|Sunday, September 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस ऑन डय़ुटी 24 तास

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस ऑन डय़ुटी 24 तास 

तब्बल 2 हजार 137 पोलीस बंदोबस्तात तैनात

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक

जिह्याला पोलीस छावणीचे स्वरूप

प्रतिनिधी /रत्नागिरी

निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी तसेच निवडणूक शांततेत पार पडण्यासाठी पोलीस दलाची भूमिका फार महत्वाची असते. नगर परिषद निवडणूक शांततेत पार पडल्यानंतर जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक सुरळीत पार पडावी यासाठी जिल्हा पोलीस दल सज्ज झाले आहे. जिह्यात तब्बल 2 हजार 137 पोलीस संख्याबळ बंदोबस्तात तैनात झाला आहे. अगदी काटेकोरपणे पोलीस दलाने निवडणुकीचे नियोजन केले आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी बंदोबस्त नियमावली तयार करण्यात आली आहे.

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक आज सर्वत्र होणार आहे. यामध्ये खरी परीक्षा पोलिसांची असणार आहे. सध्या सगळीकडे राजकारण तापले असताना कोणत्याही गोष्टीला वाईट वळण लागू नये याची खबरदारी प्रत्येक अधिकाऱयांपासून कर्मचाऱयांनी घ्यावी, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून करण्यात आले आहे. रत्नागिरी जिह्यात हजारो पोलीस मित्र असून त्यांचीही निवडणूक शांततेत पार पडण्यासाठी मदत घेतली जाणार आहे. रत्नागिरीत पोलीस दलाची संख्या या निवडणुकीसाठी अपूरी असल्याने आरसीएफ, होमगार्ड, एनएसएस, माजी सैनिक, ग्रामसुरक्षा आदी विविध विभागांची मदत घेण्यात आली आहे.

दोन दिवसांपूर्वीच रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक प्रणय अशोक यांच्या मार्गदर्शनाखाली याचे नियोजन करण्यात आले. केवळ निवडणूक केंद्र लक्षात न घेता जिल्हय़ातील सार्वजनिक ठिकाणांचाही विचार करण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर महामार्गावरील नाक्यांवरही कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. रत्नागिरी जिह्यात निवडणूका शांततेत पार पडल्या आहेत त्यामुळे यावेळचीही निवडणूक ही शांततेतच पार पडेल मात्र आयत्यावेळी कोणताही गोंधळ होवू नये यासाठी हा कडक 24 तास बंदोबस्त तैनात केला आहे.

जिह्यात 18 पोलीस ठाणे हद्दीत बंदोबस्ताचे नियोजन झाले आहे. जिह्यातील 71 मतदान केंद्र अतिशय संवेदनशील तर 161 संवेदन महसूल झोन आहेत. याठिकाणी कोणताही अनुचित घटना घडणारी नाही यासाठी बारकाईने लक्ष ठेवा, अलर्ट रहा, पोलीस आपली डय़ुटी प्रामाणिकपणे करणार यात शंकाच नाही त्यामुळे सर्वांना ‘बेस्ट लक’ च्या शुभेच्छाही पोलीस अधीक्षक प्रणय अशोक यांनी दिल्या.

विशेष म्हणजे सध्या खऱया अर्थाने पोलीस दल हायटेक होत असून सर्व कर्मचाऱयांना ऑनलाईन सूचना दिल्या जातात. कोणताही महत्वाचा संदेश असेल तर तो एकाचवेळी सर्व कर्मऱयांना एसएमएसद्वारे कळवला जाणार आहे. पोलीस कर्मचाऱयांचा व्हॉटसऍप ग्रुपदेखील आहे. त्यामुळे बंदोबस्तातील कर्मचारी आपले अपडेट वेळोवेळी मेसेजद्वारे वरिष्ठांना कळवणार आहेत.

या बंदोबस्त व्यतिरिक्त एक स्ट्रायकिंग फोर्स, क्युआरटी पथक राखीव ठेवण्यात आले आहेत. कशेडी, म्हाप्रळ, कुंभार्ली, खारेपाटण, मुर्शी, घोडेपोई अशा 6 ठिकाणी बॉर्डर सिलिंग पॉईंट ठेवण्यात आले आहे. या मार्गावर येणाऱया जाणाऱया सर्व गाडय़ांची तपासणी या पथकांकडून करण्यात येणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रोख रक्कम, हत्यारे इतर साहित्य गाडय़ामधून नेण्याची-आणण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने ही 6 बॉर्डर सेलिंग पॉईंट नेमण्यात आले आहेत. तर 14 ठिकाणी सागरी पोस्टवरील कर्मचारीही 24 तास सतर्क राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर तैनात करण्यात आलेला बंदोबस्त संख्याबळाची माहिती पुढीलप्रमाणे-

पोलीस कर्मचारी-874

एनएसएस-135

एनसीसी-20

माजी सैनिक-10

माजी पोलीस-3

सागरी सुरक्षा-22

ग्राम सुरक्षा- 35

खासगी सुरक्षा-52

आरएसपी-23

विद्यार्थी-15

पोलीस अधिकारी-25

इतर कर्मचारी- 923

एकूण-2137

सहकार्याचे आवाहन

2016 मध्ये नगर परिषद निवडणूकीच्या बंदोबस्तानंतर नवीन वर्ष बंदोबस्त पाठोपाठ आयजी परेड तपासणी, 26 जानेवारी त्यानंतर जिल्हा परिषद, पंचायत समिती व्हीआयपी प्रचार सभा बंदोबस्त आणि आता प्रत्यक्ष निवडणूक आणि निवडणूक निकाल बंदोबस्त. वर्षभर सलग बंदोबस्तात 24 तास डय़ुटी करणारा पोलीस दल पुन्हा एकदा शांततेसाठी सज्ज झाला आहे. नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.