|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » पाकिस्तानात ऐतिहासिक हिंदू विवाह विधेयक संमत

पाकिस्तानात ऐतिहासिक हिंदू विवाह विधेयक संमत 

राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर कायद्यात रुपांतरित : हिंदूंना मिळणार मोठा दिलासा

वृत्तसंस्था / इस्लामाबाद

पाकिस्तानात अल्पसंख्याक हिंदूंच्या विवाहाच्या नियमनाशी संबंधित बहुप्रतीक्षित महत्त्वपूर्ण विधेयकाला संसदेने सर्वसंमतीने मंजुरी दिली. आता राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर हे विधेयक कायद्यात रुपांतरित होईल. पाकिस्तानात हा हिंदू समुदायाचा पहिला विस्तृत पर्सनल लॉ असेल.

कनिष्ठ सभागृह म्हणजेच नॅशनल असेम्बलीने या विधेयकाला 15 सप्टेंबर 2015 रोजीच मंजुरी दिली होती. पाकिस्तानात राहणाऱया हिंदूंना या नव्या होणाऱया कायद्यामुळे मोठा दिलासा मिळेल कारण हा यात विवाह, विवाहाची नोंदणी, घटस्फोट आणि पूनर्विवाहाशी संबंधित तरतुदी असणार आहेत. या विधेयकात युवक तसेच युवती दोघांसाठी विवाहाचे किमान वय 18 वर्षे निश्चित करण्यात आले आहे. या विधेयकाच्या मदतीने हिंदू महिला आता आपल्या विवाहाचे प्रमाणपत्र पुरावा म्हणून प्राप्त करू शकतील.

हा पाकिस्तानी हिंदूंसाठी पहिला पर्सनल लॉ असेल, जो पंजाब, बलुचिस्तान आणि खैबर पख्तूनख्वा प्रांतांमध्ये लागू होईल. सिंध प्रांताने आधीच आपले हिंदू विवाह विधेयक तयार केले आहे. विधेयक सिनेटमध्ये कायदा मंत्री जाहिद हमीद मांडले. या विधेयकाला सभागृहात कोणीच विरोध केला नाही.

जमीयत उलेमा-ए-इस्लाम-फजलचे खासदार मुफ्ती अब्दुल सत्तार यांनी या विधयेकाला सभागृहाबाहेर बोलताना विरोध दर्शविला. पाकिस्तानच्या हिंदूंसाठी आतापर्यंत एक वैयक्तिक कायदा बनवू शकलो नाही हे दुदैवी आहे. हा प्रकार इस्लामच्या तत्वांविरोधात तसेच मानवाधिकारांचे उल्लंघनाचा होता असे विधेयकाला समर्थन करताना सिनेट समितीचे अध्यक्ष नसरीन जलील यांनी म्हटले.

सत्ताधारी पाकिस्तानी मुस्लीम लीग-नवाजचे हिंदू खासदार रमेश कुमार वंकवानी देशात हिंदू विवाह कायद्यासाठी 3 वर्षांपासून प्रयत्नशील होते. त्यांनी खासदारांचे आभार मानत या कायद्यामुळे बळजबरीने होणाऱया धर्मांतरांना आळा बसेल असे म्हटले. हिंदू विवाहितेसाठी ती विवाहित असल्याचे सिद्ध करणे याआधी अवघड व्हायचे. यामुळे बळजबरीने धर्मांतर करविण्यात सामील गुन्हेगारांना ती बळी ठरायची असे त्यांनी सांगितले.

या कायद्यामुळे ‘शादी परठ’ नावाच्या दस्तऐवजाचा मार्ग मोकळा होईल. हा दस्तऐवज ‘निकाहनामा’प्रमाणेच असेल, ज्यावर पंडित स्वाक्षरी करेल. तसेच तो सरकारी विभागात नोंदणीकृत असणार आहे. परंतु हिंदू खासदार आणि समुदायाच्या सदस्यांनी विधेयकाच्या एका तरतुदीवर चिंता व्यक्त केली आहे, ही तरतूद घटस्फोटाशी संबंधित आहे.

Related posts: