|Thursday, January 23, 2020
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » मोर्चामध्ये मोठय़ा संख्येने सहभागी होण्याचे आवाहन

मोर्चामध्ये मोठय़ा संख्येने सहभागी होण्याचे आवाहन 

प्रतिनिधी/ बेळगाव

मराठा आणि मराठी भाषिक क्रांती मोर्चा यशस्वी करण्यासाठी प्रत्येक नगरसेवकांनी आपापल्या विभागाची जबाबदारी घ्यावी, तसेच आपापल्या विभागातून जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महापौर सरिता पाटील यांनी केले आहे. सोमवारी महानगर पालिकेत आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत मोर्चामध्ये मोठय़ा संख्येने सहभागी होण्याचे आवाहनही करण्यात आले.

यावेळी बोलतांना संभाजी पाटील यांनी मराठी भाषिकांच्या भविष्याच्या दृष्टीकोनातून मोर्चा यशस्वी करण्याची गरज आहे. प्रत्येकाने आपापल्या विभागात जनजागृती करून मोर्चात सहभागी होण्यास प्राधान्य द्यावे, असे मत व्यक्त केले. मनपा गट नेते पंढरी परब यांनी मराठा क्रांती मोर्चा हा सर्वांसाठी महत्वाचा असून, ‘मराठय़ांसाठी मराठी आणि मराठी मराठय़ांसाठी’ या नाण्याच्या दोन बाजू असून बेळगावात काही समस्या निर्माण झाल्यास मराठा समाज अग्रेसर असतो. यासाठी आज मराठा समाजातही युवती-युवक यांना प्राधान्य मिळने गरजेचे आहे, असे मत व्यक्त केले.

माजी महापौर किरण सायनाक, उपमहापौर संजय शिंदे आदींनी मनोगत व्यक्त केले. बैठकीला माजी महापौर महेश नाईक, दिनेश रावळ, मनोहर हलगेकर आदी उपस्थित होते.

समविचारी आघाडीतर्फे मोर्चा यशस्वी करण्याचे आवाहन

मराठी भाषिकांच्या विविध समस्यांसाठी काढण्यात येणारा मोर्चा यशस्वी करण्याचे आवाहन समविचारी आघाडीतर्फे करण्यात आले आहे. नगरसेवक विनायक गुंजटकर यांनी मोर्चा यशस्वी करण्याची जबाबदारी प्रत्येकाची असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी माजी उपमहापौर, मीना वाझ, नगरसेविका सुधा भातकांडे, मिनाक्षी चिगरे, नागेश मंडोळकर, रुपा नेसरकर, माजी उपमहापौर रेणू मुतगेकर, पुंडलीक परीट आदी यावेळी उपस्थित होते.

टिळकवाडी भागाची आज बैठक

मराठा क्रांती मोर्चाबाबत चर्चा करण्यासाठी वॉर्ड क्र. 17 व 18 मधील नागरिकांची संयुक्त बैठक मंगळवार दि. 14 रोजी सायंकाळी 7 वाजता महर्षी महात्मा गांधी रोड येथील सिद्धीविनायक मंदिर येथे आयोजित करण्यात आली आहे. यावेळी सर्व नागरिकांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन नगरसेवक पंढरी परब यांनी केले आहे.

Related posts: