|Monday, August 26, 2019
You are here: Home » क्रिडा » सलग 4 मालिकांमध्ये 4 ‘विराट’ द्विशतके!

सलग 4 मालिकांमध्ये 4 ‘विराट’ द्विशतके! 

ताज्या दमाच्या कर्णधाराने रचला नवा इतिहास,

वृत्तसंस्था / हैदराबाद

कर्णधार विराट कोहलीने बांगलादेशच्या तुलनेने दुबळय़ा गोलंदाजीचा शुक्रवारीही यथोचित समाचार घेत विक्रमी चौथे द्विशतक साजरे केल्यानंतर भारताने येथील एकमेव कसोटी सामन्यात आपला पहिला डाव 6 बाद 687 धावांवर घोषित केला आणि दिवसअखेरीस बांगलादेशला 1 बाद 41 धावांवर रोखले. बांगलादेशचा सलामीवीर सौम्या सरकार यावेळी उमेश यादवच्या गोलंदाजीवर बाद झाला.

विराट कोहलीने यावेळी 246 चेंडूत 24 चौकारांसह 204 धावांचे योगदान दिले. सलग 4 कसोटी मालिकांमध्ये त्याचे हे सलग चौथे द्विशतक ठरले. हे दमदार द्विशतक साजरे करताना त्याने सर डॉन ब्रॅडमन व राहुल द्रविड यांचा सलग 3 मालिकांमध्ये 3 द्विशतकांचा विक्रमही मोडीत काढला. विराटने वेस्ट इंडीज (200), न्यूझीलंड (211), इंग्लंड (235) व बांगलादेशविरुद्ध (204) सलग 4 द्विशतके झळकावली आहेत.

कसोटीमध्ये भारतातर्फे चारहून अधिक द्विशतके झळकवणारा कोहली हा पाचवा फलंदाज आहे. सचिन तेंडुलकर व वीरेंद्र सेहवाग यांनी प्रत्येकी 6, राहुल द्रविडने 5 तर सुनील गावसकर व विराट कोहली यांनी प्रत्येकी 4 द्विशतके झळकावली आहेत.

भारताची 6 बाद 687 ही सांघिक धावसंख्याही विश्वविक्रमी ठरली. सलग 3 कसोटी सामन्यांमध्ये 600 पेक्षा अधिक धावांची आतषबाजी होण्याची ही पहिलीच वेळ आहे. भारताने यापूर्वी इंग्लंडविरुद्ध मुंबई कसोटीतील पहिल्या डावात सर्वबाद 631 व चेन्नई कसोटीतील पहिल्या डावात 7 बाद 759 धावा फटकावल्या. तोच सिलसिला येथे सलग तिसऱया कसोटीतही कायम राहिला.

वृद्धिमान साहाचे पुनरागमनात शतक

Hyderabad: India's Wriddhiman Saha raises his bat to celebrate his century during the second day of the cricket test match against Bangladesh in Hyderabad on Friday. PTI Photo    (PTI2_10_2017_000143A)

संघात पुनरागमन करणाऱया यष्टिरक्षक वृद्धिमान साहाचे शतक भारतीय संघासाठी दिलासा देणारे ठरले. साहाने 155 चेंडूत नाबाद 106 धावांचे योगदान दिले. कसोटी क्रिकेटमध्ये त्याचे हे दुसरे शतक ठरले आहे. तळाच्या स्थानी साहासह रवींद्र जडेजाने (78 चेंडूत नाबाद 60) देखील फटकेबाजी केल्यामुळे भारताने षटकामागे 4 पेक्षा अधिक सरासरीने धावा जमवल्या.

अजिंक्य रहाणेचीही फटकेबाजी

Hyderabad: Indian Cricketer Ajinkya Rahane plays a shot in a match against Bangladesh at Uppal Stadium in Hyderabad on Friday. PTI Photo(PTI2_10_2017_000032B)

दुखापतीतून सावरल्यानंतर संघात परतलेल्या अजिंक्य रहाणेने खराब फॉर्ममधून बाहेर येत 83 धावांचे योगदान दिले, ते देखील विराटसेनेसाठी अर्थातच विशेष महत्त्वाचे ठरले. रहाणेने 133 चेंडूतील खेळीत 11 दणकेबाज चौकारांचा समावेश राहिला. तैजूल इस्लामच्या गोलंदाजीवर मेहेदी हसन मिराजने अप्रतिम झेल टिपत रहाणेची झुंजार खेळी संपुष्टात आणली. याशिवाय, अश्विनने 45 चेंडूत 34 धावा जमवल्या. बांगलादेशने येथे तब्बल 8 गोलंदाज वापरले. पण, ते सर्व निष्प्रभ ठरले. भारताने पुढे 166 षटकात 6 बाद 687 धावांवर पहिला डाव घोषित केला.

त्यानंतर बांगलादेशने उर्वरित 14 षटकात 1 बाद 41 अशी सुरुवात नोंदवली. सलामीवीर सौम्या सरकारने उमेश यादवच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षक साहाकडे झेल दिला. दिवसअखेर तमिम इक्बाल 48 चेंडूत 24 तर मोमिनूल हक 5 चेंडूत एका धावेवर खेळत होते.

येथील खेळपट्टी आता फिरकी गोलंदाजीला काहीशी पोषक ठरत असताना रविचंद्रन अश्विन व रवींद्र जडेजाला सामोरे जाणे बांगलादेशी फलंदाजांसाठी आव्हानात्मकच असेल, हे आता स्पष्ट आहे.

संक्षिप्त धावफलक

भारत पहिला डाव : 166 षटकात 6/687 वर घोषित. (विराट कोहली 246 चेंडूत 24 चौकारांसह 204, वृद्धिमान साहा 155 चेंडूत 7 चौकार, 2 षटकारांसह नाबाद 106, रवींद्र जडेजा 78 चेंडूत 4 चौकार, 2 षटकारांसह नाबाद 60, अजिंक्य रहाणे 133 चेंडूत 11 चौकारांसह 82, चेतेश्वर पुजारा 83, मुरली विजय 108. अवांतर 8 धावा, तैजूल इस्लाम 3/156, मेहेदी हसन मिराज 2/165, तस्कीन अहमद 1/127).

बांगलादेश पहिला डाव : 14 षटकात 1/41 (तमिम इक्बाल खेळत आहे 24, मोमिनूल हक खेळत आहे 1, सौम्या सरकार 15. अवांतर 1. उमेश यादव 2 धावात 1 बळी)

ब्रॅडमन यांच्या 69 वर्षांपूर्वीच्या विक्रमाशी बरोबरी

NEW DELHI : DOUBLE 100S IN SUCCESSIVE TEST SERIES. PTI GRAPHICS(PTI2_10_2017_000182B)

सर डॉन ब्रॅडमन यांनी 1948 मध्ये कर्णधार या नात्याने 12 वर्षात 4 द्विशतके झळकावली आणि त्यातील शेवटचे द्विशतक भारताविरुद्ध 1948 मध्ये झळकावले होते. त्या 4 द्विशतकांच्या विक्रमाशी विराटने बरोबरी साधली. माजी ऑस्ट्रेलियन कर्णधार मायकल क्लार्कने देखील 4 द्विशतके झळकावली आहेत. मात्र, ती सलग नाहीत. अर्थात, कर्णधार या नात्याने सर्वाधिक कसोटी द्विशतकाचा विक्रम विंडीजचा महान फलंदाज ब्रायन लाराच्या खात्यावर नोंद असून त्याने 5 वेळा असा पराक्रम साकारला आहे. लंकेचा महेला जयवर्धने, ऑस्ट्रेलियाचा ग्रेग चॅपेल, न्यूझीलंडचे स्टीफन फ्लेमिंग व ब्रेन्डॉन मेकॉलम यांच्या खात्यावर कर्णधार या नात्याने प्रत्येकी 3 तर ऍलन बोर्डर, रिकी पाँटिंग (ऑस्ट्रेलिया), हाशिम आमला (द. आफ्रिका), जावेद मियांदाद (पाकिस्तान) यांच्या खात्यावर प्रत्येकी 2 द्विशतके आहेत.

 

सत्रनिहाय खेळावर दृष्टिक्षेप

– / षटके / धावा / बळी / सरासरी

पहिले सत्र / 31/121 /1/3.90

दुसरे सत्र / 32/143 / 2/4.46

तिसरे सत्र / 27/108 / 1/4.00

 

कर्णधार नात्याने विराटची सलग 4 द्विशतके

धावा / चेंडू / प्रतिस्पर्धी / कालावधी/ठिकाण

200/283/ वेस्ट इंडीज /जुलै 2016/अँटिग्वा

211/ 366/ न्यूझीलंड/ ऑक्टोबर 2016/ इंदोर

235 / 340 /इंग्लंड / डिसेंबर 2016/ मुंबई

204 / 246 / बांगलादेश / फेब्रुवारी 2017 / हैदराबाद