|Sunday, March 29, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » द्रमुकचा राज्यव्यापी उपोषणाचा इशारा

द्रमुकचा राज्यव्यापी उपोषणाचा इशारा 

वृत्तसंस्था / चेन्नई

अण्णाद्रमुकच्या महासचिव शशिकला यांचे विश्वासू आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री ई. पलानीस्वामी यांनी विधानसभेत जिंकलेला विश्वासदर्शक ठराव फेटाळण्याचे आवाहन द्रमुकने राज्यपाल सी. विद्यासागर राव यांना केला. विधानसभा नियमांचे उल्लंघन करत मतदान घेण्यात आल्याचा आरोप या विरोधी पक्षाकडून करण्यात आला. शनिवारी विश्वासदर्शक ठराव सादर करण्यापूर्वी द्रमुकच्या सर्व आमदारांना विधानसभा सभागृहातून बाहेर काढण्यात आले होते. द्रमुकवर अन्याय करण्यात आला असून ‘लोकशाहीची हत्या’ करण्यात आली, असा आरोप पक्षाने केला. या प्रकरणी पक्षाचे कार्यकर्ते बुधवारी, 22 फेब्रुवारीला राज्यव्यापी उपोषण करत आंदोलन करतील असा इशारा पक्षाकडून देण्यात आला.

द्रमुकचे जेष्ठ नेते एम. के. स्टॅलिन यांनी रविवारी तामिळनाडूचे राज्यपाल विद्यासागर राव यांची भेट घेतली. शनिवारी विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडण्यात आला होता. यावेळी द्रमुक आणि अण्णाद्रमुक या दोन्ही पक्षाच्या आमदारांनी गोंधळ घातला होता. शनिवारी विधानसभेत संमत करण्यात आलेला विश्वासदर्शक ठराव नामंजूर करण्यात यावा. लोकशाही आणि राज्यघटनेचे संरक्षण करण्यासाठी राज्यपालांनी हस्तक्षेप करावा अशी विनंती करण्यात आली. विधानसभा नियमांचे उल्लंघन करत द्रमुकच्या सर्व आमदारांना सभागृहाबाहेर जबरदस्तीने काढण्यात आले. सभागृहातील सुरक्षारक्षकांनी आमदारांना जबरदस्तीने बाहेर काढल्याने काहींना जखमा झाल्या आहेत. याशिवाय अन्य विरोधी पक्षांनी विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाचा विरोध व्यक्त करत सभागृहाचा त्याग केला होता, असे स्टॅलिन यांनी म्हटले.

एखादा प्रस्ताव सभागृहासमोर मांडल्यानंतर सभागृह स्थगित करण्यात आले, तर तो प्रस्ताव बरखास्त होतो. मात्र अध्यक्षांनी या नियमाकडे दुर्लक्ष केले. 1988 मध्ये अशाच प्रकरणी निर्णय घेण्यात आल्यानंतर राज्यपालांनी तो निर्णय फेटाळला होता, असे स्टॅलिन यांनी राज्यपालांच्या निर्दशनात आणून दिले. लोकशाही आणि राज्यघटनेचे संरक्षण करण्यासाठी राज्यपालांनी हस्तक्षेप करावा. अथवा बुधवारी सकाळी 9 ते दुपारी पाच वाजेपर्यंत राज्यव्यापी उपोषण आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला. यावेळी द्रमुकचे राज्यसभा सदस्य आर. एस. भारती, टी. के. एस. एलनगोवन, तिरुची एन. शिवा उपस्थित होते.

Related posts: