|Friday, January 24, 2020
You are here: Home » आवृत्ती » सातारा » गर्भवती पत्नीसह मुलाचा गळा दाबून खून

गर्भवती पत्नीसह मुलाचा गळा दाबून खून 

वार्ताहर/ लोणंद

लोणंद गावच्या हद्दित इंदिरानगर येथे राहणाऱया संदीप चद्रकांत कोळेकर (वय 35) याने गर्भवती असणाऱया पत्नीचा व अडीच वर्षाच्या चिमुरडय़ा मुलाचा गळा दाबून रविवारी रात्री खून करून स्वत:च्या दोन्ही हाताच्या नसा कापून गळफास घेऊन राहत्या घरात आत्महत्या केली. या घटनेचे नेमके कारण समजु शकले नसून या घटनेमुळे लोणंद परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेची लोणंद लोणंद पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे.

  या घटनेबाबत लोणंद पोलीस स्टेशन व घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की, लोणंद गावच्या हद्दित इंदिरानगर येथे राहणारे संदीप चंद्रकांत कोळेकर (वय 35) हे आपली पत्नी रेखा कोळेकर (वय वर्ष 30) व अडीच वर्षाचा मुलगा आदेश यांच्यासह राहत होते. संदीप कोळेकर हे तरकारी व भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करत असत. रविवारी संदीप कोळेकर यांचे घर दुपारी 3 वाजल्यापासून रात्री आठ वाजेपर्यत बंद होते. घरातून टीव्हीचा आवाज येत होता, मात्र घराचा दरवाजा बंद होता. त्यांच्या घराशेजारी रहात असलेल्या अमृता हरिदास यांना बराच वेळ घराचा दरवाजा बंद असल्याने शंका आल्यामुळे त्यांनी संदीप कोळेकर यांच्या घराचा दरवाजा ठोठावला. पण दरवाजा कोणीच उघडला नाही. त्यामुळे त्यांनी दरवाजाच्या फटीतून आत डोकावले असता त्यांना घरामध्ये बेडच्या शेजारी फरशीवर रेखा कोळेकर या बेशुद्ध स्थितीत पडलेल्या दिसल्यावर त्यांनी शेजाऱयांना आरडाओरडा करून बोलावले. यानंतर विनायक हरिदास, लक्ष्मण हरिदास, शशिकांत टिके हे कोळेकर यांच्या घराजवळ आले. त्यांनी घराचा दरवाजा तोडला असता घराच्या बैठक हॉलमध्ये चद्रकांत कोळेकर यांचा अडीच वर्षाचा मुलगा आदेश व त्यांची गर्भवती असणारी पत्नी रेखा कोळेकर हे फरशीवर पडलेले होते. तर किचन खोलीमध्ये संदीप कोळेकर याने दोन्ही हाताच्या नसा कापून घेऊन घराच्या छताच्या पत्र्याच्या लोखंडी अँगलला सुती दोरी बांधून गळफास घेवुन आत्महत्या केली होती.

ही घटना लोणंद पोलिसांना समजताच लोणंदचे सहाय्यक निरीक्षक संदीप भोसले व त्यांच्या सहकाऱयांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेचा पंचनामा केला असून साधारणपणे सायंकाळच्या दरम्यान ही घटना घडली असून प्रथम अडीच वर्षाचा मुलगा आदेश व पत्नी रेखा हिला गळा दाबून संदीप कोळेकरने मारले असावे. त्याचा आवाज घराबाहेर ऐकू जावू नये म्हणून टि.व्ही.चा आवाज मोठा करून ठेवला असावा. या घटनेनंतर संदीप कोळेकर याने स्वतःच्या हाताच्या नसा कापून गळफास घेऊन आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज लोणंद पोलिसांनी व्यक्त केला आहे.

 या घटनेची फिर्याद अरविंद सखाराम कोळेकर यांनी लोणंद पोलीस स्टेशनला दिली असून या घटनेचा अधिक तपास लोणंदचे सहाय्यक निरीक्षक संदीप भोसले हे करत आहेत. मात्र संदीप कोळेकर याने हे कृत्य नेमके का केले. आपल्या गर्भवती पत्नी व तीन वर्षाच्या चिमुरडय़ा मुलाचा खून करुन आत्महत्या का केला? याचे कारण समजू शकले नाही. लोणंद परिसरात या घटनेमुळे खळबळ उडाली असून परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे

Related posts: