|Wednesday, December 11, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » शिवजयंती चित्ररथ स्पर्धेत आडपई युवक संघ प्रथम

शिवजयंती चित्ररथ स्पर्धेत आडपई युवक संघ प्रथम 

प्रतिनिधी/ फोंडा

शिवजयंतीनिमित्त फोंडा शिवजयंती समारोह समिती, ज्ञानदीप गोवा व लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी यांनी संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या चित्ररथ स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धेतील साठ हजार रुपयांचे पहिले बक्षीस आडपई-फोंडा येथील आडपई युवक संघाला प्राप्त झाले. विजेत्यांना राज्य निवडणूक आयुक्त नारायण नावती यांच्या हस्ते बक्षिसे प्रदान करण्यात आली.

सायंकाळी तिस्क-फोंडा येथून या चित्ररथ स्पर्धेला प्रारंभ झाला. नारायण नावती, लोकमान्यचे कुमार प्रियोळकर, सुहास खांडेपारकर, आयोजन समितीचे मंगेश कुंडकईकर, दै. तरुण भारतचे निवासी संपादक सागर जावडेकर, आयोजन समितीचे शंकर जाधव, प्रताप फडते इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत प्रारंभ करण्यात आला. या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी अंत्रुज महालातील नागरिकांनी मोठय़ा संख्येने उपस्थिती लावली होती.

बेळगावातील पथकांनी भरले रंग

बेळगाव येथील एकदंत ढोल-ताशा पथक तसेच लेझिम, मल्लखांब व लाठी चालविणे यासारख्या थरारक पथकांच्या सहभागाने चित्ररथ मिरवणुकीत रंग भरला. लेझिम पथकातील चिमुरडय़ा मुलींनी उपस्थितांची मने जिंकली. मल्लखांबवरील कसरती देखील लोकांच्या दाद मिळवून गेल्या. सायंकाळी तिस्क-फोंडा ते दादा वैद्य चौकपर्यंत लोकांनी गर्दी केली होती.

या स्पर्धेतील 50 हजारांचे दुसरे बक्षीस शिवगणेश युवक यांना प्राप्त झाले. तिसरे 40 हजारांचे बक्षीस शिवानंद बोरकर व संघ यांना तर चौथे 30 हजारांचे बक्षीस गजानन युवक संघाला प्राप्त झाले. पाचवे 20 हजारांचे बक्षीस फोंडा नागरिक समिती यांना तर उत्तेजनार्थ 10 हजार रुपयांची बक्षीसे अनुक्रमे साई रवळनाथ बाल मंडळ-कवळे, शिवम संघ, सावई-वेंरे, ब्लास्टर टीम, कामाक्षी बाल मंडळ, महालक्ष्मी बाल कलाकार, महालक्ष्मी-बांदोडा व नवदुर्गा कला मंडळ, पारपतीवाडा-बोरी यांना प्राप्त झाली.

बक्षीस वितरण समारंभाच्या व्यासपीठावर फोंडय़ाचे उपजिल्हाधिकारी परेश फळदेसाई, फोंडा पालिकेचे मुख्याधिकारी नवनाथ नाईक, सागर जावडेकर, कुर्टीचे पंच सदस्य नावेद तहसिलदार, कुमार प्रियोळकर, सुहास खांडेपारकर, गोविंद काळे, मंगेश कुंडकईकर, प्रताप फडते, शंकर जाधव तसेच सचिन मदगे, नागेश सरदेसाई व निलेश महाले यांची उपस्थिती होती.

यावेळी बोलताना नारायण नावती म्हणाले की, शिवरायांच्या अंगामध्ये अनेक गुण ठासून भरले होते. पण त्यापैकी संघटन कौशल्य हा गुण सर्वात महत्वाचा होता. गेल्या दोन दिवसापासून याच संघटन कौशल्य गुणाचा अनुभव आम्ही या ठिकाणी घेतोय, उत्कृष्ट संघटन कौशल्यामुळेच हा शिवजयंतीचा कार्यक्रम भव्य दिव्य स्वरूपात साजरा करणे शक्य झाले. हे संघटन कौशल्य आचरणात आणणे आवश्यक असते. फोंडेकरासाठी हा कार्यक्रम म्हणजे एक पर्वणीच होती. फोंडा ही सांस्कृतिक राजधानी, या राजधानीत किरणजी ठाकुर यांनी हा कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय घेतल्याने त्यांचे आभार मानावे तेवढे कमीच आहे.

पूर्ण शिवाजी महाराज आत्मसात करायचा असेल तर आपल्याला कदाचित दहा जन्मही पुरणार नाहीत. धर्म आणि संघटन या गोष्टी आचरणात आणल्या तर आज जगात जो अधर्म व अत्याचार चालतोय, अशा काही गोष्टी थांबल्या तर शिवरायांचा आशीर्वाद मिळाला असे समजायला हरकत नाही.

Related posts: