|Monday, June 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » राज्यातील 76 हजार जि.प. शाळांचे मूल्यांकन!

राज्यातील 76 हजार जि.प. शाळांचे मूल्यांकन! 

 

शाळांना मिळणार अ,ब,क,ड श्रेणी

उच्च श्रेणीच्या जि.प. शाळांना आय.एस.ओ. ,

एका क्लिकवर कळणार शाळेचा दर्जा

शाळांच्या मूल्यमापनासाठी विशेष समिती

अरुण आठल्ये /रत्नागिरी

महाराष्ट्रातील जिल्हा परिषदांच्या 76 हजार शाळांना त्यांच्या गुणवत्तेनुसार श्रेणी देण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने तपासणी मोहीम हाती घेतली आहे. या शाळांना आता अ, ब, क आणि ड असा दर्जा देण्यात येणार असून उत्कृष्ट दर्जा असणाऱया शाळा रोल मॉडेल ठरणार आहेत. शाळांचा दर्जा ठरवण्यासाठी शासनाने भौतिक सुविधांच्या मूल्यांकनावरुन आयएसओ प्रमाणपत्र देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. या सर्व शाळांना ऑनलाईन माहिती भरावयाची असून संच मूल्यमापन करावयाचे आहे. त्यातून शाळेची गुणवत्ता काय आहे ते एकाच ‘क्लिकवर’ कोठूनही कळणार आहे.

जिल्हा परिषदांच्या राज्यातील 76 हजार शाळांमध्ये हा उपक्रम राबवला जाणार आहे. प्रत्येक शाळेत आपल्या क्षमतेने सर्वोत्कृष्ट परिणाम मिळविण्यासाठी पोषक वातावरण निर्माण व्हावे यासाठी मूल्यमापन होणार आहे. त्यासाठी आयएसओच्या धर्तीवर ‘शाळा सिद्धी’ उपक्रम राबवला जात आहे. परिणामी शाळास्तरावर शिक्षणाची मानके सुधारण्यास मदत होणार आहे. ‘शाळासिद्धी’ प्रकल्पामध्ये शाळेत राबवलेले सर्व उपक्रम नियमित सुरु रहावे, यातून सर्वोत्कृष्ट परिणाम आणि शिक्षणाची मानके सुधारणे हा उद्देश आहे.

विद्यार्थ्यांना मिळणाऱया सुविधा, उपस्थिती †िटकावी यासाठी राबवण्यात येणारे विविधांगी उपक्रम यांचा समावेश आहे. शाळासिद्धी या प्रकल्पात सहभागी होणाऱया शाळांच्या मूल्यमापनासाठी लवकरच समिती नेमण्यात येणार आहे.

या मुल्यमापनाच्या निकषांमध्ये शाळा इमारत (वर्ग खोल्या, शौचालये, फर्निचर संगणक कक्ष इ.) परिसर (स्वच्छता, सुविचार, तक्ते, बोलक्या भिंती, मध्यान्न भोजनासाठी स्वच्छता, शौचालयांची स्वच्छता इ.) शैक्षणिक साहित्य (रेडीओ, दूरचित्रवाणी, नकाशे, पृथ्वीगोल, ग्रंथालय, पुस्तके, संगणक इ.) क्रीडा (मैदान, वयोगटानुसार पुरेसे क्रीडासाहित्य इ.) संदर्भ साहित्य (विषयानुसार पुस्तके, शैक्षणिक चित्रपट, डीजिटल डेटा इ.) विद्यार्थी (हजेरी, गैरहजर-शाळाबाह्य मुलांना शाळेत आणण्यासाठी केलेले प्रयत्न, विद्यार्थी प्रगती इ.) आदी घटकांचा समावेश करण्यात आला आहे.

शिक्षक मान्यता, शिक्षकांची उपलब्धता प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या उपक्रमाने प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणावर प्रवेश केल्यानंतर शाळांचे अंतर आणि बाह्यरुप पालटत आहे. यामध्ये एक नव्या उपक्रमाची भर पडली आहे.