|Thursday, August 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » एकांडा शिलेदार

एकांडा शिलेदार 

मुंबईवर कुणाचा झेंडा फडकणार हे 23 फेब्रुवारीला समजेल. आजवर भाजपचा टेकू घेऊनच शिवसेनेने मुंबई महानगरपालिकेत सत्ता राखली आहे. यावेळी सत्ताबाजार कमालीचा भडकलाय. भाजपच्या दिल्लीतील नेत्यांना आता शिवसेना नकोशी झाली आहे. पंतप्रधान, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पक्षाचा असताना मुंबईचा महापौर भाजपचाच असायला हवा, असे प्रयत्न त्या पक्षाने सुरू केले आहेत. मात्र, शिवसेनेशी टक्कर देणे आजवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनाही जमलं नाही. भाजप तर शिवसेनेच्या आधारानेच मुंबईत वाढला, हे नाकारता येणार नाही. तरीही राजकारणात महत्त्वाकांक्षा ही बाब महत्त्वाची ठरते. मुंबईवर सत्ता हवीच या महत्त्वाकांक्षेने भाजपच्या नेत्यांना पूर्ण पछाडले आहे. त्यामुळे स्वबळाची तयारी वर्षभर भाजप करीत होता. तर ही महत्त्वाकांक्षा लपून न राहिल्याने शिवसेनाही शहाणी झाली. भाजप आणि शिवसेनेतील 25 वर्षांचा दोस्ताना तुटला आणि आता एकेकाळचे व्यवहारी मित्र अखेर परस्परांचे शत्रू बनले. ही युती केव्हातरी तुटायची होती, फुटायची होतीच. यावेळी तो मुहूर्त मुंबई महापालिकेच्या निवडणुकीने दिला आणि दोन मित्र आज टोकाची, अटीतटीची, ताण-तणावाची भाषा बोलत आहेत. जेव्हा शिवसेना विरुद्ध काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस होती. तेव्हा कधीही अशी टोकाची आगलावी स्पर्धा झाली नाही. आणि वैचारिक पातळीवर मित्र राहिलेल्या शिवसेना-भाजपमध्ये मात्र एकमेकांची तोंडेही पाहिली जात नाहीत. इतकी ही वैरभावना का? कशासाठी?

याचे एक आणि एकच उत्तर असे की, मुंबईची सत्ता म्हणजे एका छोटय़ा राज्याचीही सत्ता. 37 हजार कोटीची मुंबई महानगरपालिका ही देशातील श्रीमंत महानगरपालिका आहे. तिची सत्ता आपल्याकडेच असावी, असे भल्या-भल्या राजकारण्यांना वाटते. आजवर काँग्रेस-राष्ट्रवादीने महाराष्ट्रावर सत्ता गाजविली. शिवसेनेला मुंबई महानगरपालिका सोडली. आंदण दिली. असेच आजवर बोलले गेले. त्यात काही अंशी तथ्यही आहे. आज दिल्लीत आणि महाराष्ट्रात भाजपची सत्ता आहे. सेनेच्या मदतीने सत्तेची चव आजवर भाजपने चाखली आहे. मात्र, आज या पक्षाची भूख वाढली आहे. राजकीय अभिलाषाही मोठी आहे. त्यामुळेच चतकोर सत्तेचा विट भाजपाला आला आहे. आता फक्त आमचीच सत्ता राहणार असे या भाजप नेत्यांना वाटते आहे. वाटणे आणि प्रत्यक्ष कृती होणे या महद अंतर आहे. या वास्तवाकडे नरेंद्र मोदींच्या दहशतीखाली आणि प्रेमात पडलेले नेते दुर्लक्ष करीत आहेत.

मुंबईतील निवडणूक ही चौरंगी आणि पंचरंगी होण्याचीच खरी गरज होती. मात्र, चित्रं नेमकं उलटं आहे. यावेळी शिवसेना-भाजप यांच्यातच सरळ सामना आहे, असंच संपूर्ण चित्र आणि माहोल आहे. जाहीर सभा त्यांच्याच. सोशल मीडियावर त्यांचाच बोलबाला आणि प्रसार माध्यमात त्यांचीच चर्चा. त्यांच्याच जाहिराती आणि लोकातही त्यांचीच चर्चा रंगत आहे. कुजबूजसुद्धा युतीचीच.

मुंबईत शिवसेना आणि भाजपचा सरळ संघर्ष सुरू आहे. सत्तेतील हे दोन मित्र वैरी बनून प्रचारात उतरले आहेत. न शोभणारी भाषा लोकांना ऐकावी लागते आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुशिक्षित, सुसंस्कृत, सभ्य, संयमी असे व्यक्तिमत्व मानले जाते. पण हे फडणवीस आज सर्व मर्यादा सोडून प्रचाराच्या खालच्या पातळीवर उतरलेले दिसतात.

पारदर्शकतेच्या मुद्यावर आता कपडे उतरविण्याची भाषा मुख्यमंत्री फडणवीसाच्या मुखातून येते, तेव्हा सुसंस्कृत आणि सभ्य मतदारांना काय वाटेल, याचाही विचार होत नाही. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री याआधी असा बोलला-वागला नसेल. मुख्यमंत्र्यांनी आधी पक्षाची ताकद लक्षात घेण्याची गरज होती. बेडकी फुगून किती फुगणार? मुंबईची राजकीय संस्कृती त्यांनी समजून घेण्याची गरज होती. संघटन आणि कार्य याचा अंदाज त्यांनी घ्यायला हवा होता. केवळ सत्तेच्या जोरावर लोकमत वळविता येत नाही. आणि शेवटी उसनं अवसान आणण्याची वेळ येते. याचा अनुभव आज भाजप घेत आहे.

आक्रमक शिवसेनेला आज मुख्यमंत्री फडणवीस हेच सारं बळ एकवटवून शिवसेनेला अंगावर घेत आहेत. त्याबद्दल ते अभिनंदनास पात्र आहेत. भाजपचे नेते आक्रमकतेपासून दूर आहेत. सोमय्या, शेलार यांचा अपवाद वगळता. बाकीचे नेते, मंत्री, पदाधिकारी प्रचारात दिसतच नाही. केवळ मुख्यमंत्री फडणवीस हेच एकांडय़ा शिलेदाराप्रमाणे शिवसेनेशी सामना, संघर्ष करीत आहेत.

निवडणुकीचा प्रचार हा मुद्यांवर असायला हवा. भाजपचे नेते वैयक्तिक पातळीवर उतरले आहेत. `पार्टी वुईथ डिफरन्स’ म्हणतात ते यालाच काय? मोदींच्या आदेशाने मुख्यमंत्री फडणवीस चालतात, असे बोलले जाते. त्यामुळे मर्यादा, शिस्त सोडून मुख्यमंत्री फडणवीसांना बोलावे लागते आहे. हे खरं आहे. तरीही भाजपची सारी जबाबदारी, सारं ओझं मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावरच आहे. काही चुका, काही मतभेद असले तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकांडय़ा शिलेदाराप्रमाणे बेधडक लढत आहेत, संघर्ष करीत आहे, हे मानायलाच हवे.

विलास मुकादम