|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » गोकाकमधील दोघांकडून 33 लाखाच्या जुन्या नोटा जप्त

गोकाकमधील दोघांकडून 33 लाखाच्या जुन्या नोटा जप्त 

प्रतिनिधी / गडहिंग्लज

कोल्हापूर जिल्हय़ातील गडहिंग्लज तालुक्यातील हलकर्णी-बसर्गे मार्गावर पोलिसांनी केलेल्या कारवाईत 1000 आणि 500 रुपयाच्या मिळून 33 लाख 50 हजाराच्या जुन्या नोटा जप्त केल्या आहेत. गडहिंग्लज तालुक्यात जुन्या नोटा जप्त करण्याची ही पहिलीच कारवाई असल्याने खळबळ उडाली आहे.

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी अवैध धंदे, दारू, मटका, जुगार यांच्यावर कारवाई सुरू केली आहे. भरारी पथके नाकाबंदी करत अवैध धंद्यावर आळा घालण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पोलीस निरीक्षक बिपीन हसबनीस यांच्या मार्गदर्शनाखाली हलकर्णी-बसर्गे मार्गावर शुक्रवारी दुपारी अचानक नाकाबंदी करण्यात आली. यावेळी हलकर्णीहून बसर्गेच्या दिशेने टाटा इंडिगो (केए 22, एएन 7263) ही गाडी येत होती. पोलिसांनी सदर गाडी अडवून तपासणी केली असता मागील सीटवर नोटांनी भरलेली रेक्झीनची बॅग आढळून आली. यात 1000 व 500 च्या जुन्या नोटा भरलेल्या आढळून आल्या. गाडीचालक आनंदा काडाप्पा पाटील व आडव्याप्पा करबसाप्पा मठपती (दोघेही रा. अक्कतंगिरेहोळ, ता. गोकाक) यांना अटक केली आहे. या रक्कमेबाबत त्यांच्याकडून कोणतेही समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याचे सांगण्यात आले. निवडणूक निर्णय अधिकारी संगिता चौगुले यांना याबाबतची माहिती दिली असून पुढील कार्यवाही त्यांच्या मार्गदर्शनाखाली केली जात आहे. पोलीस निरीक्षक श्री. हसबनीस, फौजदार एस. ए. नागरगोजे, सहाय्यक फौजदार सर्जेराव झुरळे, आप्पा सुरंगे, मधुकर पोवार, संभाजी कोगेकर, संतोष घस्ती, विनायक सुतार, कृष्णा कांबळे यांनी या कारवाईत भाग घेतला.