|Monday, August 19, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » शशिकला यांना चार वर्षे कारावास

शशिकला यांना चार वर्षे कारावास 

मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न भंगले, तामिळनाडूच्या राजकारणाला निर्णायक कलाटणी

नवी दिल्ली, चेन्नई / वृत्तसंस्था

तामिळनाडूचे मुख्यमंत्रिपद मिळवण्यासाठी आकाश-पाताळ एक करणाऱया शशिकला यांचे स्वप्न अखेर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने भंग पावले आहे. बेहिशेबी मालमत्तेच्या प्रकरणात त्यांना चार वर्षांचा कारावास, 10 कोटी रुपयांचा दंड आणि 10 वर्षे कोणतेही राजकीय पद स्वीकारण्यास बंदी, अशी कठोर शिक्षा ठोठावण्यात आली आहे. दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांनाही दोषी धरण्यात आले आहे. या निकालामुळे जयललिता यांच्या मृत्यूनंतर गेला एक महिनाभर रंगलेल्या राज्यातील राजकारणाला कलाटणी मिळाली आहे. तसेच अण्णाद्रमुक पक्षाच्या भवितव्यावरही मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

न्या. पी. सी. घोष आणि न्या. अमित्व रॉय यांच्या खंडपीठाने हा ऐतिहासिक निकाल मंगळवारी सकाळी 10.30 वाजता दिला. खंडपीठाने जयललिता, शशिकला आणि शशिकलांचे दोन नातेवाईक व्ही. एन. सुधारकन व एलावरासी यांना दोषी ठरविणारा बेंगळूर येथील कनिष्ठ न्यायालयाचा निकाल कायम ठेवला. कर्नाटक उच्च न्यायालयाने मात्र पुरेशा पुराव्याअभावी आरोपींची निर्दोष मुक्तता केली होती. त्यानंतर कर्नाटक सरकारने उच्च न्यायालयाच्या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात अपील केले होते. या निकालामुळे ते स्वीकारण्यात आले आहे. शशिकला व इतर आरोपींनी त्वरित स्वतःला पोलिसांच्या आधीन करावे, असा आदेशही खंडपीठाने दिला आहे.

जयललिताही दोषी

1996 च्या या बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता, त्यांच्या निकटवर्तीय शशिकला नटराजन व दोन नातेवाईक यांच्यावर उत्पन्नाच्या ज्ञात स्रोतांपेक्षा अधिक उत्पन्न साठविल्याप्रकरणी खटला चालविण्यात आला होता. तो तामिळनाडूबाहेर बेंगळूर येथील कनिष्ठ न्यायालयात चालविण्यात आला. त्यात सर्व आरोपींना दोषी धरण्यात आले. पण सर्वोच्च न्यायालयाकडून अंतिम निकाल येण्यापूर्वीच जयललिता यांचे निधन झाले. मात्र, या प्रकरणातील वस्तुस्थिती पाहता त्याही दोषी ठरतात, असे खंडपीठाने निकालात म्हटले आहे. आपल्या ज्ञान उत्पन्नस्रोतांपेक्षा 66 कोटी रुपयांची मालमत्ता अधिक असल्याचा आरोप सर्व आरोपींवर ठेवण्यात आला होता.

स्वतंत्र निकालपत्रे

खंडपीठाच्या दोन्ही न्यायमूर्तींनी या प्रकरणात स्वतंत्र निकालपत्रे दिली. मात्र निकालासंबंधी आणि शिक्षेसंबंधी या दोन्ही निकालपत्रांमध्ये समानता आहे. समाजात सध्या भ्रष्टाचाराची बजबजपुरी माजली आहे. ती नष्ट करणे आवश्यक आहे, अशी टिप्पणी न्या. अमित्व रॉय यांनी त्यांच्या निकालपत्रात केली आहे.

युक्तीवादानंतर 8 महिन्यांनी निकाल

7 जून 2016 या दिवशी सर्वोच्च न्यायालयात दोन्ही बाजूंच्या वकिलांचा युक्तीवाद संपला होता. त्यानंतर निकाल राखून ठेवण्यात आला होता. आता 8 महिन्यांनी तो देण्यात आला आहे.

सर्वत्र कडेकोट बंदोबस्त

निकाल घोषित झाल्यानंतर त्वरित तामिळनाडूमध्ये सर्वत्र कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. चेन्नई व इतर शहरांमधील सरकारी आस्थापने, शिक्षणसंस्था आणि इतर महत्वाच्या स्थानांवर अतिरिक्त पोलीस दल नियुक्त करण्यात आले आहे. राज्यातील स्थिती शांततापूर्ण असून कोणत्याही अनुचित प्रसंगाचे उदाहरण नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

जयललितांना होता 100 कोटींचा दंड

बेंगळूर येथील कनिष्ठ न्यायालयाने जयललिता यांना चार वर्षांच्या कारावासाबरोबरच 100 कोटी रुपयांचा दंडही ठोठावला होता. तो सर्वोच्च न्यायालयानेही कायम राखला आहे. कनिष्ठ न्यायालयाने शशिकला आणि त्यांचे दोन नातेवाईक यांना चार वर्षे शिक्षा आणि 10 कोटीचा दंड केला होता.

आठ मिनिटात निकालाचे उच्चारण

खंडपीठाने मंगळवारी सकाळी साडेदहाच्या सुमाराला निकालाच्या वाचनास न्यायगृहात प्रारंभ केला. केवळ निकालाच्या अंमलबजावणी योग्य भागाचे वाचन करण्यात आले. एकंदर आठ मिनिटांमध्ये हे वाचन करण्यात आले. यावेळी न्यायालयात पूर्ण शांतता होती. मात्र निकाल वाचन संपताच कुजबुज सुरू झाली. काही वकील हा निकाल प्रसारमाध्यमांना सांगण्यासाठी न्यायमंदिराबाहेर धावले.

सुब्रम्हणियम स्वामींकडून स्वागत

1996 मध्ये सध्याचे भाजपचे नेते सुब्रम्हणियम स्वामी यांनी जयललिता आणि इतरांविरोधात या प्रकरणाची तक्रार सादर केली होती. आज ही तक्रार खरी ठरली आहे. स्वामी यांनी या निकालाचे स्वागत केले आहे. 20 वर्षांची आपली प्रतीक्षा आज फळाला आली आहे, अशा शब्दात त्यांनी त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली.

शशिकला यांच्या रिझॉर्टवर पोलीस

शशिकला यांनी त्वरित पोलिसांच्या आधीन व्हावे, अशा आदेश न्यायालयाने दिल्याने पोलिस त्यांच्या गोल्डन बे रिझॉर्टवर पोहचले आहेत. त्या स्वतःहून शरण आल्या नाहीत, तर त्यांना कोणत्याही क्षणी अटक करण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

पन्नीरसेल्वम यांची पक्षातून हकालपट्टी

खरे शक्तीपरीक्षण विधानसभेतच

सर्वेंच्च न्यायालयाने शिक्षा ठोठावल्यानंतरही शशिकला यांनी उसने अवसान आणत सध्याचे मुख्यमंत्री पन्नीरसेल्वम यांची पक्षातून हकालपट्टी केली. पक्षावर आपली पूर्ण पकड आहे, हे दाखविण्याचा त्यांचा हा प्रयत्न होता, अशी चर्चा आहे. तसेच त्यांनी आपल्या गटातील इडप्पाडी पलानीस्वामी यांची नियुक्तीही करून टाकली आहे. स्वामी यांनी संध्याकाळी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी भेट घेऊन आपल्याला बहुमत असल्याचे सांगितले. मात्र आता पन्नीरसेल्वम की पलानीस्वामी मुख्यमंत्री होणार हे विधानसभेतच शक्तीपरीक्षणात ठरेल असे कायदेतज्ञांचे मत आहे.