|Friday, January 24, 2020
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » कृष्णा काठावर लाखो भाविकांची गर्दी

कृष्णा काठावर लाखो भाविकांची गर्दी 

वार्ताहर/ चिंचली

कर्नाटक, महाराष्ट्रासह इतर राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या चिंचली येथील श्री मायाक्का देवीच्या दर्शनासाठी लाखो भाविक दाखल झाले आहेत. मंगळवारी यात्रेचा मुख्य दिवस असून भाविकांची उच्चांकी गर्दी होणार असून यादिवशी महानैवेद्य होणार आहे.

दक्षिण महाराष्ट्र व उत्तर कर्नाटकातील लाखो भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या मायाक्कादेवी यात्रेच्या मंगळवारच्या मुख्य दिवसासाठी चिंचली नगरी सज्ज झाली आहे. गेल्या शनिवारपासून यात्रेला मोठय़ा उत्साहात प्रारंभ झाला आहे. पौर्णिमेच्या दुसऱया दिवशी मानदेशात गेलेल्या देवीला बोलाविण्यासाठी गावचे प्रमुख व कमिटी अध्यक्ष जितेंद्रराव जाधव-देसाई सरकार भाविकांसह जाऊन बोलावून येतात. दररोज धार्मिक विधी होत आहेत. धार्मिक महत्त्व असलेल्या दूध ओढय़ावर लाखो भाविकांनी स्नानासाठी गर्दी केली होती.

चिंचलीतील प्रत्येक रस्त्यावर, गल्लीत तसेच शेतशिवारात मोठय़ा प्रमाणात भाविकांची गर्दी दिसून येते. देवीच्या गाण्यांनी संपूर्ण गावच भक्तीमय बनले आहे. मायाक्का देवीच्या यात्रेचा आज मुख्य दिवस असल्याने अनेक व्यापाऱयांनी आपली दुकाने आकर्षकपणे थाटली आहेत. मिठाई, कुंकू, भंडारा, खेळण्यांचे स्टॉल, बांगडय़ांची दुकाने, हॉटेल मोठय़ा प्रमाणात आली आहेत. मनोरंजनासाठी नाटक, तमाशा व शेतीसाठी लागणारी अवजारे, खानावळी, दुकाने सज्ज झाली आहेत.

मंगळवारी मुख्य दिवशी लाखोंच्या संख्येने येणाऱया भाविकांच्या सुरक्षेसाठी कुडचीचे उपनिरीक्षक शिवशंकर मुकरी दोन हजार पोलीसांसह तैनात आहेत. यात्रेत संशयास्पद व्यक्ती दिसल्यास पोलिसांना कळवावे, भाविकांनी जागरुक राहून सावधगिरी बाळगावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

यात्रेला येणाऱया भाविकांच्या सेवेसाठी आरोग्य खाते, नगरपंचायत व देवस्थान कमिटीच्यावतीने सर्व तयारी ठेवली आहे. गावात डीडीटी पावडरची फवारणी केली असून गावातील सर्व गटारींची स्वच्छता करण्यात येत आहे. भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. कुडची येथील कृष्णा नदीवर यात्रेला येणाऱया भाविकांनी गर्दी केली आहे. आपल्या कुटुंबीयांसह कृष्णा नदीत स्नान करून यात्रेला येत आहेत. भाविकांच्या गर्दीमुळे संपूर्ण वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. यात्रेत दोन दिवस गर्दीचा महापूर वाहणार आहे.

मायाक्का देवीची पालखी मिरवणूक

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या चिंचली येथील मायाक्का देवीची सोने व चांदीच्या पालखीतून 12 रोजी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी हजारो भाविकांनी गर्दी केली होती. देवस्थान कमिटी व भाविकांनी दिलेल्या देणगीतून ही सोन्या-चांदीची पालखी बनविण्यात आली आहे. 4 किलो सोने व 14 किलो चांदीपासून सदर पालखी तयार करण्यात आली आहे. 12 रोजी सकाळी 9 ते 11.30 पर्यंत पालखीची पूजा व यज्ञ पार पडले. त्यानंतर दुपारी 12 वाजता पालखीमध्ये देवीची उत्सव मूर्ती बसवून पालखी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी हजारो भाविकांनी पालखीचे दर्शन घेतले.

उदं ग आई उदं च्या जयघोषाने दुमदुमला कृष्णाकाठ

मांजरी : येथील कृष्णा नदीकाठी चिंचलीस जाणाऱया भाविकांनी गर्दी केली असून नदीकाठ उदं ग आई उदंच्या जयघोषाने दुमदुमला. महाराष्ट्रातून येणाऱया भाविकांनी सोमवारी मोठय़ा संख्येने नदीकाठी थांबून स्नान, पूजा केली. चिंचली येथील मायाक्का देवीच्या यात्रेसाठी भाविक मोठय़ा संख्येने येत आहेत.

दरवर्षी महाराष्ट्रातून येणाऱया भाविकांची संख्या अधिक असते. पूर्वी भाविक बैलगाडीने प्रवास करत होते. आता वाहतुकीची साधने वाढल्याने चारचाकी व दुचाकीवरून भाविक येत आहेत. त्यामुळे या भागातील रहदारीत वाढ झाली आहे. कृष्णा नदीकाठी भाविक लिंब नेसतात. त्यामुळे नारळ, कापूर, साखर व लिंब विक्रेत्यांनी आपली दुकाने थाटली आहेत. भाविकांकडून मोठय़ा प्रमाणात खरेदी केली जात असल्याने विक्रेते समाधानी आहेत. या भागातील वर्दळ वाढल्याने हॉटेल व्यवसायही तेजीत आला आहे.

कृष्णा नदीच्या दोन्ही काठांवर भाविकांनी गर्दी केली आहे. चिंचली यात्रा संपेपर्यंत भाविकांचा ओघ सुरू असतो. पूर्वी भाविक मांजरी येथील जुन्या पुलावरून चिंचलीस जाता येत होते. मात्र सध्या जुन्या पुलाची पडझड झाली आहे. हा पूल नेहमी पाण्याखाली जात असतो. सध्या या पुलावर पाणी नसले तरीही पडझडीमुळे वाहतूक करता येत नाही. त्यामुळे नवीन पुलावरून अंकली, बुवाची सौंदत्तीमार्गे वाहतूक सुरू आहे. भाविकांच्या वर्दळीमुळे हा परिसर गजबजला आहे.न

Related posts: