|Tuesday, October 22, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » 104 उपग्रहांच्या प्रक्षेपणासह इस्त्रोचा विक्रम

104 उपग्रहांच्या प्रक्षेपणासह इस्त्रोचा विक्रम 

पीएसएलव्ही सी-37 ची यशस्वी मोहीम, 101 उपग्रह विदेशी, राष्ट्रपती, पंतप्रधानांकडून शास्त्रज्ञांचे अभिनंदन

श्रीहरिकोटा / वृत्तसंस्था

उपग्रह प्रक्षेपण क्षेत्रात भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्त्रो) विश्वविक्रम केला आहे. बुधवारी येथील सतीश धवन अवकाश केंद्रातून सकाळी 9 वाजून 28 मिनिटांनी पीएसएलव्ही सी-37 या अग्नीबाणाने एकाचवेळी 104 उपग्रहांचे अवकाशात यशस्वी प्रक्षेपण केले. प्रक्षेपणानंतर 17 मिनिटांमध्येच सर्व उपग्रहांना पूर्वनिर्धारित कक्षांमध्ये स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू झाली. ती 30 मिनिटांमध्ये पूर्ण करण्यात आली.

या देदिप्यमान यशाबद्दल राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रोच्या शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले. यापूर्वी रशियाने एकाचवेळी 37 उपग्रहांचे प्रक्षेपण केले होते. तो विक्रम आता भारताकडून मोडला गेला आहे. भारताने या बाबतीत रशियाबरोबरच अमेरिकेलाही मागे टाकले आहे.

101 विदेशी उपग्रह

प्रक्षेपित करण्यात आलेल्या उपग्रहांपैकी 101 विदेशी बनावटीचे आहेत. तर 3 उपग्रह भारतीय बनावटीचे आहेत. पीएसएलव्ही सी-37 या अत्याधुनिक अग्नीबाणाने सतीश धवन केंद्राच्या पहिल्या उड्डाण कक्षातून ही मोहीम यशस्वी केली. पीएसएलव्ही श्रेणीतील अग्नीबाणाचे हे 39 वे अवकाश प्रक्षेपण आहे. 101  विदेशी उपग्रहांपैकी 96 अमेरिकेचे, तर इस्रायल, संयुक्त अरब अमिरात, नेदरलंड, स्वित्झर्लंड आणि कझाकिस्तानचा प्रत्येकी एक उपग्रह आहे. बव्हंशी उपग्रह दूरसंचार यंत्रणेशी संबंधित आहेत.

अग्नीबाणाने अवकाश उड्डाण केल्यानंतर प्रथम संपूर्ण भारतीय बनावटीचा कॅरोसॅट 2 पृथ्वी निरीक्षण उपग्रह त्याच्या कक्षेत स्थानापन्न केला. त्यानंतर भारताचेच दोन अतिलघु उपग्रह स्थानापन्न करण्यात आले. त्यांची नावे आयएसएस 1 ए व आयएनएस 1 बी अशी आहेत. त्यानंतर अवघ्या 10 मिनिटांमध्ये 101 विदेशी उपग्रह अग्नीबाणातून मोकळे झाले आणि त्यांनी त्यांच्या कक्षेत भ्रमण करण्यास प्रारंभ केला. यापूर्वी जून 2014 मध्ये रशियाने एकाचवेळी 37 उपग्रह सोडले होते. भारतानेही जून 2015 मध्ये 23 उपग्रह एकाचवेळी प्रक्षेपित केले होते.

आम्हीही शतक झळकवू शकतो

आपले क्रिकेटवीर ज्याप्रमाणे शतक झळकवतात, तसे आम्हीही झळकवू शकतो., अशी प्रतिक्रिया इस्त्रो उपग्रह केंद्राचे संचालक मायीलसामी अण्णादुराई यांनी व्यक्त केली. तर या माहिमेचे संचालक बी. जयकुमार यांनी या मोहिमेतील अनेक जटीलतांवर प्रकाश टाकला. विक्रम साराभाई अवकाश केंद्राचे संचालक के. शिवन यांनी ही मोहीम आतापर्यंतची सर्वात अवघड होती, असे स्पष्ट केले.

काही उपग्रहांची माहिती…

ड भारतीय बनावटीचा 664 किलो वजनाचा कर्टोसॅट 2 हा उपग्रह पृथ्वीचे अंतराळातून निरीक्षण करून महत्वाची माहीती पाठविणार आहे.

ड 88 क्युब हा अमेरिकेचा उपग्रह सॅनफ्रान्सिस्कोच्या कंपनीचा इमेजिंग उपग्रह आहे. तोही पृथ्वी निरीक्षण उपग्रह असून प्रतिमा पाठविणार आहे.

ड स्पायर ग्लोब या अमेरिकन कंपनीचे आठ उपग्रह आहेत. ते सर्व दूरसंचार प्रणालीशी संबंधित आहेत. जहाज ट्रकिंगसाठी त्यांचा उपयोग आहे.

ड भारताचे दोन अतिलघु उपग्रह आहेत. त्यांचा संबंध इमेजिंग आणि पृथ्वी निरीक्षणाशी आहे. ते पूर्ण भारतीय बनावटीचे आहेत.

ड अमेरिका आणि भारत सोडून इतर पाच देशांचे लघु उपग्रह आहेत. ते अवकाश आणि पृथ्वीच्या अभ्यासासाठी निर्माण केले आहेत.