|Monday, February 24, 2020
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » ….तेथे कर माझे जुळती

….तेथे कर माझे जुळती 

26 जाने. 2017 च्या पूर्वसंध्येला ‘पद्म’ पुरस्कारांची घोषणा झाली. त्यात काही प्रसिद्ध नावे होती, तशीच काही अपरिचित नावेही… त्यानं माझं लक्ष वेधून घेतलं. खऱया अर्थानं मानवतेची निःस्वार्थ सेवा करणाऱया ‘असामान्य’ सामान्यांच्या- ‘अनसंग हीरोज्’चा या पद्मश्री पुरस्कारानं सन्मान झाला. नव्हे, हे पुरस्कारही एका वेगळय़ा अर्थाने सन्मानित झाले. ज्यांनी माणुसकीची सेवा करणारी व प्रसिद्धीपासून कोसो दूर असणारी माणसं शोधली, त्यांना दाद दिली पाहिजे.

माणुसकीचं सर्वात उत्कट दर्शन कुठं होतं? अपघातग्रस्त व संकटात सापडणारा जीव वाचवण्यात. त्यांना मदत करणारी माणसं सामान्य असतील, पण ज्यांचा जीव वाचला त्यांच्यासाठी देवदूताहून कमी नसतात. त्यांनी काही जीव वाचवून उदात्त माणुसकीच्या तत्त्वाचा आविष्कार घडवलेला असतो. प. बंगालमधील जलपायगुडी जिल्हय़ातील करीमूल हक हा चहाच्या मळय़ात अवघ्या चार हजार रु. मासिक कमावणारा, पण आजारी माणसांना तातडीची वैद्यकीय मदत मिळावी म्हणून त्यातले निम्मे पैसे दरमहा खर्चत चक्क ‘बाईक ऍम्बुलन्स’ सेवा गेली अनेक वर्षे करतो आहे. ‘ऍम्ब्युलन्स सेवा चोवीस तास उपलब्ध. वैयक्तिक स्पर्श आणि त्वरित प्रतिसाद’ असं लिहिलेल्या अनेक ऍम्ब्युलन्सेस आपण अनेक वेळा पाहिल्या असतील, पण त्या सशुल्क असतात. अनेकदा जास्त पैसे उकळतात. ऍम्बुलन्स सेवेचाही त्यांनी व्यवसाय केलेला असतो. पण करीमूल हकची दुचाकीवर चालणारी ‘बाईक ऍम्बुलन्स’ सेवा ही मोफत आहे आणि ती त्याच्या मनातील दया व करुणेचा उत्कट आविष्कार आहे. जलपायगुडी हा तसा अविकसित भाग. तेथे रस्ते व पूल नाहीत, मग प्राथमिक आरोग्य केंद्र तर दूर राहिलं आणि तातडीच्या वेळी ऍम्बुलन्स सेवा तर विचारूच नका… त्याचा फटका आपलं लाख मोलाचं जवळचं माणूस गमावतो तेव्हा बसतो… आणि तो जिव्हारी बसतो. करीमुलला पण आपली आई तातडीनं ऍम्बुलन्स न मिळाल्यामुळे गमवावी लागली होती… आईचं जाणं करीमूलच्या जीवनाला नवी कलाटणी देणारी ठरलं. आपल्याप्रमाणे इतर कुण्या व्यक्तीला असं जवळचं प्रेमाचं माणूस गमावून बसण्याची वेळ येऊ नये, असा विचार त्याच्या मनात आला. आणि अंतःप्रेरणेनं त्यानं ‘बाईक ऍम्बुलन्स’ सेवा सुरू केली. त्यानं आपल्या साध्या पेट्रोल बाईकचं रूपांतर ऍम्बुलन्समध्ये केलं. पंचक्रोशीतील कुणाही गरजूनं फोन केला की तो आपली ‘बाईक ऍम्बुलन्स’ घेऊन तत्काळ हजर होत पेशंटला दवाखान्यात पोचवायचा. तालुक्मयातील जवळच्या आरोग्य केंद्राच्या आड नदी असल्यामुळे व त्यावर पूल नसल्यामुळे त्याला अनेकदा पन्नास पन्नास किलोमीटरचा फेरा पडायचा. पण करीमूलचं गरजू रुग्णांना शक्मय तितकी तातडीची वैद्यकीय सेवा मिळवून देणं जीवनध्येय असल्यामुळे कधीही तक्रार करायची नाही. हे तू का करतोयस? असं त्याला कुणी तरी एकदा विचारलं, तेव्हा करीमूल हकनं जे साध-सरळ उत्तर दिलं, ते तर मानवतेचं तत्त्वज्ञानच आहे. ‘माझी अम्मी वेळेवर वैद्यकीय सेवा न मिळाल्यामुळे दगावली होती. म्हणून गरिबांसाठी मी ही ‘बाईक ऍम्बुलन्स’ सेवा सुरू केली. अल्लाच्या कृपेनं मी लागणारा पेट्रोलचा खर्च सोसत सेवा गावकऱयांना मोफत सेवा देऊ शकतो, मी हे माझ्या मातेच्या स्मरणार्थ व तिला अल्लानं स्वर्गात सुखी ठेवावं म्हणून करत आहे…’ अवघी 4,000 रु.ची मासिक कमाई असणारी चहाच्या मळय़ामधली त्याची नोकरी, पत्नी व 4 मुलांचा मोठा संसार. पण त्यातले निम्मे पैसे तो दरमहा वर्षानुवर्षे गरिबांना मोफत ‘बाईक ऍम्बुलन्स’ सेवा देण्यासाठी खर्च करतो. करोडपतीचं दातृत्वही यापुढे फिकं पडावं.

आज उद्योग जगतात ‘कार्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी’चा बोलबाला आहे. त्यासाठी केंद्र सरकारनं कायदा केला आहे व नफ्यातील 5 टक्के भाग हा समाजसेवेसाठी खर्च करावा असं सक्तीचं केलं आहे. अनेक कंपन्या  यातून मदत करतात व आयकर सवलतही मिळवतात. रतन टाटा, नारायण मूर्ती वा असिम प्रेमजी हे उद्योगपती अपवादरूप म्हणून सोडले तर ‘सीएसआर’चा कायदा करूनही शिक्षण व आरोग्य क्षेत्रात, जेथे मदतीची फार मोठी गरज आहे, तेथे कंपन्या फारसे काही करत नाहीत. त्या पार्श्वभूमीवर करीमूल हकचं काम श्रीमंत आहे…

या वषीच्या पद्मश्री पुरस्काराचा आणखी एक ‘अनसिंग हिरो’ ठरला आहे, त्याची कहाणी पण तेवढीच प्रेरक आणि माणुसकीवरची आस्था वाढविणारी आहे. त्याचं नावं बिपीन गणात्रा. हा मूळ गुजरातचा. पण कोलकाताला अडीच हजार रु. मासिक पगाराची इलेक्ट्रिशियनची नोकरी करणारा. पण तो अग्निशामक दलाच्या ‘फायर मॅन’ सारखंच आगीत सापडणाऱया माणसांना वाचवण्याचं काम करतो-स्वप्रेरणेनं. करीमूलप्रमाणे यानं पण ‘फायरमन’चं काम सुरू केलं ते वैयक्तिक जीवनातील एका दु:खद घटनेमुळे. बिपीन अवघ्या 12 वर्षांचा असताना त्याच्या भावाचा आगीत सापडून होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे त्यानं आपलं जीवनध्येय ठरवून टाकलं-आगीत सापडलेल्या माणसांना वाचवायचं. भले त्यासाठी स्वतःचा जीव धोक्मयात टाकावा लागला तरी हरकत नाही.  बिपीन म्हणतो, ‘माझा भाऊ आगीत होरपळून मेला, तो गॅरेजमध्ये मोटारसायकलच्या दुरुस्तीचं काम करताना स्पार्क होऊन. आता मी आगीत सापडलेल्या प्रत्येक माणसात माझा भाऊ पाहतो आणि त्याला वाचवायचा प्रयत्न करतो.’

बिपीनला कोलकातामधले सर्व अग्निशामक कर्मचारी-अधिकारी नावाने ओळखतात व त्याला आपला एक सदस्य मानतात. त्याला कधीही त्या सेवेत जायचा मोह झाला नाही. बिपीन हा आगीत सापडलेल्यांना वाचवणारा देवदूतच होता. एका इमारतीत 5 व्या मजल्यावर राहणारी एक गरोदर महिला अकस्मात शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत सापडली असता, बिपीन धावून गेला, आणि तिला आगीतून बाहेर काढलं. तेव्हा तिच्या डोळय़ात अश्रू होते. ती त्याला कृतज्ञतेने म्हणाली, ‘मला जर मुलगा झाला तर त्याचं नाव मी बिपीन ठेवेन!’ निष्काम कर्मयोग व निःस्वार्थ मानवसेवा यापेक्षा वेगळी का असते? ‘आग दिसली की त्यात उडी घेणं, तिथे अडकलेल्या लोकांचा जीव वाचवणं यात मला आनंद आहे. असं करून मी जेव्हा घरी परततो तेव्हा मला रात्रीची शांत व समाधानी झोप लागते.’ हे त्याचं कथनही त्याच्या मनाची उंची दर्शवतं!

करीमूल हक व बिपीन गणात्रा-हे दोघं निःस्वार्थपणे लोकांच्या मदतीला धावून जाणारे सामान्य जीव. पण त्यांनी जे काम हाती घेतलं, त्यानं मानवता धन्य झाली. समाधानाची गोष्ट म्हणजे या वषीच्या पद्म पुरस्कारार्थीच्या यादीत त्यांना स्थान मिळालं आहे ते लौकिकार्थानं एवढे छोटे आहेत की त्यांना पद्म पुरस्कार काय असतो, तो कोणाला व कसा मिळतो हे माहीत असण्याचं काहीच कारण नाही. पण केंद्र सरकारनं त्यांना शोधलं व पुरस्कार देऊन त्यांचं मानवतावादी कार्य जगापुढे आणलं हे प्रशंसनीय आहे.

आपण सारे नेहमी करवदत असतो की, आजच्या बाजारू अर्थकारणाच्या जगात पैसा हेच एकमेव मूल्य झालं आहे आणि माणुसकी संपत चाललीय… बऱयाच प्रमाणात हे खरं आहे. या पार्श्वभूमीवर करीमूल हक आणि बिपीन गणत्रा हे ‘अनसंग हीरो’ मानवी संस्कृतीला जी समृद्धी देतात, माणुसकीवरचा उडत चाललेला विश्वास पुनश्च बहाल करतात. अशी असामान्य माणसं आपल्या अवतीभोवती आहेत, हे किती आश्वासक आहे. त्यांच्यातलं हे आभाळभर उंचीचं माणूसपण आणि दया-करुणा पाहिली की म्हणावंसं वाटतं, ‘तेथे कर माझी जुळती!’

Related posts: