|Wednesday, January 22, 2020
You are here: Home » आवृत्ती » सातारा » जाहीर प्रचार संपला, आता नोटाबंदीची ऐशीतैशी

जाहीर प्रचार संपला, आता नोटाबंदीची ऐशीतैशी 

दीपक प्रभावळकर/ सातारा

संपाताचा कहर होत चाललेल्या निवडणूकीतला सुवर्णकाळ आता काही तासावर येवून ठेपला आहे. रविवारी रात्री माईकची बटणं अगदी पोलीसांनी बंद केली तेव्हा पुढाऱयांची तोंड बंद झाली. मतदार बिचारा गेल्या महिन्यापासून ऐकत असलेले किर्तन बंद झाले अन् रविवार रात्रीपासून ‘लक्ष्मी’चा संचार सुरू झालाय. कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री 12 वाजता लक्ष्मी विचारत असते, को जागरती? (कोण जागे आहे?) अगदी तशीच अवस्था तथाकथित लक्ष्मीपुत्रांची झालीय. रात्री उशिरापर्यंत कोण जागं आहे ते बघुन पैसा पोहोचवण्याचे काम जोमात आलंय. त्या गंमत म्हणजे माण खटाव तालुक्यात सुरू आहे. कोजागिरीला दुधाची वाट बघत बसलेले चाहते, जसा प्रचार संपला तसे लक्ष्मीलाच शोधायला पळत सुटलेत. बरं, गोरेबंधुंनीच दुधाची सवय लावलीय आता तर दोघे आमनेसामने आहेत म्हणजे नुसतं दुधच काय, दुधावरची साय पण मिळेल म्हणून घसा कोरडा करून बसलेल्यांना प्रचार संपताच लक्ष्मीपुत्रांनी पोबारा केल्याचे ध्यानात आलंय, आता बसा बोंबलत असे दोन्ही गटातले कार्यकर्ते एकमेकांना म्हणतायत.

दरम्यान, सांगता सभांना गर्दि जमवणे भल्या-भल्यांच्या जिवाशी आले होते. परवा पुण्यात फडणवीसांच्या सभेला गर्दि नव्हती. हे बघुन पार अगदी शेंद्र, कुकुडवाड, बोंद्री अशा गावातल्या मतदारांनी ‘पुणेरी थाटात’ सायंकाळी 6 च्या सभेला जाताना, ‘आम्ही वामकुक्षी घेतोय’ असा विनाकारणच आव आणला. तेंव्हा कुठं उमेदवारानं खिश्यात हात घातला अन् फडणवीसांसारखी अब्रू जावू नये याची तजवीज केली.

आख्या निवडणूकीत उदयनराजेंचे काहीच जोरदार स्टेटमेंट नाही किंवा त्याची स्टाईलमधे कमिटमेंट नाही म्हणून कान लावून बसणारे कार्यकर्ते अस्वस्थ होते. अखेर उदयनराजेंनी आपले मौन सोडले आणि वसंत मानकुमरेंवर बाक काढला. कधी तमासगीर बायकांसोबत नाचणारे तर कधी वरातीत पैसे उडवणारे मानकुमरे सेनेतुन राष्ट्रवादीत आले अन पक्षाला पनवती लागली. मानकुमरेंनी छत्रपती संभाजीराजे यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा धागा पकडत उदयराजे म्हणाले, ‘या वश्याला दांडक्याने फोकळत मुंबईला पाठवणार आहे’ बस्स इतकं वाक्य साऱया निवडणुकीत भाव खावून गेलंय. मतदारांना काय कळायचं ते कळतयंच की.

बरं, महाराजांनी भाजपसोबत केलेल्या अलिखित आघाडीचा शिवेंद्रराजेंना अजून अर्थचा कळलाय कि नाही कोण जाणे. कारण वर्ण्यात भाजपाच्या मनोज घोरपडेंच्या विरोधात साविआचे गणेश देशमुख ठाण मांडून आहेत मात्र नागठाणे गटात साविआच्या उमेदवार भाग्यश्री मोहितेंच्या सभेत श्री. छ. दमयंतीराजे भोसले यांच्यासह मनोज घोरपडे हेसुद्धा उपस्थित होते.  गट बदलला कि निती बदलायची ही यावेळी उदयराजेंनी खेळी खेळली आहे.

तिकडं कुडाळ गटाकडे साऱयांच्या नजरा लागल्या आहेत. कारण माजी पालकमंत्री शशिकांत शिंदेचे बंधुंची बऱयाच वर्षांनंतर गावाकडं नजर गेलीय. बरं, थोरला भाव हाय. न्हाय म्हणावं तरी पंचाईत. त्यापेक्षा होऊन जाऊ दे…. अशीच शिंदेंची धारणा आहे. भाजपाच्या दीपक पवारांनी आधिपासून ठरवून ‘जय मल्हार’मधल्या म्हाळसा ला निमंत्रित केले होते. मग काय ऋषिभैय्यांच्यातला मुंबईवाला जागा झाला. तो म्हाळसा आणतो तर मी पण काय कमी नाय, ‘मी बानुबयाला आणणार…असे सांगून त्यांनी आणले सुद्धा’ आता प्रचार तसाच सुरू झालाय. आपले देवदेवता आहेत कोणी वाईट कशाला बोलेल? पण निरिश्वरवाद्यांना थांबवणार कसे… म्हाळसा विरूद्ध बानुबया असे काही चर्चेला स्वरूप आलंय.

एकुण, जाहिर प्रचार संपला असून उमेदवारांनी कोजागिरी करायला सुरूवात केली आहे. एकदा का ही कोजागिरीची रात्र संपली की पाच वर्षे शिमगाच साजरा करायचाय. (क्रमशः)

Related posts: