|Friday, December 13, 2019
You are here: Home » आवृत्ती » पुणे » पवारांवर जनतेचा विश्वास आहे का, हे आधी बघा!

पवारांवर जनतेचा विश्वास आहे का, हे आधी बघा! 

पवारांवर जनतेचा विश्वास आहे का, हे आधी बघा!

पुणे / प्रतिनिधी

‘राज्यातील सरकार पडले, तर आम्ही भाजपाला पाठिंबा देणार नाही,’ या शरद पवारांच्या विधानावर माझ्यापेक्षा जनतेचा विश्वास आहे का, हे आधी बघा. तेच अधिक महत्वाचे आहे, असा टोला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत लगावला. पुण्यात प्रचारासाठी आले असता ते बोलत होते. माजी मंत्री व शहराध्यक्ष रमेश बागवे, अभय छाजेड, युवक अध्यक्ष विश्वजित कदम आदी उपस्थित होते.

राज्यातील भाजपा सरकारचा पाठिंबा काढण्याचा इशारा शिवसेनेने दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर सेनेने पाठिंबा काढला, तरी आम्ही भाजपाला साथ देणार नसल्याचे पवार यांनी स्पष्ट केले आहे. विधानसभा निवडणूक निकालानंतर भाजपाला पाठिंबा जाहीर करणाऱया पवार यांच्या या वक्तव्याबाबत विविध अर्थ लावले जात आहेत. पवार यांच्या या विधानावर विश्वास आहे, का असे विचारले असता माझा पवार यांच्या विधानावर किती विश्वास आहे, हे महत्त्वाचे नाही. तर जनतेचा पवार यांच्या विधानावर किती विश्वास आहे, हे बघा. तेच अधिक महत्त्वाचे आहे, असा चिमटा त्यांनी काढला. माझ्या व्यक्तिगत मतांबद्दल अनेक समज गैरसमज निर्माण केले जातात. मी राष्ट्रवादीविरोधात नाही. तसे असते, तर कराडमध्ये आघाडी झालीच नसती. प्रत्येक नेता हा आपल्या पक्षाच्या विस्तारासाठी प्रयत्न करीत असतो. त्यादृष्टीने काही भूमिका घ्याव्या लागतात. पवारांसोबत एकत्रित सभेकरिताही आपल्याला कोणती अडचण नाही. मात्र, हा निर्णय स्थानिक नेत्यांनी घ्यायचा असतो, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

देशात अस्थिरतेची स्थिती

सध्या देशात अस्थिरता असून, पाचही विधानसभांमध्ये भाजपाला फार यश मिळण्याची शक्यता नाही. महाराष्ट्रात राजकीय अस्थिरता निर्माण करण्यातही सर्वस्वी भाजपा जबाबदार आहे. युतीमधील भाजपा हा सीनिअर पार्टनर आहे. युतीत वाद झाले, तरी सर्वांना सोबत घेऊन जाऊन स्थिरतेचा संदेश देण्याची जबाबदारी राज्याच्या मुख्यमंत्र्यांची असते. त्यातूनच राज्यातील सुरक्षित वातावरण, गुंतवणूक वाढत असते. मात्र, मुख्यमंत्री सध्या वेगळीच भाषा वापरत आहेत. विरोधकांवरची टीका समजण्यासारखी असली, तरी मित्रपक्षावरील त्यांची टीका कुठल्या प्रकारचा विश्वास निर्माण करणार, असा सवाल त्यांनी केला.

मुख्यमंत्री आता गुंडांची कार्यशाळा घेणार का?

सध्या सेना-भाजपा भांडणालाच मीडिया स्पेस दिली जात आहे. अशीच रणनीती नाही ना, असा प्रश्नही यातून निर्माण होतो. मागच्या अडीच वर्षांत सरकारला भरीव काही करता आले नाही. स्वतःचे अपयश झाकण्याठीच निवडणुकीच्या तोंडावर हे राजकीय नाटय़ होत असावे. त्यामुळे सेना बाहेर पडेल, अशी शक्यता सध्यातरी वाटत नाही आणि त्यांनी तसा निर्णय घेतला, तरी सरकार पडेल, असे संभवत नाही. त्यासाठी अविश्वास ठराव आणावा लागेल. काही झाले, तरी आम्ही यापैकी कुणालाही पाठिंबा देणार नाही. परंतु, आहे त्या स्थितीला सामोरे जाऊ, असे त्यांनी स्पष्ट केले. सरकारमध्ये सध्या गुंडांना सुधारण्याच्या गोष्टी केल्या जात आहे. मुख्यमंत्री काय गुंडांच्या कार्यशाळा घेणार आहेत काय? कुठल्या राजकीय संस्कृतीचे हे प्रदर्शन आहे? हे किळसवाणे आहे, अशी टीका करतानाच नोटाबंदीतून किती काळा पैसा बाहेर आला, याचा हिशेब मोदींना द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

Related posts: