेल्या साहित्याबद्दल त्याच्यावर कारवाई करण्याची तक्रार पालिकेकडे केली आहे.

पालिकेचे बांधकाम विभागाचे अधिकारी होडावडेकर व मुकादम रमेश कोकरे यांनी सौ. करलकर यांच्या तक्रारीवरून भरड येथील सुलभ शौचालयाच्या परिसरात ठेकेदाराने टाकलेल्या साहित्याची माहिती घेतली. पालिकेला कोणतीही कल्पना न देता ठेकेदाराने मनमानी करीत साहित्य टाकल्याने त्याला साहित्य हटविण्याबाबत 24 तासांची नोटीस देण्याची कार्यवाही करण्यात येईल. याबाबत मुख्याधिकारी रंजना गगे यांचे लक्ष वेधण्यात येईल, असे होडावडेकर यांनी स्पष्ट केले.

साईडपट्टीचे मोठे नुकसान

मालवण पालिकेने भुयारी गटार योजनेचे काम करताना खणलेल्या रस्त्यामुळे नागरिकांना ये-जा करणे त्रासाचे झाले होते. त्यानंतर पालिकेने निधी उपलब्ध झाल्यानंतर तातडीने एसटी स्टॅण्ड ते फोवकांडा पिंपळ हा रस्ता बनविला होता. यावर काही ठिकाणी आणखी एक कोट मारायचा आहे, असे असताना या रस्त्यालगत असलेली साईडपट्टी सध्या खासगी कंपनीच्या केबलसाठी खोदण्यात येत आहे. हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात असला, तरी त्याच्यावर पालिकेने खर्च केलेला आहे. त्यामुळे पालिकेला कल्पना देऊन हे काम होणे आवश्यक होते. मात्र, ठेकेदार अगर कंपनीने पालिकेला कोणतीही माहिती न देता बिनधास्त काम सुरू केल्याने पुन्हा नागरिकांना धूळमय रस्त्यातून वाट काढावी लागत आहे. त्यामुळे करलकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

दरम्यान, सौ. करलकर यांनी पालिकेने 24 तासात या साहित्यावर कारवाई न केल्यास जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रशासनाविरोधात दाद मागणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

ठेकेदाराला राजकीय पक्षाचा आशीर्वाद

 करलकर यांच्या तक्रारीवरून बांधकाम विभागाचे अधिकारी साहित्य ठेवलेल्या ठिकाणी पोहोचले असता, त्यांनी कामगारांना साहित्य कोणाचे आहे, असे विचारले असता, त्यांनी ठेकेदाराला फोन लावून दिला. समोरून बोलणारी व्यक्ती ठेकेदार नसून ती पालिकेतील सत्ताधारी पक्षाचा पदाधिकारी असल्याचे स्पष्ट होताच बांधकामचे अधिकारी गप्पच झाले. त्यांनी साहित्याबाबत विचारणा केली आणि साईडपट्टीबाबत विचारले असता, त्या पदाधिकाऱयाने आमच्याकडे बांधकाम विभागाची परवानगी असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे शहरातील रस्ते पुन्हा नादुरुस्त करण्याचा ठेका सत्ताधारी पक्षाने घेतला आहे काय? असाही सवाल उपस्थित होत आहे.