|Friday, January 24, 2020
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » भ्रष्टाचारमुक्त समाजासाठी कॅशलेस व्यवहार गरजेचे

भ्रष्टाचारमुक्त समाजासाठी कॅशलेस व्यवहार गरजेचे 

वार्ताहर/ निपाणी

काळय़ा पैशाच्या निर्मितीस पायबंद घालून भ्रष्टाचारमुक्त भारत निर्माण करण्यासाठी रोखीने व्यवहार करण्याऐवजी रोकडरहीत म्हणजेच कॅशलेस व्यवहार वाढविणे ही गरज आहे. भारत सरकारच्या कॅशलेस डिजीटल भारत मोहिमेमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी समाज जागृती करून राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. पी. एम. हेरेकर यांनी केले.

अर्जुननगर येथील देवचंद महाविद्यालयात शिवाजी विद्यापीठ, राष्ट्रीय सेवा योजना विभाग, अनुलोम यांच्या संयुक्त विद्यमाने वित्तीय साक्षरता अभियान व रोकडरहीत व्यवहार या विषयावर एकदिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे खजिनदार सुबोध शाह होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते रोपटय़ाला पाणी घालून शिबिराचा शुभारंभ करण्यात आला.

प्राचार्य हेरेकर पुढे म्हणाले, विद्यार्थ्यांनी सरकारच्या विविध योजना समजून घेतल्या पाहिजेत. त्यांचा वापर स्वतःच्या घरासाठी तसेच समाजासाठी कसा होईल याचा प्रचार व प्रसार केला पाहिजे. प्रत्येकाने कॅशलेस व्यवहार करण्याला प्राधान्य दिले पाहिजे. तरच शासनाचे धोरण यशस्वी होणार आहे, असे सांगितले.

अनलोमचे जिल्हा समन्वयक पराग जोशी म्हणाले, शासनाने जनतेसाठी विविध योजना राबविल्या आहेत. पण त्या योजनांचा लाभ योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचताना दिसत नाही. योजना पोहोचण्यासाठी जनतेला त्याची पूर्ण माहिती होणे गरजेचे आहे. याकरिताच अनुलोम हे ऍप सुरू करण्यात आले आहे. शेतकऱयांच्या अपघात विमासंदर्भात शासनाने गोपीनाथ मुंडे अपघाती विमा योजना सुरू केली आहे. अपघातात मृत्यू पावलेल्या शेतकऱयाला या योजनेतून 2 लाख रुपये मिळू शकतात. यासाठी कोणत्याही एजंटाची आवश्यकता नाही. युवकांमध्ये देश बदलण्याची क्षमता आहे. राष्ट्रीय सेवा योजनेच्या प्रत्येक स्वयंसेवकाने फक्त 5 लोकांना कॅशलेसबद्दल माहिती द्यायची आहे. असे झाल्यास ती निपाणीतील क्रांती होईल, असे सांगितले.

यावेळी आधीश तेंडूलकर, प्रसाद पंडीतराव, प्रा. डॉ. अमरदीप जाधव यांनीही विचार मांडले. राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक प्रा. आनंद गाडीवड्डर यांनी आभार मानले. यावेळी प्रकाश शाह, प्रदीप मोकाशी, बी. डी. मेहता, उपप्राचार्य व्ही. बी. घाटगे, डॉ. व्ही. डी. गायकवाड, प्रा. नानासाहेब जामदार, डॉ. संतोष यादव, डॉ. मुळीक, एस. ए. देसाई, प्रा. एस. ए. जाधव, डॉ. एस. एस. पाटील यांच्यासह राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक उपस्थित होते.

Related posts: