|Saturday, January 25, 2020
You are here: Home » आवृत्ती » सांगली » आष्टय़ात तवेरा कार पलटी होवून दहाजण जखमी

आष्टय़ात तवेरा कार पलटी होवून दहाजण जखमी 

वार्ताहर /आष्टा

सांगली-इस्लामपूर रस्त्यावर आष्टा येथील शिंदे मळयाजवळ तवेरा कारचा टायर फुटुन झालेल्या अपघातात, कृषि व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या स्नुषासह दहा जण जखमी झाले. जिल्हा परिषद उमेदवार सागर खोत यांच्या प्रचारासाठी जात असताना हा अपघात झाला. रविवारी सकाळी सव्वा नऊच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

मोहिनी सागर खोत(वय25), दिपा सुनील खोत(वय25), दोघी राहणार मरळनाथपूर, तेजस्विनी गणेश शेवाळ(वय28), राहणार इस्लामपूर, निलेश किसन खोत(वय28), अरुणा दिपक खोत(वय16), राहणार मरळनाथपूर, रुपाली सुनील खोत(वय35), राहणार इस्लामपूर, त्रुप्ती तानाजी हारुगडे(वय21)राहणार येलूर, सुनील लक्ष्मण्ण कचरे(वय27) राहणार मरळनाथपूर, जयकर हिंदुराव खोत(वय25) राहणार मरळनाथपूर, योगिता दिपक खोत(वय18) राहणार मरळनाथपूर अशी या अपघातात जखमी झाल्याल्यांचे नावे असून राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या स्नुषा सौ.मोहिनी खोत व दिपा खोत यांचा जखमी मध्ये समावेश आहे. या अपघातात त्रुप्ती तानाजी हारुगडे व सुनील लक्ष्मण कचरे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर कोल्हापूर येथील प्रभू रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

याबाबत घटना स्थळावरुन व आष्टा पोलिस ठाण्याकडून मिळालेली अधिक माहिती अशी, कृषि व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचे चिरंजीव सागर खोत हे बागणी जिल्हा परिषद मतदार संघातून निवडणुक लढवीत आहेत. रविवारी सकाळी सागर खोत  यांच्या प्रचारार्थ तवेरा कारमधून(क्रमांक-एमएच-45-ए-7572) सदाभाऊ खोत यांच्या स्नुषा मोहिनी सागर खोत, दिपा सुनील खोत, तेजस्विनी शेवाळ, निलेश खोत, अरुणा खोत, रुपाली खोत, त्रुप्ती हारुगडे, सुनील कचरे, जयकर खोत, योगिता खोत हे सर्वजण कारंदवाडीकडे जात असताना शिंदे मळयाजवळ आले असता तवेरा कारचा मागील टायर अचानक फुटल्याने कार पलटी झाली. कार वेगात असल्याने कारने तिन वेळा पलटी झाली. कार पलटी झाल्याने कारचा चुराडा झाला. या अपघातात दहाजण जखमी झाले. यामध्ये दोघेजण गंभीर जखमी झाले असून आठजण किरकोळ जखमी झाले आहेत. गंभीर जखमीमध्ये चालक सुनील लक्ष्मण कचरे व त्रुप्ती तानाजी हारुगडे यांचा समावेश असून दोघांच्याही डोक्यास गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर कोल्हापूर येथील डॉ. प्रभू यांच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर उर्वरित जखमींवर इस्लामपूर येथील लोकनेते राजारामबापू पाटील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

या अपघाताची नोंद आष्टा पोलिस ठाण्यात झाली असून अधिक तपास पोलिस निरीक्षक अशोक कदम करीत आहेत.

          सोशल मिडीयावर अफवांना ऊत

सोशल मिडीयावर या अपघाताची माहिती वेगाने पसरली गेली. यामुळे काही वेळ अफवांना ऊत आला होता. अपघाताची माहिती समजताच घटनास्थण कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. अपघातानंतर प्रवाशी व नागरिकांनी तातडीने जखमींना कारमधून बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात पाठविले.

Related posts: