|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » कचऱयातलं आमचं जगणं, कचऱयातच शोधतोय बालपण..!

कचऱयातलं आमचं जगणं, कचऱयातच शोधतोय बालपण..! 

सुशांत पाटील / सातारा

पोटासाठी कायपण, कालपण, आजपण अन्.. कचऱयातलं आमचं जगणं, कचऱयातच शोधतोय बालपण..! पुस्तक अन् पाटी हे सारं विसरणं, कचऱयातच खेळणं, घाणीतच राहणं. भोळं-भाबडं मन कवाच जातय उडून, हसरं बालपण निसटतय भुरर्कन…. अशी व्यथा साताऱयातील कचऱयातच बालपण शोधणाऱया चिमुकल्यांची आहे.

सामाजिक जाणिवांना स्पर्श करणाऱया अनेक घटना आपल्या भोवताली घडत असतात. ज्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असते, त्या  घरातील कोवळे जीव पोटाची खळगी भरण्यासाठी मोलमजुरी करताना दिसतात. सरकार प्रयत्न करत नाही, असं नाही. ते सर्वांना शिक्षण मिळावं म्हणून कोटय़ावधी रूपये खर्च करतं. त्यांना वाटतं खरच बदल झालाय. मग लगेच आपले सरकार जाहिरातबाजी करतं अन् म्हणतं, ‘आता बदल दिसतोय, माझा महाराष्ट्र घडतोय’. पण कोवळय़ा जीवाला जेव्हा पोटाची खळगी भागवण्यासाठी कचऱयाच्या डब्यात उतरावं लागतं. तेव्हा मात्र माय बाप सरकार ! कसला बदल दिसतोय ओ? असा प्रश्न पडल्याशिवाय राहत  नाही.

चिमुकल्यांना पोटासाठी करावी लागतेय वणवण

सातारा शहरात पालिकेने चौकाचौकात नागरिकांना कचरा टाकण्यासाठी कचऱयाचे डबे ठेवले आहेत.  विशेष म्हणजे त्या कचऱयाच्या डब्यात जेवढा कचरा असतो, तेवढाच कचरा त्या कचऱयाच्या डब्याच्या बाहेरही पडलेला दिसतो. अशा ठिकाणी ज्या मुलांना आई-वडिल नाहीत किंवा ज्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे, जी अनाथ आहेत, अशी मुलं या कचऱयांच्या डब्यात काहीतरी मोठी वस्तू सापडेल व त्याचं पैकं भी अधिक मिळतील, या आशेने उतरतात. ह्या मुलांना काहीही कळत नाही. दररोज आपली रोजी-रोटी भागली पाहिजे, याच उद्देशाने ते दिवसभर भटकंती करत असतात.

बालपण हरवतय कचऱयातच

या मुलांना शाळेविषयी विचारल्यानंतर ती म्हणाली, शाळा, दप्तर, पाटी-पुस्तक असलं काय बी लागत न्हाय आम्हांला. आमची रोजचा दिस कचऱयातच जातूय. लोकं बी चांगल्या चांगल्या वस्तू कचऱयात टाकत्यात. त्यामुळं आम्हांला पैसं मिळत्यातं. कवा कवा या कचऱयात चांगलं-चुंगल खायाला बी आम्हांला मिळतं., अशी विचार करायला लावणारी उत्तरे ही चिमुकली देतात.