|Monday, September 23, 2019
You are here: Home » क्रिडा » डेव्हिस चषकसाठी बेंगळूर यजमान

डेव्हिस चषकसाठी बेंगळूर यजमान 

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेतील उझबेकिस्तानविरुद्ध होणारी लढत एप्रिल महिन्यात बेंगळूर येथे होणार असल्याची घोषणा भारतीय टेनिस महासंघाने केली आहे. कर्नाटक राज्य लॉन संघटनेच्यावतीने या लढतीचे आयोजन केले जाईल. ही लढत दि. 7 ते 9 एप्रिलदरम्यान होणार आहे.

आशिया/ओशेनिया गटात पुणे येथे झालेल्या पहिल्या फेरीच्या लढतीत भारताने न्यूझीलंडवर 4-1 असा दणदणीत विजय मिळवला होता. उझबेकने पहिल्या फेरीतील लढतीत दक्षिण कोरियाला 3-1 असे नमवले होते. उझबेकविरुद्ध भारताने विजय मिळवल्यास भारताला जागतिक गटात प्ले-ऑफ लढतीत खेळण्याची संधी मिळेल. यापूर्वी 2014 साली भारतीय संघ बेंगळूर येथे याच स्पर्धेत सर्बियाविरुद्ध खेळला होता.

भारत व उझबेकिस्तान यापूर्वी चारवेळा आमनेसामने आले होते. त्यात दोन्ही संघानी प्रत्येकी दोन वेळा बाजी मारली आहे. 2012 मध्ये मायदेशात उझबेकने भारताला 3-2 असे पराभूत केले होते. त्याआधी 2008 मध्ये दिल्ली येथे भारताने उझबेकला 3-2 असे पराभूत पेले होते. नॉन-प्लेईंग कर्णधार म्हणून महेश भूपतीची ही पहिलीच लढत असेल. या लढतीसाठी भारतीय संघाची निवड मार्चच्या पहिल्या आठवडय़ात केली जाणार आहे. ही लढत जिंकणारा संघ सप्टेंबरमध्ये होणाऱया वर्ल्ड ग्रुप प्ले-ऑफमध्ये खेळणार आहे. यामुळे मायदेशात होणारी उझबेकिस्तानविरुद्ध लढत जिंकणे भारताला अनिवार्य आहे.